पार्टी करा पण.....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |



 

 
‘पार्टी’ हा मुळात आपल्या तोंडी बसलेला नेहमीचा शब्द! तो जसा आपुलकीचा वाटतो, तसाच ‘पार्टी’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या ह्रदयाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. चाळवस्ती, टवाळ मित्रपरिवार, आणि त्यांची प्रकरणे या साऱ्याच दर्शन आपल्याला या सिनेमातून होते. परंतु हा सिनेमा पाहताना आपण वैयक्तिक आयुष्यात अनुभवेलेली एखादी पार्टी मात्र आपल्या डोळ्यासमोर उभी राहत नाही. आयुष्य हे एक पार्टी आहे आणि आयुष्याची ही मौजमजेची पार्टी कुठे, कधी आणि कशी संपेल हे सांगता येत नाही. असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न ‘पार्टी’ हा सिनेमा करतो.
 

सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या सिनेमाची कथा चार पार्टी करणाऱ्या मित्रांभोवती फिरते. सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या कलाकांरानी हे चार मित्र व त्यांच्यातील जीवाभावाची मैत्री चांगली रंगवली आहे. सुरुवातीला मजा म्हणून तोंडी लावलेल्या दारुच्या प्याल्याचा घोट सुव्रतच्या आयुष्याचा मात्र घात करतो. त्याला रुग्णालयात दाखल करताना त्याचे मित्र पाहताना प्रेक्षकांना दुनियादारीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सुव्रतने रंगवलेले पात्र ओमकारचा मृत्यु दुख:द वाटतो खरा पण कथेचे गांभीर्य वाढवण्याची गरज म्हणून त्याच्यावरील अंतिमसंस्कार दाखवणे हा कहरच ठरतो. दारुच्या अतिरेकामुळे ओमकारचा झालेला मृत्यु, त्याचा मित्र चकऱ्या (अक्षय टंकसाळे) याच्या जीवाला चटका लावून जातो. ओमकारच्या मृत्युने ढसाढसा रडणारी त्याची प्रेयसी अर्पिता (प्राजक्ता माळी) पाहून प्रेक्षकांना रडू मात्र कोसळत नाही. परंतु प्राजक्ताने सिनेमात केलेला अभिनय तिच्या सौंदर्याहून अप्रतिम वाटतो. अक्षय टंकसाळे याने साकारलेला चकऱ्या प्रेक्षकांच्या आवर्जून लक्षात राहतो. चकऱ्या व त्याच्या वडिलांमध्ये रंगणारी तूतू - मैंमैं पाहून हसू येईलच याची शाश्वती देता येत नाही. विनोदनिर्मीतीचा ओढूनताणून केलेला तो प्रयत्न वाटतो.

 
सिनेमात दाखवलेला या चार मित्रांचा स्त्रियांकडे उपभोगात्मक वस्तू म्हणून पाहण्याचा एकूणच दृष्टिकोन व दाखवलेले प्रसंग यांमुळे मराठी सिनेसृष्टीत आणखी एका एडल्ट सिनेमाची भर पडली असे म्हणायला हरकत नाही. बाकी अमित राज यांनी सिनेमाला दिलेले संगीत उत्तम आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे यांच्या आवाजातील गाणीही छान आहेत. सिनेमाच्या सुरुवातीलाच असेलेले भावड्या हे गाणे पार्टी साँग ठरते. ‘काळजात घंटी वाजते’ हे गाणे आवर्जून लक्षात राहते. चित्रपटाशेवटी असलेली कट्ट्यावरील कविताही उत्तम आहे. सचिन दरेकर व प्रशांत लोके यांनी लिहिलेले संवाद व पटकथाही उत्तम आहे पण लिहिताना केवळ पुरुषी मनोवृत्तीतून एकाच बाजुला झुकणारे वाटतात. ‘घराचे, गाडीचे हफ्ते भरताना मैत्रीचा हफ्ता भरायचा आपण विसरतो’ असे संवाद सिनेमातून मैत्रीचा संदेश देऊ पाहतात. त्यामुळे ही ‘पार्टी’ पाहून मैत्रीचा हँगओव्हर जितक्या लवकर चढतो पण तितक्याच लवकर उतरतोही!
 
- साईली भाटकर 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@