परिचय चिह्नसंस्कृतीच्या जगप्रसिद्ध विश्लेषणकारांचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018   
Total Views |



 

                  जे. एस. एम. वॉर्ड                                                                                 आनंद के. कुमारस्वामी 

 
चिह्नसंस्कृतीचा परिचय करून देणाऱ्या या लेखमालेतून सर्वप्रथम, प्राचीन भारतीय शिल्प-मूर्ती-चित्रकला यातील चिह्नांचा, त्याच्या संकेतांचा अभ्यास मांडण्याचे योजले आहे. सर्व प्रकारच्या प्राचीनभारतीय मूर्तिविधानांच्या (Symbol, symbolism,allegories) अर्थातच, ‘चिह्नसंस्कृती’ या विषयातील जगप्रसिद्ध विश्लेषणकार आणि ‘भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्यात्मशास्त्रज्ञ’ या संबोधनाने अलंकृत आनंद के. कुमारस्वामी (१८७७-१९४७) यांना मी भेटू शकलो नाही, तरी त्यांच्या अनेक पुस्तके आणि निबंधांचे वाचन मला करता आले. वंदनीय कुमारस्वामींना, माझ्या या विषयातील अभ्यासात मी गुरूस्थानी मानले आहे. ५ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या भारतीय शिक्षक दिनानिमित्त मला गुरूस्थानी असलेल्या, त्यांच्या लिखित साहित्यातून मला या अनोख्या विषयाचा श्रीगणेशा शिकवणाऱ्या, माझ्या या शिक्षकाला प्रथम माझे वंदन आणि वाचकांसाठी त्यांच्या विलक्षण कामाचा हा त्रोटक परिचय.
 

श्रीविष्णूंच्या प्रतिमेच्या चिह्नसंकेतांचा पुढील संदर्भ देण्याच्या आधी, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून प्राचीन भारतीय व्यक्त शिल्प आणि मूर्तिकलेवर प्रतिकूल आणि अनुकूल लिहिणाऱ्या परदेशी लेखकांचा परिचय करून घेणे नक्कीच रंजक ठरेल. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर व्हीन्सेंट आर्थर स्मिथ आणि सर जॉर्ज ख्रिस्तोफर बर्डवुड, मास्केल आणि होम्स या आणि अशा इंग्लंडहून भारतात आलेल्या ‘इंडॉलॉजीस्ट’ म्हणजे भारतविद्याचार्यांनी अनेक डोकी, अनेक हात आलेल्या मूर्ती आणि सजीव-निर्जीव यांच्यासह देव-देवतांच्या प्रतिमा आणि मूर्तींना हिणकस ठरवायचा सतत प्रयत्न केला. यातले सर जॉर्ज ख्रिस्तोफर बर्डवुड एक वर्ष मुंबईचे शेरीफ होते. होम्स नावाच्या इंडॉलॉजीस्टने, कुठलेही शिल्प अथवा मूर्ती कलेचा उत्तम नमुना म्हणून स्वीकारला जाण्यासाठी काही ठोकताळे असावेत, असे विधान त्याच्या निबंधात त्या काळात केले होतेहोम्सच्या मते, कुठल्याही कालविधानामध्ये म्हणजेच त्या मूर्तीमध्ये ‘vitality’ म्हणजेच ऊर्जा आणि चैतन्याचे प्रभावी दर्शन व्हायला हवे, त्यातील विषयवस्तू म्हणजे ‘theme' मध्ये 'unity' म्हणजे एकसंधपणा असावा, देवतेच्या मूर्तीमध्ये ‘Infinity' म्हणजेच अनंत, अपार, अगणित, अमर्याद अशा वैश्विक क्षमतांचे संकेत असावे आणि सरतेशेवटी मूर्ती 'Repose' म्हणजेच शांत, विश्रांत अवस्थेतील शरीर आणि भावमुद्रेत असावी. होम्स आणि तत्कालीन अन्य इंडॉलॉजीस्ट यांच्या मते, प्राचीन भारतातील शिल्प आणि मूर्तींमध्ये अशा गुणवत्ता सापडल्या नाहीत. या सर्व अपप्रचाराला त्याकाळात समर्थपणे उत्तर दिले, ते आनंद के. कुमारस्वामी या विद्वान अभ्यासकाने. 'The Dance of Shiva' या १९१८ सालात प्रकाशित झालेल्या निबंध संग्रहात आनंद कुमारस्वामी यांनी भारतीय शिल्पकला आणि मूर्तिकला या विषयाची समर्पक विश्लेषणासह उत्तम समीक्षा केली आहे.

 

प्राचीन भारतीय शिल्पकला, मूर्तिकला याच्या गुणवत्तेविषयी, कलागुणांविषयी, प्रत्यक्ष निर्मितीच्या शास्त्राविषयी, त्याच्या इतिहासाविषयी सविस्तर विश्लेषण करणारा, 'The Aims of Indian Art' हा कुमारस्वामींचा निबंध 'Studies of comparative religions' १९७५ साली प्रकाशित झालेल्या निबंध संग्रहाच्यानवव्या खंडाच्या पहिल्या भागात समाविष्ट केला गेला आहे.शिल्पांचे निर्माते शिल्पकार, मूर्ती घडवणारे मूर्तिकार यांची मानसिकता आणि कालांतराने उपासक-दर्शक यांच्या मनोव्यापाराशी जोडले जाणारे या शिल्प-मूर्तींचे नाते, यावर कुमारस्वामी यांचे स्पष्टीकरण आजही वाचकाला विलक्षण अनुभूती देते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, राज्यकर्त्यांच्या इंग्रजी भाषेचा प्रसार फार मर्यादित होता. ही भाषा शिकून, त्या भाषेच्या व्याकरणाचा योग्य परिचय करून घेऊन त्या भाषेत लिखाण करणारे, आपले संशोधन आणि अभ्यास मांडणारे विद्वान फार कमी होते. अशा काळात, भारतीय शिल्प-मूर्ती याबद्दल अभ्यास - संशोधन न करताच अयोग्य मांडणी करणाऱ्या स्वघोषित परदेशी इंडॉलॉजीस्टंना कुमारस्वामी यांनी समर्थपणे उत्तर दिले. कुमारस्वामी यांच्या 'The Dance of Shiva' या १९१८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामुळेच, त्या नंतरच्या काळात अनेक परदेशी वैज्ञानिकांना, प्राचीन भारतीय व्यक्त कलेतील विज्ञाननिष्ठेचा परिचय करून घेता आला. परिणामी, विलंबाने का होईना, CERN - European Center for Research in Particle Physics in Geneva या स्विझर्लंडमधील जागतिक संशोधन केंद्रामध्ये, १८ जून, २००४ साली नटराजाच्या दोन मीटर उंच ब्राँझमधील प्रतिमेची स्थापना झाली. या प्रतिमेचे वर्णन करणारे कुमारस्वामींचे त्या पुस्तकातील शब्द, बाजूच्या संगमरवरी फलकावर कोरलेले आहेत.

 

आत्तापर्यंत प्राचीन भारतीय व्यक्त कलेवर प्रतिकूल लिहिणाऱ्या लेखकांचा परिचय आणि त्यांचे खंडन याचा परिचय आपण करून घेतला. आता जे. एस. एम. वॉर्ड या इंग्लिश लेखकाचा त्रोटक परिचय, वाचकांना करून देणे योग्य होईल. १९३०-४० या काळात इंग्लंडमधील सर्वात मोठ्या ऑर्थोडॉक्स कॅथॉलिक चर्चचे आर्चबिशप असलेले जे. एस. एम. वॉर्ड. त्यांच्या काळातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते आणि त्यांना भरपूर अनुयायीसुद्धा होते. ख्रिस्ती धर्म परंपरेत मान्यता नसलेल्या अध्यात्मवाद आणि परलोकविद्यावाद अशा ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास आणि त्या विषयावरील लिखाण हा यांचा विशेष परिचय. यांनी अनेक पुस्तके लिहिली. मात्र, 'Freemesonry and Indian Gods' हे १९२१ साली प्रकाशित झालेले त्यांचे पुस्तक विशेष महत्त्वाचे आहे'Freemesonry’ ही सर्वसामान्यांना फारशी परिचित नसलेली एक फार प्राचीन जागतिक संघटना आहे. साधारण बाराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या या संघटनेचा, अठराव्या शतकापासून इंग्लंडमध्ये मोठा प्रभाव होता. सामान्य माणसाला उत्तम माणूस बनवण्याची शिकवण देणाऱ्या या प्राचीन संघटनेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, चिह्न, चिह्नसंकेत, चिह्नार्थ याचा लिखित साहित्यात आणि चिह्नमुद्रा स्वरूपात संघटना सदस्यांच्या दैनंदिन जीवनात केला जाणारा वापर. एम. वॉर्ड एक नामवंत फ्रीमेसन होते. याच संघटनेच्या चिह्नसंकेत संदर्भात, भारतीय देवदेवता, खासकरून ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीच्या चिह्नार्थांची त्यांनी संघटनेच्या मूल्य आणि शिकवणीबरोबर केलेली तुलना फार उल्लेखनीय आहे. भारतवर्षावर राणीचे राज्य असतानाही, प्राचीन भारतीय मूर्तिकला आणि त्याच्या चिह्नसंकेतांचे केलेले अनुकूल तुलनात्मक लिखाण याबरोबरच अध्यात्मवाद आणि परलोकविद्यावाद या भारतीय ज्ञानशाखांचा स्वीकार यासाठी उच्च श्रेणीचे ख्रिस्ती धर्मगुरू असलेले एम. वॉर्ड त्याकाळात वादग्रस्त ठरले होते.

 

आनंद कुमारस्वामी यांच्या मते, प्राचीन भारतीय कलेचा आणि कलासाधनेचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे. या दोन हजार वर्षांत या भारतभूमीवर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्या आक्रमकांनी या प्रजेवर राज्यही केले. अनेक विचारधारा इथे आल्या, मूळ संस्कृतीत मिसळल्या त्यातल्या अनेक नष्ट झाल्या. कुमारस्वामी पुढे लिहितात की, “या सर्व विचारधारांमधे मूळ इथली संस्कृती सतत प्रभावी राहिली. उपनिषदे आणि वेदांत तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला आदर्शवाद हा या कलासंस्कृतीचा पाया आहे. याच आदर्शवादी प्रभावाने, शिल्प-मूर्ती-चित्रकला या व्यक्त माध्यमात संपूर्ण भारतवर्षांत निर्माण झालेली झालेली कलाविधाने प्रत्यक्षात दिसतात, त्यापेक्षा आदर्श स्वरूपातच आरेखित झालेली आहेत.” यालाच कुमास्वामींनी 'intuitive' म्हणजे ‘अंत:प्रेरणा, सहजप्रेरणा किंवा अध्यात्मप्रेरणेतून निर्माण झालेली कला’ असे संबोधित केले. वर उल्लेख केलेल्या होम्स यांच्या अपेक्षेवर टिप्पणी करताना कुमारस्वामींच्या मते, दोन हजार वर्षांपासून प्राचीन भारतातील या कृतिशील, सर्जनशील शिल्पकारांच्या, मूर्तिकारांच्या अंत:प्रेरणेचा-सहजप्रेरणेचा-अध्यात्मदृष्टीचा, भारतवर्षातील या निर्मितीच्या एकसंधपणाचा, त्यातील पारलौकिक संकेतांचा आणि विविध मुद्रांमधून व्यक्त झालेल्या भावना आणि मूल्यांचा अभ्यास, अनेक तथाकथित परदेशी इंडॉलॉजीस्ट म्हणजे भारतविद्याचार्यांना अजिबातच करता आला नाही. या भारतवर्षांत, दोन हजारांपेक्षा जास्त काळ रुजलेला असा आदर्शवाद, अध्यात्मवाद आणि त्याची चिह्नसंस्कृती, चिह्नसंकेत आणि चिह्नार्थ सगुण-साकार व्यक्त करणारी कलाविधाने या सर्वांचा अभ्यास, इथल्या नागरिकांना ओळखल्याशिवाय सहजसाध्य नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@