इथेनॉलची कुंडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 


शेतमाल किंवा खराब झालेल्या फळभाज्यांवर प्रक्रिया करून त्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते आणि त्याच्या उर्वरित पदार्थांपासून मोठ्या प्रमाणात जैविक खत तयार केले जाऊ शकते. यामुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ होईल.

 

आपला देश कृषिप्रधान आहे. येथे शेतीच्या उत्पन्नाबरोबरच शेतात पिकणाऱ्या पदार्थांपासून इथेनॉलची निर्मितीही शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल, या हेतूने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ मध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी देशात पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला. यामागे प्रमुख कारणे होती-

 

१) पर्यावरणाचे रक्षण करणे

२) परकीय चलन वाचविणे

३) ‘सक्षम शेतकरी, समृद्ध शेतकरी’ ही संकल्पना साकार करणे.

 

मूळ स्वरूपात इथेनॉल म्हणजे अल्कोहोलच आहे. त्याला ‘इथाईल अल्कोहोल’ असेही म्हटले जाते. त्याची घनता ०.७८९३ इतकी असून रंग पारदर्शक आहे. इथेनॉल इतर रसायनांमध्ये पूर्णपणे मिसळत असल्यामुळे याचा वापर ‘सॉल्व्हन्ट’ म्हणजेच द्रावक म्हणून केला जातो. या विशेषत्वामुळे इथेनॉलचा उपयोग वॉर्निश, रंग, पॉलिश, कृत्रिम रंग, साबण, औषधी व निर्जंतुक करणारी रसायने यांमध्ये केला जातो. याच गुणधर्मामुळे इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करणे सुरू झाले. इथेनॉलची घनता पेट्रोलपेक्षा थोडी जास्त आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळे पेट्रोल पूर्णपणे जळण्यास मदत होते. परिणामी, वाहनांमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. ब्राझील व इतर विकसित देशांमध्ये पेट्रोलमध्ये तब्बल २५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉल हे कृषी आधारित उत्पादन असल्यामुळे याच्या उत्पादनातून कृषिक्षेत्राला व शेतकऱ्यांना फायदा मिळतो. परंतु, इथेनॉलचे फायदे आहेत, तसेच काही दुष्परिणामही आहेत. इथेनॉलला पाण्याची आसक्ती आहे. त्यामुळे इथेनॉल पाण्याच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येताच त्याचे एक मिश्रण तयार होते आणि ते पेट्रोलपासून वेगळे होते. ही प्रक्रिया इथेनॉलचे नवीन मिश्रणामध्ये पूर्ण रूपांतर होईपर्यंत सुरू राहते. आज जवळपास १५ वर्षांनंतरही आपल्या देशात इथेनॉल आणि पाण्याचे मिश्रण तपासण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. इथेनॉलचा एक गुणधर्म म्हणजे त्याच्या संपर्कात आल्यास लोखंड गंजते, लोखंडाला लहान लहान छिद्रे पडतात. यामुळे मागील काही वर्षांमध्ये अनेक वाहनांच्या इंधनांच्या टाक्या आणि सायलेन्सर मोठ्या प्रमाणात गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहने नादुरुस्त होतात आणि त्यांच्या देखभालीचा खर्चही वाढतो. इथेनॉलचा दुसरा गुणधर्म म्हणजे ते रबरच्या संपर्कात आले की, रबरला वितळवून टाकते. परिणामी, अलीकडे अनेक वाहनांतून पेट्रोलची गळती होत असल्याचे दिसून येते. इथेनॉलमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी असल्यामुळे गाडीच्या इंजिनावर ताण पडून इंजिन क्षतिग्रस्त होण्याचे प्रमाण वाढते. अमेरिका व इतर विकसित देशांमध्ये इथेनॉलऐवजी आता ब्युटेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण करणे सुरू केले आहे. इथेनॉलच्या या काही मर्यादा असल्या, तरी त्याची उपयुक्तता पाहता या समस्यांवर छोटे मोठे उपाय करून मार्ग काढणे अगदीच शक्य आहे.

 

आपल्या देशामध्ये आज पेट्रोलचे सरासरी उत्पादनमूल्य २५ रुपये प्रतिलीटरच्या जवळपास आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार इथेनॉलचे मूल्य ४९.५० रुपये प्रतिलीटर इतके निश्चित केलेले आहे. सार्वजनिक तेल विपणन कंपन्यांना पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कंपन्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे प्रत्येक लीटरमागे दोन रुपये इतका तोटा सहन करावा लागतो. यामुळे सार्वजनिक तेल विपणन कंपन्या पेट्रोलमध्ये इथेनॉलची मिश्रण करण्यास निरूत्सुक आहेत. केंद्र शासनाच्या धोरणानुसारइथेनॉल व पेट्रोलचे मिश्रण ब्लेंडिंगपद्धतीने करणे बंधनकारक होते. परंतु, आज आपल्या देशात एकाही ठिकाणी ब्लेंडिंगची सुविधा उपलब्ध नाही. ब्लेंडिंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे खाजगी तेल कंपन्यांना बंधनकारक नाही. याचा फायदा खाजगी कंपन्या स्वत:च्या जाहिरातीसाठी करतात. उदा. ‘देश का सच्च पंप, जो पेट्रोल मे पानी नहीं मिलाता... वगैरे. ही ब्लेंडिंगची योजना आज आपल्या मूळ उद्देशापासून भरकटलेली आहे. ती शेतकरी सक्षमीकरणाऐवजी कारखानदारांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असल्याची माहिती सार्वजनिक वितरण मंत्र्यांनी दि. १ मार्च, २०१६ रोजी लोकसभेमध्ये दिली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे आज सर्वसामान्य जनतेवर प्रतिलीटर २.४५ रुपये इतका बोझा पडतो. या रकमेचा राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास ती जवळपास आठ हजार ते १० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी सामान्य जनतेने दिलेल्या रकमेचा फायदा फक्त कारखानदार घेतात.

 
मा.केंद्रीय सार्वजनिक वितरणमंत्री यांनी १० मे, २०१६ रोजी दिलेल्या माहितीनुसार इथेनॉलचे उत्पादन मूल्य प्रतिलीटर ३६ रुपये इतके असून विक्रीमूल्य प्रतिलीटर ४९.५० रुपये निर्धारित करण्यात आले आहे. इतका प्रचंड नफा कमविल्यानंतरही आज कारखानदारांनी शेतकर्यांच्या उसाचे हजारो कोटी रुपये थकवले आहेत. देशात २००३-२००४ मध्ये उसाचे एकूण उत्पादन २८० दशलक्ष टन होते आणि हमी भाव होता, क्विंटलला ७३ रुपये. २०१६ - २०१७ मध्ये एकूण उत्पादन ३६० दशलक्ष टन होते आणि हमी भाव होता, क्विंटलला २५५ रुपये, तर साखरेचे भाव २००४ मधील १४ रुपये प्रति किलोग्रॅमपासून आज ४२ रुपये प्रतिकिलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. नीति आयोगाद्वारे २०१३ - २०१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, तयार शेतमालाची कापणी झाल्यानंतर आपल्या देशात जवळपास ९२,६५१ कोटी रुपयांचा शेतमाल नष्ट होतो. याची प्रमुख कारणे म्हणजे, साठवणुकीची व्यवस्था नसणे, वाहतुकीची अव्यवस्था व उत्पादनाचे नियोजन नसणे, शेतमालाला भाव न मिळणे, वगैरे. वृत्तपत्रांमध्ये शेतकर्यांनी कांदे, बटाटे, वांगी तसेच इतर फळे व भाज्या रस्त्यावर फेकल्याच्या बातम्या प्रकाशित होतात.अनेकवेळा अवकाळी पावसामुळेही पिके नष्ट होतात, धान्य सडून जाते. ‘Business World’ या नियतकालिकात दि. २७ ऑगस्ट, २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार, भारतामध्ये दररोज २४४ कोटी रुपयांचे अन्न वाया घालविले जाते. हे प्रमाण अमेरिकेत दररोज आवश्यक असलेल्या खाद्यान्नाइतके जास्त आहे. तरीही आपल्या देशात कोट्यवधी लोक उपाशी राहतात.
 

दरवर्षी वाया जाणाऱ्या शेतमालापासून तसेच अन्नपदार्थापासून ऊर्जा निर्माण करणेही शक्य आहे. यामुळे अतिरिक्त उत्पादित शेतमाल किंवा खराब झालेल्या फळभाज्यांवर प्रक्रिया करून त्यापासून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते आणि त्याच्या उर्वरित पदार्थांपासून मोठ्या प्रमाणात जैविक खत तयार केले जाऊ शकते. यामुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ होईल. पेट्रोलियम मंत्र्यांनी १ ऑगस्ट, २०१६ रोजी लोकसभेमध्ये दिलेली माहिती असे सांगते की, अशा प्रकारे प्रक्रिया करून उत्पादन केलेल्या इथेनॉलचा उपयोग पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी आहे. आपल्या देशात सध्या इथेनॉलचे उत्पादन फक्त उसापासून होते. आजच्या परिस्थितीत ऊसउत्पादक शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या पूर्ण उसावर प्रक्रिया होत असल्यामुळे त्यांना उत्पन्न मिळत आहे. याउलट इतर शेतमाल पिकविणारा शेतकरी कर्जबाजारी आहे. याचे कारण त्याच्या संपूर्ण शेतमालावर प्रक्रिया करण्याची सुविधा आपल्याकडे निर्माण झालेली नाही. निरुपयोगी फळे, भाज्या, अन्नधान्य यांपासून इथेनॉलचे उत्पादन सुरू केल्यास हा शेतकरी खऱ्या अर्थाने सक्षम होईल. ग्रामीण क्षेत्रामध्ये आजही ज्वारी व कडधान्यापासून अवैध दारू बनविली जाते. तसेच, त्यामुळे ग्रामीण क्षेत्रांमध्ये अशा प्रकारचे कारखाने सुरू करून अवैध धंद्याला आला घालता येईल व रोजगार निर्माण होतील.

 

केंद्र शासनाने १ सप्टेंबर, २०१५ च्या धोरणानुसार, पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळणे सुरू केले. २०२० पर्यंत त्याचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. परंतु, प्रत्यक्षात आज आपण फक्त दोन-तीन टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले असून यामागे इथेनॉलची उपलब्धता नसणे हे प्रमुख कारण आहे. आपल्या देशामध्ये दरवर्षी सरासरी तीन हजार कोटी लीटर पेट्रोलची विक्री होते. त्यासाठी ३०० कोटी इथेनॉलची आवश्यकता असताना आपल्याकडे फक्त १६१ कोटी लीटर इतकेच इथेनॉल उपलब्ध आहे. यावर उपाय म्हणून विदेशातून इथेनॉल आयात करण्यासाठी कारखानदारांचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी अत्यंत उपयोगी असलेल्या बांबूपासून इथेनॉल निर्मिती करण्याचे प्रयोग सुरू आहेत. जगात ब्राझील व अमेरिका हे सर्वाधिक इथेनॉलचे उत्पादन करतात. या दोन्ही देशांमध्ये निरुपयोगी फळे, भाज्या, धान्य व शहरी घनकचरा यापासून इथेनॉलचे उत्पादन केल्या जाते. असे उत्पादन करण्यासाठी या देशांमध्ये सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आपल्या देशात अशा पायाभूत सुविधा निर्माण करून जर आपणही निरुपयोगी फळे, भाज्या, अन्न धान्य व कचऱ्यापासून इथेनॉलचे उत्पादन सुरू केले, तर केंद्र शासनाने ठरविलेले २० टक्के इथेनॉलचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम, सुदृढ करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने पूर्ण होईल व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी कोणापुढेही हात पसरण्याची गरज राहणार नाही.

 

- शोभाताई फडणवीस

(लेखिका माजी मंत्री आहेत)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@