ज्ञानदानाचा ‘विक्रम’ पुरस्कार
महा एमटीबी   07-Sep-2018‘मुलं शिकली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत,’ या भावनेने अहमदनगरमधल्या एका दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या विक्रम अडसूळ यांचा नुकताच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

 

अहमदनगर जिल्ह्यातील बंडरगर वस्तीवर एका लहानशा गावातील चौथीपर्यंतच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मान होणे, हे सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकीपेशा करिअर म्हणून निवडणाऱ्या साठी नक्कीच प्रेरणादायी आहे. शहरासारख्या सुखसोयींची वानवा असलेली बंडरगर वस्ती. जेमतेम दीडेकशे लोकसंख्या. बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नसल्याने जेमतेम शिकून मुलांनीही शेतीच्या कामात हातभार लावावा इतकीच त्यांची अपेक्षा. मात्र, या साऱ्या गोष्टी झुगारून कोरड्या माळरानावर शिक्षणाचीही वेल उमलेल, अशी स्वप्न दाखवणारा माणूस हा पालक आणि विद्यार्थ्यांनाही भेटला तो ‘विक्रम अडसूळ’ यांच्या रुपाने. “मुलं शिकली पाहिजेत आणि आजच्या युगात टिकली पाहिजेत, ही जबाबदारी माझी,” असे म्हणारे आणि शिक्षणाचे हे व्रत अविरत सुरू ठेवणारे विक्रम हे बंडरगर येथील पालक-विद्यार्थ्यांचा आशेचे किरण आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडसूळ यांच्या कामाची दखल घेतली. यंदाच्या ‘शिक्षक दिना’ला त्यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. राज्यातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले ते एकमेव शिक्षक आहेत. आपले काम नि:स्वार्थी भावनेने सुरू ठेवणाऱ्या अडसूळ यांचे पंतप्रधांनांनीही भरभरून कौतुक केले. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शाळेची पटसंख्या कायम ठेवण्यात ते यशस्वी कसे झाले, त्यामागेही एक वेगळी कहाणी आहे. ते शिकवतात त्या शाळेत पोहोचण्यासाठी नगरहून हंडाळवाडीला (ता. कर्जत) जाण्यासाठी दोन तासांचा प्रवास करावा लागतो. बाहेरच्या जगाशी संबंधही तसा कमीच. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व जाणणारेही तुरळकच. त्यात वस्तीही मेंढपाळांची. पावसापुरता मुक्काम आणि त्यानंतर पोटापाण्यासाठी वणवण ठरलेलीच. त्या वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी विक्रम यांची सारी धडपड. शाळेत शिकवण्याची पद्धतही वेगळीच. पहिली ते चौथीपर्यंत 28 पटसंख्या असलेल्या शाळेत कर्जत तालुक्यातील मुले आवडीने येतात. इथे अडसूळ गुरूजींची छडी नव्हे, तर पाठीवर त्यांचा प्रेमळ हात फिरतो. कॅरम, सापशिडीसारखे खेळ खेळता-खेळता अभ्यासाची उजळणीही ते करून घेतात. त्यांच्या शाळेत लॅपटॉपही आहे. त्यावर आळीपाळीने सारे टायपिंग शिकतात.

 

मुलांचा नावडता विषय ‘गणित’, पण हाच विषय विक्रम अडसूळ चक्क कॅरमच्या माध्यमातून हसत-खेळत शिकवतात. या कॅरमवर गुणाकार-भागाकार, वजाबाकी-बेरीज केली जाते. सापशिडीचा वापर करून गणिते मांडली जातात आणि त्यात पारंगत झालेली मुले काही मिनिटांत उत्तरे देतात. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी त्यांना विविध प्रकारचे नवे शब्द दररोज सांगितले जातात. नाटिका, गाणी, गोष्टी यांतून ते मुलांना जगभरातील नव्या गोष्टी शिकवतात. यामुळे मुलांना रोज नवे काही तरी शिकायला मिळते. यामुळे हजेरीपटही भरलेला असतो. शाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेशही अगदी स्वच्छ, केसही अगदी टापटीप. अनवाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पायातील रुतलेला काटा असो, अथवा त्यांच्या मळलेल्या कपड्यांची स्वच्छता ही सर्व कामे करण्यात विक्रम यांना कुठलाही कमीपणा वाटत नाही. मुलांचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम. आपल्या घरातून आणलेली बाजरीची भाकरी आपुलकीने मुले विक्रम यांना देतात. शाळेतील मुले इतर कुठल्याही मुलांप्रमाणे टॅब, मोबाईल, लॅपटॉप व्यवस्थित हाताळतात. अभ्यासासाठीही त्याचा वापर करतात. हे केवळ आणि केवळ शक्य झाले ते विक्रम अडसूळांमुळे. जगाशी स्पर्धा केवळ शिक्षणामुळेच शक्य आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर सरांनी योग्यरीत्या बिंबवले आहे. माळरानावर संसार घेऊन फिरणाऱ्या आईवडिलांच्या या मुलांची व्यसनांच्या जाळ्यात अडकून शिक्षणापासून परावृत्त होण्याची भीतीही जास्त असते. मात्र, सरांचे संस्कार पुढील आयुष्यभर पुरतील, असा विश्वास मुलांना आणि पालकांनाही वाटतो. शहरी मुलांमधील कोवळ्या वयात येणारी निराशा, अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष आणि आत्महत्येपर्यंत जाणारी प्रकरणे याला विक्रम अडसूळ यांचा हा प्रवास चांगले उत्तर आहे. त्यामुळे खासगी शिकवण्या लावण्यापर्यंतच कर्तव्य मानणाऱ्या पालकांनी मुलांच्या कलानेही विचार करून त्यांचे मित्र बनायला हरकत नाही. या शाळेतील विद्यार्थी नवे तंत्रज्ञानही सहजरीत्या हाताळतात. विक्रम यांनी ‘अ‍क्टिव्ह टीचर्स ऑफ महाराष्ट्र अ‍प’ची निर्मिती केली आहे. मुलांना विविध गोष्टी बहुअंगांने शिकवण्यासाठी ते स्वतः ‘अपडेट’ राहतात. त्यांनी आत्तापर्यंत विविध कार्यशाळांमध्येही सहभाग घेतला आहे. पुरस्कारप्राप्त झाल्यावर त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे आभार मानले. “देशात सुजाण नागरिक घडविण्याचे काम मी आणि शिक्षिका कविता बंडगर यांच्या मदतीने असेच सुरू ठेवणार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली. विक्रम अडसूळ यांच्या या विक्रमी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 
 
- तेजस परब