हे ही नसे थोडके...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018   
Total Views |



 
 

इतिहासाची ही पाने पुन्हा उलटण्याचे कारण म्हणजे, शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा केवळ भारतीयांनाच अभिमान नाही तर, काही पाकिस्तानी नागरिकांनीही भगतसिंगांच्या स्मृती जपल्या जाव्यात, यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न केले आहेत.

 
 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अनेक तरुणांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा ब्रिटिश हिंदुस्थानात सध्याच्या पाकिस्तानचाही समावेश असल्याने हे स्वातंत्र्यसैनिक लाहोर, रावळपिंडी अर्थात पंजाब प्रांतातूनही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यापैकीच एक म्हणजे शहीद भगतसिंग. तत्कालीन पंजाब प्रांतातील लाहोरजवळच्या ल्यालपूर येथे १९०७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरीही असेच क्रांतिकारी वारे वाहत होते. साहजिकच, स्वातंत्र्यलढ्याचे बाळकडू भगतसिंगांना घरातूनही मिळालेच. शिवाय, महात्मा गांधी, लाला लजपतराय यांसारख्या दिग्गज मंडळींचा त्यांच्यावरही प्रभाव होता. म्हणूनच लाल लजपतराय यांच्यावरील लाठीहल्ल्याचा बदला घेण्यासाठी पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटला ठार मारण्याचा कट आखला गेला. पण, या कटात स्कॉटऐवजी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सवर त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यांच्या या कटात राजगुरू, सुखदेवही सामील होते. डिसेंबर १९२८ रोजी सॅँडर्सची हत्या झाली आणि १९३१ साली भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना खटला चालवून लाहोर कारागृहातच फाशी देण्यात आली. या घटनेला आता जवळपास ८७ वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासाची ही पाने पुन्हा उलटण्याचे कारण म्हणजे, शहीद भगतसिंग यांच्या बलिदानाचा केवळ भारतीयांनाच अभिमान नाही तर, काही पाकिस्तानी नागरिकांनीही भगतसिंगांच्या स्मृती जपल्या जाव्यात, यासाठी पूर्ण निष्ठेने प्रयत्न केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज मेहमूद कुरेशी.

 

या कुरेशींनी भगतसिंगांवर ब्रिटिशांनी चालवलेल्या खटल्यातही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत या खटल्याची न्यायिक सुनावणी पुन्हा लाहोरमध्ये करण्याचीही मागणी केली होती. त्याचबरोबर भगतसिंगांच्या फाशीच्या खटल्यासंबंधीची सर्व कागदपत्रे, पत्रव्यवहारही सार्वजनिक करावेत, या मागणीसाठीही कुरेशींनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, मार्च २०१८ साली लाहोरमध्ये भगतसिंगांशी संबंधित दस्तावेजांचे एक प्रदर्शनही भरविण्यात आले होते. कुरेशीसाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भगतसिंगांना फाशी झालेल्या लाहोर कारागृहाच्या चौकाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचीही मागणी सरकारकडे केली होती. त्यावर न्यायालयाने लाहोर जिल्हा सरकारला यासंबंधी योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आदेशही दिले आहेत.

 

या चौकाचे सध्याचे नाव ‘शादमान चौक’ असे असून भगतसिंगांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ त्याला भगतसिंगांचे नाव देण्याची कुरेशी यांची मागणी रास्तच म्हणावी लागेल. त्याचबरोबर शहीद भगतसिंगांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी त्यांचा एक पुतळाही उभारण्याची मागणी कुरेशींनी केली. त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. मोहम्मद अली जिनांनीही, “भगतसिंगांसारखा क्रांतिकारी भारतीय उपखंडात होणे नाही,” असे म्हणत भगतसिंगांच्या हौतात्म्याची उचित दखल घेतली होती. कुरेशी हाही प्रश्न उपस्थित करतात की, जर भारतात शहाजहाँ, अकबर, सर सय्यद अहमद कुरेशी यांच्या नावाने रस्ते, स्मारके असू शकतात, तर पाकिस्तानात का नाही?” म्हणून पाकिस्तानी तरुणांनीही भगतसिंगांच्या बलिदानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, यासाठी कुरेशी प्रयत्नशील दिसतात. त्याचबरोबर पाकिस्तानचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार असलेला ‘निशान-ए-हैदर’ने भगतसिंगांना सन्मानित करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. साहजिकच, त्यांच्या या मागण्यांना पाकिस्तानातील कट्टरवाद्यांनी तसेच दहशतवादी हाफिज सईदनेही विरोध दर्शविला आहे.

 

कुरेशी यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्यासारखी दुसरी आनंदवार्ता नाही. पण, पाकिस्तानमधील भारतद्वेष पाहता, भगतसिंगांनाही असा सन्मान कितपत मिळेल, याबाबत साशंकता आहेच. परंतु, किमान पाकिस्तानात असे प्रयत्न करणारे, भगतसिंगांच्या शौर्याची दखल घेणारे, भगतसिंग पाकिस्तानच्याही इतिहासाचा भाग आहेत, हे सांगणारे लोक आहेत, हेही नसे थोडके...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@