कलियुगात सांभाळणारे संत
महा एमटीबी   06-Sep-2018 

दत्तप्रभू हे दैवत कलियुगात त्वरित फल देणारं आहे. स्वआचारणामधून स्वाभिमान समाजमनात जागृत करणारे दत्तसंप्रदायामधील श्रेष्ठ संत विष्णुदास महाराज यांच्याविषयी सांगणारा हा लेख...
 

कलियुगाचा प्रभाव सर्वत्र जाणवतो आहे. दृष्टीस दिसतो आहे. माणसाच्या वृत्ती अतिप्रवृत्ती प्रधान झाल्या आहेत. वासना,विकार प्रबळ होऊन विकृतरूप धारण करत आहेत. कोमलता नाहीशी होऊन क्रौर्य करताना कराला कंप सुटेनासा झाला आहे. क्रोधाचा पारा भलताच चढता, वाढता झाला आहे. द्वेषानं उग्र रूप धारण केलं आहे. पैशांच्या प्राप्तीसाठी अनीतिचा मार्ग अवलंबण्यात गैर वाटेनासं झालं आहे. पदाचा हव्यास, लालसा यामुळे एकमेकांना कोणत्याही हीन दर्जानं खाली खेचण्याची चढाओढ लागलेली आहे. अनीति, अनाचार यांना उत आला आहे. सात्विकतेची जागा संतापानं घेतली आहे. बुद्धीमध्ये कली शिरल्याची ही कुलक्षणं आहेत.त्रस्तता, त्रागा यामुळे मनामध्ये खळबळ माजलेली आहे. नात्यांच्या नीरगाठी पडल्यानं त्या सोडवण्यासाठी लागणारा संयम संपुष्टात आला आहे. रक्ताच्या नात्यांना संपत्ती, वारसाहक्क यांचा दर्प येतो आहे. कली सर्वत्र धुमाकूळ घालतो आहे. तो मद, मत्सरामुळे उन्मत्तपणा करतो आहे. सहनशीलता, सोशीकपणा आणि संयम हद्दपार झाले आहेत. विनम्रता, विनयशीलता संपुष्टात आल्यामुळे अहंकार, गर्व प्रबळ झाला आहे. अशा अशांत अघोरी वृत्तीमुळे मानवाला फार त्रास सोसावालागतो आहे अवगुणांना प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे कली फार माजला आहे.

 

सरळ, साध्या माणसांना जीवन जगणं कठीण झालं आहे. नि:स्पृहता, नि:स्वार्थीपणा या गुणांना किंमत राहिलेली नाही. अशा अवघड परिस्थितीमध्ये आशेचा किरण कुठेच दिसत नाही. नैराश्यानं मनं अधू, अपंग झाली आहेत. कलियुगामध्ये दया, क्षमा, शांती कालबाह्य ठरण्याच्या मार्गावर आहे. मनाला बळ, उभारी देण्यासाठी भगवंताची आराधना, उपासना हे मार्ग दाखविणारे संत, सद्गुरू लाभणं गरजेचं आहे. सर्वत्र अंधकार दाटून आलेला असताना भगवंताला संतांच्या रूपात भूलोकी यावं लागतं. दत्तसंप्रदायामधील श्रेष्ठ संत प.पू. विष्णुदास स्वामी महाराजयांना दत्तप्रभूंनी पाठवलं. कोकणच्या कठीण भागात, डोंगररांगात विष्णुदास रूपी सूर्य उगवला. त्याची किरणं संपूर्ण देशभर प्रकाशमान झाली. पटवर्धन घराण्याचा कुलदीपक अवघ्या देशाचा, समाजा, कुळाचा उद्धार करणारा ठरला. स्वआचारणामधून स्वाभिमान समाजमनात जागृत करणारे विष्णुदास महाराज! नि:स्पृहतेचा आदर्श लोकांपुढे ठेवून भगवंताच्या भक्तिमार्गावर घेऊन जाणारे हे संत होते. संपूर्ण भारतदेशात भ्रमण करून समाज अवलोकन करणारे होते. त्यांनी अनुष्ठान, तप, जप, उपासना करून सामार्थ्य प्राप्त केलं. याच मार्गावर शेकडो लोकांना चालवण्यासाठी प्रोत्साहित केलं. समाजमनाला उभारी देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. दत्तप्रभू हे दैवत कलियुगात त्वरित फल देणारं आहे, हे पटवून दिलं. श्रीगुरूचरित्र ग्रंथामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं. कलियुगामध्ये गुरूभक्ती कशी तारते, ते त्यांनी श्रीगुरूचरित्र ग्रंथाच्या पारायणाद्वारे समाजमनात रूजवलं. सद्गुरूंची सेवा केल्याने मौलिक मेवा प्राप्त होतो, हे कथन केलं.

 

उंच, धिप्पाड, मजबूत देहयष्टी लाभलेले विष्णुदास महाराज अत्यंत तेजस्वी होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी वेचलं. एक एक माणूस घडवण्यासाठी कष्ट घेतले. लोकांना कलियुगातही एक भक्कम आधार लाभला. ते आपले सद्गुरु प्रज्ञानंद सरस्वती स्वामींनी दाखविलेल्या उपासना मार्गावरून चालत राहिले. दत्तउपासनेचा मार्ग कसा उत्तम आहे, ते सांगितले. ‘सहज बोलणे हितोपदेश’ असं त्याचं बोलणं समाजाच्या हिताच्या दृष्टीने होतं. ते ज्ञानाने तेजाळणारे, निष्ठा, श्रद्धेनं दमदारपणानं अनेकांना सोबत घेऊन जाणारे होते. ते प्रवचनांच्या माध्यमातून समाजमनाला घडवत गेले. कलीनं कितीही त्रास द्यायचा ठरवलं तरी, जिथे भक्ती, उपासना, भक्त आहेत तिथे तो येऊ शकत नाही. दत्तभक्ती, अखंड दत्तनाम, दत्तजयघोष दुमदुमतो, तिथे कली काहीही करू शकत नाही. साध्या, सोप्या भाषेमधून अवघड विषय सोप्पा करून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती.

 

पहाडी आवाज लाभलेले विष्णुदास स्वामी महाराज किर्तनाद्वारे हजारो लोकांची मनं जिंकून घ्यायचे. लोकांच्या मनातील भीती संभ्रम सहजपणानं दूर सारायचे. समाजमनाला कलीच्या मगरमिठीमधून उपासनेद्वारे कसं सहजपणानं सुटता येतं, ते कथन करायचे. भगवंत शुद्ध भावाचा भुकेला आहे. त्याला शुद्ध मनानं हाक मारली की, तो मदतीला येतो. त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य होतं. त्यांना सर्वसिद्धी प्राप्त होत्या. त्याची त्यांनी प्रसिद्धी केली नाही. अनेक लोकांना संकटांमधून बाहेर काढलं. लोकांची दु:ख, वेदना दूर केल्या. शक्तिसंपन्न असलेल्या विष्णुदास महाराजांचा लोकांना फार मोठा आधार वाटत होता. कोणताही प्रश्न ते चटकन सोडवायचे. त्यांनी अवगुणांपासून समाजाला दूर नेऊन दत्तात्रेयांच्या भक्तीचं भक्कम बळ मिळवून दिलं. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींसाठी ते झटले. भक्तीमधून शक्ती प्राप्त होते, हे दाखवून दिलं. पैसा, पद, प्रसिद्धी यापेक्षाही भगवंताची भक्ती, उपासना श्रेष्ठ असल्याचं स्वजीवनामधून समाजाला पटवून दिलं. सद्गुणांचा अंगीकार करणारा देवाला आवडतो व तो संकटांमधून सोडवतो, हे कळकळीनं कथन केलं. त्यांची जन्मभूमी कोकण, तर कर्मभूमी विदर्भ होती.

 

हा संतरूपातील ज्ञानसूर्य तेजाने तळपला. त्यांनी स्वतःसमवेत अनेकांचे आयुष्य प्रकाशमय केले. विष्णुदास महाराजांसारखे संत समाजमनाला सावरतात, सांभाळतात. मातेच्या ममतेनं उपासना मार्गावरून त्यांनी बोट धरून अनेकांना नेलं. मनाचा मलिनपणा हळूवारपणानं घालवला. कलीच्या त्रासानं हैराण झालेल्या जीवांना शीतल सावली लाभली. सैरभैर समाजमनाला सुंदर सरळ उपासनामार्गावर न थकता, न कंटाळता घेऊन गेले.पू. विष्णुदास स्वामी महाराजांचा दत्तभक्ती उपसाना मार्ग हे त्यांनी देह ठेवला तरी, बंद झालेला नाही. त्याचे श्रेष्ठ शिष्य प.पू. सद्गुरूदास स्वामींनी समाजमनाला उभारी देऊन भक्तीचा नंदादीप अखंड तेवत ठेवला आहे. एकशे आठ स्थानी उपासना केंद्राच्या माध्यमांतून दत्तभक्तीचा, दत्तनामाचा जागर सुरू आहे. कलियुगामध्ये कली धुमाकूळ घालत असतानाही शेकडो उपासक शांतीचा, समाधानाचा आनंद घेत आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिराची स्थापना, मूळ गुरूचरित्राचा शोध अशी अमूल्य कार्ये करणारे प.पू. सद्गुरूदास महाराज उपासक घडवत आहेत. लोकजागरामधून दत्तनामाची धून वाजते आहे. सुयोग्य मार्ग दाखवणारे हे संत, सद्गुरूसाधकांच्या साहाय्यासाठी दिवसरात्र झिजत आहेत. भगवंतालाच भक्तांची काळजी असते ना! तोच लोकांना संतांच्या माध्यमातून उभं राहण्याचं बळ देतो. कलीशी संघर्ष करण्याची शक्ती देतो. आपल्यावर संतांचे थोर उपकार आहेत. ते प्रेमानं समाजमनाला धीर देऊन सुयोग्य आकार देतात. शीतल छाया देतात. त्यामुळे कली माजला तरी, भयभीत होण्याचं कारण नाही.

 - कौमुदी गोडबोले
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/