ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी काळाच्या पडद्याआड
महा एमटीबी   05-Sep-2018 

 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील गौरीच्या आजीची भूमिका त्यांनी साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. शुभांगी यांनी आभाळमाया या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली होती. सध्या त्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेत त्या जिजीची भूमिका साकारत होत्या.
 

शुभांगी यांना रक्तदाबाचा तसेच मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटकाही आला होत्या. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. 

 

शुभांगी जोशी यांच्या निधनाने त्यांच्या सहकलाकारांना धक्का बसला आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील शुभांगी यांची नात गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली संजीव हिने दु:ख व्यक्त केले आहे. ‘काहे दिया परदेस ही माझी पहिलीच मालिका होती. शुभांगी जोशी यांच्या निमित्ताने मला प्रत्यक्ष आयुष्यातही एक आजी मिळाली होती. त्या माझे खूप लाड करायच्या. मला केक आवडतो म्हणून त्या सकाळी लवकर उठून माझ्यासाठी केक बनवून मालिकेच्या सेटवर आणायच्या. त्यांच्यासोबत मी घालवलेले क्षण मला अजून आठवतात. अशा शब्दांत सायलीने आपला शोक व्यक्त केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/