संतोष जुवेकरवर गुन्हा दाखल
महा एमटीबी   05-Sep-2018 

 

पुणे : अभिनेता संतोष जुवेकर याच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात दहीहंडी निमित्त एका कार्यक्रमाला संतोषने हजेरी लावली होती असा त्याच्यावर आरोप आहे. दहीहंडीच्या या कार्यक्रमामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे संतोषसह इतर चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
पुण्यातील सहकार नगर परिसरातील अरण्येश्वर चौकात हा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉल्बीचा वापर करण्यात आल्याने ध्वनिप्रदूषणही झाले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी जमल्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच लोकांना अडथळा निर्माण झाला होता. नियमभंग होत असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितले होते. परंतु आयोजकांनी पोलिसांचे ऐकले नाही आणि कार्यक्रम पुढे चालूच ठेवला. असा आरोप करत पुणे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
 

याप्रकरणी संतोष जुवेकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. "दहीहंडीच्यादिवशी मी पुण्यात नव्हतोच. मी माझ्या ठाण्यातील घरी होतो. या दहीहंडी मंडळाकडून मला कोणतेही आमंत्रण देण्यात आले नव्हते. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो बॅनरवर वापरला. तो पाहूनच पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असावा". असे स्पष्टीकरण संतोषने दिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/