अन् भीष्म मृत्यूस सामोरे गेले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 

 

अर्जुनाने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. त्याला हुंदका येत होता. निर्हत्यार आजोबांवर अर्जुनही बाण टाकू लागला. त्याला आपलीच चीड आली होती. लाज वाटत होती. ओल्या डोळ्यांनी तो काहीच पाहू शकत नव्हता. त्यांचा देह बाणांनी भरून गेला.
 

युद्धाचा आणि नरसंहाराचा भीष्मांना उबग आला होता म्हणून त्यांनी युधिष्ठिरास बोलावून ‘या युद्धातून माझी सुटका कर,’ अशी विनवणी केली. मग युधिष्ठिराने आपल्या भावांना शिखंडीला भीष्मांसमोर उभे करायला सांगितले. अर्जुनाला जाणवले की, आता आपल्यासमोर अत्यंत कठीण असे कर्म उभे राहणार आहे. एक क्षण असा आला की, भीष्मांसभोवती कुणीच नव्हते. कृष्णाने तो क्षण पकडला आणि अर्जुनाला सांगितले, ‘हाच तो क्षण अर्जुना, आता योग्य संधी आहे, वेळ न दवडता आता शिखंडीला भीष्मांपुढे उभा कर.’ हे बोलणे ऐकून पांडव कामाला लागले. पितामहांच्या रथाला त्यांनी वेढा घातला. कौरवांना दूर ठेवायचे काम धृष्टद्युम्न, अभिमन्यू आणि सात्यकी करत होते. द्रोण तर अगदी मागे अडकून पडले होते. पांडवांनी शिखंडीला त्यांच्या पुढे उभे केले आणि अर्जुन त्याच्या मागे उभा राहिला. भीष्मांची कोंडी झाली. त्यांनी पांडवांकडे पाहिले. त्यांना आठवला तो, पित्याने दिलेला वर. ‘तू मृत्युला एक हात दूर ठेवू शकशील आणि तुझी इच्छा होईल तेव्हाच तुला मृत्यू येईल.’ त्यांना अंबेचीही आठवण आली. ‘तुम्ही माझा हात धरला म्हणून तुम्हीच माझे पती आहात. माझा अव्हेर करू नका. माझ्यातल्या नारीचा अपमान करू नका. हे आठवून ते म्हणाले, ‘मी इच्छामरणी आहे. आत्ताच मला मरण येऊ दे. मी आत्ता मृत्यूचा मार्ग धरतो.’ त्यांना माता गंगा आठवली. ती म्हणत होती, ‘ये बाळा ये. तू युद्धाने थकला आहेस. मी तुला जोजवते. ये.’

 
 

कृष्णाला कळले की, आता ती वेळ आली आहे. तो म्हणाला, ‘शिखंडी, तयार हो! आता विलंब नको. त्यांनी मरण्याची तयारी केली आहे.’ त्याने अनेक बाण मारले. पण, पितामहांनी शिखंडीला उत्तर दिले नाही. अर्जुनाने आपले ओठ घट्ट मिटून घेतले. त्याला हुंदका येत होता. निर्हत्यार आजोबांवर अर्जुनही बाण टाकू लागला. त्याला आपलीच चीड आली होती. लाज वाटत होती. ओल्या डोळ्यांनी तो काहीच पाहू शकत नव्हता. त्यांचा देह बाणांनी भरून गेला. त्यांनी एक भाला अर्जुनाकडे फेकला. पण त्याने त्याचे बाणाने दोन तुकडे केले. तो निरंतर बाण मारत राहिला. ते म्हणाले, ‘पाहा, पाहा हे बाण अर्जुनाचे आहेत. तोच मला मारू इच्छितो. दुजा कोणी नाही.’ त्यांच्या देहाच्या चिंध्या झाल्या होत्या. पण, अर्जुनाकडून आपण जखमी होत आहोत, हे पाहून त्यांना आनंद झाला होता. त्यांचा चेहरा तेजाने उजळला होता. नजर कृष्णाकडे वळली होती. त्यांनी वेदनेने आक्रोश केला, जणू धरणीच ते हुंदके देत होती. ते बाणाच्या बिछान्यावर पडले. इतक्यात आकाशवाणी झाली, ‘रवि दक्षिण दिशेला निघाला आहे. तेव्हा या गंगापुत्राचा मृत्यू होणे योग्य नाही. हा चांगला योग नाही.’ मग पितामहांनी प्रगट केले की, देवव्रत पडला आहे. पण तो मरण पावलेला नाही. उत्तरायण होईपर्यंत मी माझे प्राण जाऊ देणार नाही. रवि उत्तरेला जाईपर्यंत मी जीवंत राहीन.’ माता गंगेने वैकुंठातील यती मुनींचा मान ठेवून त्यांना भीष्मांच्या स्वागतासाठी पाठविले. ते सारे हंस होऊन आले आणि भीष्मांभोवती वर्तुळाकार उभे राहिले. मग भीष्मांनी त्यांना सांगितले की, ‘ते उत्तरायण होण्याची वाट पाहत आहेत.’ त्यांनी विनविले की, ‘माझा हा निरोप गंगेला सांगा.’ मग हंस रूपातील ऋषी लुप्त झाले. भीष्मांची अखेर आल्याचे बघून सर्वजण सुन्न झाले. धृतराष्ट्राच्या तोंडून शब्दही फुटेना. तो लहान मुलासारखे रडू लागला. भीष्म मात्र डोळे मिटून आपल्या अखेरच्या क्षणाची वाट पाहत होते. कौरव आणि पांडव भीष्मांभोवती उभे होते. दुर्योधन तर खूपच दु:खी झाला. तो नि:शब्द असा त्यांच्यावर नजर खिळवून उभा होता. आचार्य द्रोणही हे पाहून मूर्च्छित झाले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी हळूहळू आपले सैन्य माघारी नेले. दोन्ही बाजूंचे योद्धे नागरी वेषात भीष्मांभोवती जमले. भीष्म म्हणाले, ‘माझ्या दुखावलेल्या डोक्याखाली मला उशी हवी आहे.’ त्यांच्यासाठी उंची रेशमाच्या उशा मागविल्या, पण त्या पाहून ते चिडले. ते म्हणाले, ‘रणांगणावर शोभतील अशाच उशा मला हव्या आहेत. अर्जुना, तूच मला अशी उशी देऊ शकतोस.’ मग अर्जुनाने तीन बाण सोडून त्यांच्या डोक्याखाली बाणांची उशी तयार केली. मग भीष्म म्हणाले, ‘आता मला योग्य उशी मिळाली. सच्च्या क्षत्रियाने युद्धभूमीत बाणांचा बिछाना आणि अशीच बाणांची उशी घ्यावी. बाळांनो, आता माझी अखेर झाली. मी उत्तरायण होण्याची वाट पाहीन आणि मगच माझा श्वास माझा निरोप घेईल. माझ्याभोवती एक खड्डा खणा म्हणजे मी सूर्यपूजा करू शकेन.’

 
 

दुर्योधनाने अनेक वैद्य बोलावून भीष्मांना बाण काढून घ्या व औषध घ्या असे विनविले. पण, त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, ‘या सर्वांना मानधन देऊन निरोप दे. मला यांची आता गरज नाही. हे बाण माझ्या शरीरात असेच ठेवा आणि माझ्या बरोबर ते अग्नीला समर्पित करा. रात्र झाली तरी दुर्योधन भीष्मांच्या शेजारी बसून होता. भीष्म तहानेने व्याकुळ झाल्याचे पाहून त्याने एकापेक्षा एक मधूर पेये मागवली. पण भीष्मांनी ती नाकारली आणि ते म्हणाले, ‘अर्जुनाला बोलाव. मला त्याला पाहायचं आहे.’ अर्जुन आल्यावर ते त्याला म्हणाले, ‘वत्सा, मला खूप तहान लागली आहे आणि तू एकच असा आहेस, जो माझी तहान भागवू शकेल.’ अर्जुनाने त्यांना प्रणाम केला आणि गांडीव धनुष्य घेऊन आपल्या प्रज्ञेला आवाहन केले. तीन बाण त्याने भीष्मांच्या मस्तकाजवळ अशा रितीने सोडले की, तिथून गोड पाण्याची कारंजी वर उसळून आली आणि भीष्मांच्या मुखात पाण्याची धार गेली. प्रत्यक्ष गंगाच आपल्या बाळाची तहान भागवायला आली होती. ते पाणी अमृताहून गोड होते आणि त्याला सुगंध येत होता. भीष्मांभोवती सारे नातू जमले होते. ते म्हणाले, ‘कृष्ण आणि अर्जुन हे नर आणि नारायण आहेत. त्यांना सारे माहिती आहे. दुर्योधना, मी आता मृत्युशय्येवर आहे. त्यामुळे हे युद्ध जिंकण्याची आता तुला संधी नाही. माझ्या मृत्यूबरोबरच आता या वैराचाही अंत कर. पांडवांचा पराभव होणे शक्य नाही. माझे गुरू भार्गव हे पण माझा पराभव करू शकले नाही, पण या अर्जुनाकडून माझा वध झाला आहे. जर आता तू हे युद्ध थांबवले नाहीस, तर तुमचा सर्वनाश होईल. तेव्हा हे युद्ध थांबव. त्यातच तुझे हित आहे.’ भीष्मांना माहिती होते की, आपले बोलणे एका बहिर्‍याच्या कानी पडत आहे. ते वेदनेने विव्हळत होते म्हणून सर्वजण त्यांचे दर्शन घेऊन निघून गेले. त्यांनी आपले डोळे मिटून मन एकाग्र केले. ही धरती आणि इथली सुखदु:खे यांच्या पलीकडे ते गेले होते.

- सुरेश कुळकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@