मराठी प्रेक्षकांची आवड बदलतेय?
महा एमटीबी   04-Sep-2018 

 

सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यासाठी मराठी सिनेसृष्टी व मराठी रसिक प्रेक्षक नेहमीच तयार असतात. मराठी सिनेसृष्टीतील काही आगामी सिनेमांवर एक नजर टाकली असता असे दिसून येते की मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कलाकार आता वेगवेगळे विषय हाताळू लागले आहेत. तमाशा, मध्यमवर्गीय लोक आणि त्यांची स्वप्ने यासारखे विषय आता हद्दपार होऊन त्यांची जागा सायबर क्राइम, सायकॉलॉजिकल थ्रिलर आणि सोशल मीडिया या विषयांनी घेतली आहे. यावरूनच असे लक्षात येते की, मराठी सिनेमासह हळूहळू मराठी रसिक प्रेक्षकांची आवडही बदलत चालली आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

 

 

नुकताच प्रदर्शित झालेला टेक केअर गुड नाईटहा सिनेमा पाहिला असता त्याच्या कथानकाचे वेगळेपण दिसून येईल. सोशल मीडियाचे वाढती क्रेझ, व्हर्चुअल गोष्टींना खरे मानणे, त्यामुळे वाढणारी सायबर गुन्हेगारी यावर या सिनेमाच्या माध्यामातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ३१ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. पर्ण पेठे, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि इरावती हर्षे अशी या सिनेमाची तगडी स्टार कास्ट आहे. पण स्टार कास्ट जरी तगडी असली सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवतो का? हे मात्र पाहण्याजोगे असेल. त्याच दिवशी प्रदर्शित झालेला सविता दामोदर परांजपे हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणण्यास यशस्वी ठरला आहे.
 

अनेक दिवसांनी मराठी सिनेसृष्टीत भयपट प्रदर्शित झाला आहे. परंतु हा सिनेमा केवळ भयपट नसून तो एक सायकॉलॉजिकल थ्रिलरदेखील आहे. 'सविता दामोदर परांजपे' हा सिनेमा प्रेक्षकांना विश्वास, श्रद्धा-अंद्धश्रद्धा, मानसशास्त्र या सगळ्यांच्या पलीकडे घेऊन जातो. नवोदित अभिनेत्री तृप्ती तोडरमलने वाखाणण्याजोगा अभिनय केला आहे. जोडीला सुबोध भावे सारखा हरहुन्नरी कलाकार व हिंदी मालिकांतील अनुभवी अभिनेता राकेश बापट हे आहेतच. सिनेमाचे कथानक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून अमितराज व निलेश मोहरीर यांनी हा सिनेमा संगीतबद्ध केला आहे. सिनेमातील गाणी स्वप्नील बांदोडकर यांनी गायली आहेत. बॉलिवुड अभिनेता जॉन अब्राहम यांने सविता दामोदर परांजपे या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमातील अभिनेत्री तृप्ती तोडरमल ही सिनेमाची सहनिर्माती आहे.

 

त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टी मराठी चित्रपटाचा चेहरा बदलण्यात काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. मात्र आणखीन दर्जेदार आणि बदलत्या पिढीच्या आवडीनुसार निर्मिती करण्यात आपली मराठी चित्रपटसृष्टी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- साईली भाटकर
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/