उत्सवाला गालबोट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |



 

 

दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला दहीहंडीचा सराव थांबला... हंडीही उत्साहात फोडून झाली. दुसरा दिवसही नेहमीप्रमाणे सुरू झाला आणि सरलादेखील... पण, दहीहंडीच्या धबडग्यात धारावीतील खंदारे दाम्पत्याने गमावलेल्या त्यांच्या मुलाचे काय? पोटचा गोळा सकाळी उत्साहात गोविंदापथकासोबत जातो आणि त्याच्या मृत्यूची बातमी कळल्यावर आभाळ कोसळल्यागत त्यांच्या मनावर आघात व्हावा. कुश खंदारे याला थर रचताना भोवळ आल्यानेतो थरावरून खाली कोसळला. उपचारापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू व्हावा, ही घटना मुंबईकरांनाही नवी नाही आणि गोविंदापथकांनाही. दरवर्षीच कुणा ना कुणा आईवडिलांची ही कैफियत ठरलेलीच. काही राजकीय पक्ष त्याचेही राजकीय भांडवल करून त्याला आम्ही कशी मदत केली, याचा दिखावा करतील. पुढचे वर्ष येईल आणि आणखी एक ‘कुश’ त्यांच्या आईवडिलांपासून असाच कायमचा दूर जाईल. यंदा तर जखमींच्या आकड्याने पार शंभरीच पार केली. अद्याप २५ जण रुग्णालयाच्या खाटेवर विव्हळत आहेत. त्यांचे आईवडील रुग्णालयात रात्रभर जागून खेटे मारत आहेत. पोटच्या गोळ्याने दिलेले हे विकतचे दुखणे त्यांच्याही नशिबी अनाहूतपणे आलेच. अस्मितेच्या नावाने गळे काढणारे राजकीय पक्ष, पुढारी त्यांना भेट देण्यात धन्यता मानतात. काही मदत करतीलही, पण केवळ एवढ्यावर प्रश्न सुटतील का? गमावलेला जीव पुन्हा येईल का? हाच प्रश्न उपस्थित होतो. उच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम असले तरीही गोविंदांच्या सुरक्षेचे काय? किती आयोजक वरच्या थरांपासून ते शेवटच्या गोविंदांपर्यंत सर्वजण सुरक्षित असल्याची हमी देऊ शकतील? १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी करणारी मंडळे पोलिसांच्या रडारवर आहेत. यात राजकीय पक्षांच्या आयोजकांचीही यादी आहे. कारवाई होईलही, पण सुरक्षा आणि गेलेल्या जीवाचे काय?, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. याविरोधात अस्मितेचा मुद्दा करून बोलणाऱ्या राजकीय पुढार्‍यांनी दहीहंडीला साहसी खेळ म्हणून मान्यता देण्यासाठी काय प्रयत्न केले याचेही उत्तर द्यावे. पण, आम्हालाही अशी मुळाशी जाऊन उत्तरे शोधायचा कंटाळाच असतो. पाठपुरावा सोडाच, पण त्याविषयी राजकारण्यांना, सरकारला जाब विचारणारी गोविंदापथकेही नाहीत. दोन महिन्यांचा सराव, एका दिवसाचा उत्सव आणि कुणा एकादोघांच्या गमावलेल्या जीवामुळे उत्सवाला लागलेले गालबोट घेऊन दहीहंडी उत्सव संपतो... पुढच्या वर्षी पुन्हा नवीन जल्लोषात येण्यासाठी...
 

कचऱ्यापासून वीजनिर्मितीकडे

 

मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची घोषणा केली आहे. येत्या दोन महिन्यांत या कामाची प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगण्यात आले. या प्रकल्पापासून दररोज ४० किलोवॅट वीज तयार केली जाणार आहे, मात्र कोट्यवधींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेला हे उशिरा सुचलेले शहाणपण नेमके कधी आणि कसे पूर्णत्वास जाईल, याबाबत साशंकताच आहे. मुंबईमध्ये दररोज ७ हजार २०० टन कचरा जमा होतो, असे आकडेवारी सांगते. हा कचरा सध्या देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. त्यामुळे देवनारसह इतरही डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासचा परिसर हा दुर्गंधी आणि आजारांनी ग्रासला आहे. राज्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यानंतर प्लास्टिकवर घातलेली बंदी हा तर वेगळाच विषयच. मात्र, मुंबई महानगरपालिकेवर इतकी वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचा केवळ प्रस्ताव काढण्याच्या निर्णयास येईस्तोवर इतका विलंब का लागला? मुंबईतील मोठ्या सोसायट्यांना पालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत आधीच फटकारले आहे. मात्र, मुंबईतील झोपडपट्ट्यांचे काय? तिथल्या शौचालयांच्या प्रश्नाचे काय? घंटागाडी न पोहोचणाऱ्या भागातील वस्त्या, रेल्वे रुळानजीक फेकला जाणारा कचरा याची विल्हेवाट लावण्यात पालिका नेहमीच आखडता हात घेते. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर सुरू होणारा वीजप्रकल्प काही अंशी सकारात्मक पाऊल ठरेलही, मात्र आता प्रकल्प पुढे अजिबात न रखडता त्वरित मार्गी लागायला हवा. पालिकेच्या माध्यमातून जसे अनेक ठिकाणी कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे प्रकल्प राबविले जातात, तसेच या प्रकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पांचीही त्यामध्ये भर पडली तर कचऱ्यासह वीजपुरवठ्याचा प्रश्नही काही अंशी मार्गी लागेल. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी पालिकेकडे पूर्णतः स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. कंत्राटदाराच्या भरवशावर हा प्रकल्प चालेल. काही प्रमाणापेक्षा जास्त वीज मिळाल्यास ती पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे कचऱ्यापासून वीज मिळवण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचा मनसुबा पालिका अधिकार्‍यांचा दिसतो. त्यातच मुंबईचा दीड हजार मेट्रिक टन कचरा टाकला जाणारे मुलुंड डम्पिंग ग्राऊंड दि. १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यातील एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर, तर ५०० मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाईल. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना हा प्रकल्प मात्र मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरु शकतो.

 
 - तेजस परब

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@