शिक्षणाचा देणगीदार
महा एमटीबी   30-Sep-2018

 


 
 
 
गरीबांच्या मुलांनी फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेऊच नये का? त्यांच्या मुलांनी स्वप्न पाहूच नयेत का?” असा सवाल श्रीधर शानभाग करतात.
 
 

पैसा हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. काहीजण आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत असतात, तर काहीजण हे स्वत:साठी पैसे कमवत असतात. माणूस हा जन्मभर पैशांपाठी धावत असतो. पैशांपाठी धावताना कुठेतरी आता आपल्याला थांबायला हवे असे माणसाला कधीच वाटत नाही. पण श्रीधर शानभाग हे याला अपवाद आहेत. बँकेत चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना त्यांना ती नोकरी सोडून सामाजिक कार्याकडे वळावेसे वाटले. कुटुंबासाठी आजवर खूप काही कमावले, आता समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटले.

 

श्रीधर शानभाग हे मुंबईतील सुप्रसिद्ध जीएसबी गणपती मंडळाच्या ट्रस्टच्या कार्यकारिणीवर आहेत. या मंडळातर्फे गरीब मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. श्रीधर शानभाग यांनी आजवर अनेक गरीब मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे आजवर अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. शिक्षण मिळाल्यामुळे चांगले काय, वाईट काय, यातील फरक ओळखता आल्याने अनेक गरीब कुटुंबे सावरली आहेत. श्रीधर यांची मुलगी सध्या उच्च शिक्षण घेत आहे. परंतु तिच्यासारखे उच्च शिक्षण इतर विद्यार्थ्यांनाही मिळावे, असे श्रीधर यांना वाटते. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. तो हक्क बजावताना त्या व्यक्तीला कोणतीही अडचण येऊ नये, असे त्यांचे मत आहे. “गरीबांच्या मुलांनी फी भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षण घेऊच नये का? त्यांच्या मुलांनी स्वप्न पाहूच नयेत का?” असा सवाल श्रीधर शानभाग करतात. म्हणूनच श्रीधर हे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे कार्य आजवर करत आहेत. श्रीधर शानभाग सांगतात की, “समाजात असे अनेक लोक आहेत जे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करू इच्छितात; परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.” अशा देणगीदार व गरीब विद्यार्थ्यांमधील श्रीधर शानभाग हे एक दुवा बनले आहेत.

 

शिक्षण हे समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षणानेच या देशात सुजाण नागरिक घडतील. लोक सुशिक्षित झाले तर ते रस्त्यावर थुंकणार नाहीत. जागोजागी कचरा टाकणार नाहीत. शिक्षणामुळे ज्ञानाची कवाडे खुली होतात. ज्ञान हे कधीच व्यर्थ जात नाही. शिष्यवृत्यांबाबत ते म्हणतात की, ”शिष्यवृत्ती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण ते आणखी जोमाने पुढील अभ्यासाला लागतात. उच्च शिक्षण हे सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडावे. असे झाले तर आपला देश खर्‍या अर्थाने प्रगती करेल.” श्रीधर यांचे कार्य इथपर्यंतच थांबत नाही, तर आपल्या भारत देशाला ते आपले घर मानतात. त्यांच्या या घरातील एकाही सदस्याने रात्री उपाशीपोटी झोपता कामा नये, असे त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या कार्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत, असे श्रीधर अभिमानाने सांगतात. श्रीधर यांचे एक स्वप्न आहे, जे त्यांना प्रत्यक्षात उतरवायचे आहे. पंढरपूरला दरवर्षी लाखो वारकरी वारीतून जातात. या वारकर्‍यांची सेवा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पंढरपुरात येणार्‍या भाविकांना किमान दोन वेळचे जेवण मोफत मिळावे, भाविकांची पंढरपुरात राहण्याची योग्य सोय व्हावी, अशी श्रीधर यांची इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांची पंढरपूर संस्थानाशी व शासनाशी बोलणीही सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांपासून श्रीधर शानभाग हे यासाठी प्रयत्न करत आहेत. पंढरपूरच्या भाविकांची ते मनोभावे सेवा करू इच्छितात. भाविकांच्या सोयीसाठी ते शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करण्यास तयार आहेत.

 

महाराष्ट्रासारख्या देवभूमीत जन्मलो म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत,” असे श्रीधर सांगतात. “महाराष्ट्रात अनेक मोठी देवस्थानं आहेत. तिथे कोट्यवधींच्या देणग्या जमा होतात. हा पैसा समाजकल्याणासाठी सार्थकी लागावा,” असे श्रीधर यांचे म्हणणे आहे. “या पैशांतून महाराष्ट्रातील दुर्गम भागात दवाखाने, रुग्णालये उभारायला हवीत. जेणेकरून वैद्यकीय मदत ही सर्वांना मिळेल. त्यामुळे वैद्यकीय मदतीअभावी एखाद्या रुग्णाचे प्राण जाणार नाहीत. ग्रामीण भागात जर योग्य वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध असतील, तर शहराकडे न येता तेथील नागरिकांना आपल्या गावातच योग्य उपचार घेता येतील. त्यामुळे उपचारासाठी शहरात येणार्‍यांची संख्या कमी होईल. तसेच शहरातील लोकसंख्या व सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होईल.” असे श्रीधर आवर्जून सांगतात. मुंबईतील टाटा रुग्णालयाबाहेर रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर राहताना आपल्याला दिसतात, तर त्यांच्यासाठीही श्रीधर हे मदत करू इच्छितात. टाटा रुग्णालयात देशभरातून अनेक रुग्ण कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णांना दवाखान्यात दाखल केले जाते. परंतु त्यांच्या नातेवाईकांचे काय? त्या रुग्णावरील उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांचे नातेवाईक बिचारे रस्त्यावरच राहतात. त्यांची राहण्याची सोय व्हावी, यासाठी श्रीधर सध्या प्रयत्न करत आहेत.

 
 - साईली भाटकर
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/