भारतातील व जगातील ज्वालामुखीयता
महा एमटीबी   30-Sep-2018


 

ज्वालामुखींच्या रचनेचा अभ्यास केल्यानंतर आपण आता भारतातील ‘ज्वालामुखीयता’ (Volcanism in India) तसेच भूतकाळात जगात झालेल्या काही महत्त्वाच्या ज्वालामुखींचे उद्रेक पाहू.

 

भारत हा तसा बघायला गेलं तर ज्वालामुखीय दृष्ट्या बराच स्थिर आहे. भारतातील फार मोठ्या ज्वालामुखी उद्रेकाचे एकमेव उदाहरण म्हणजे दख्खनचे पठारच होय. याआधीच एका लेखात नमूद केल्याप्रमाणे हा उद्रेक लाखो वर्षे चालू होता. तसेच दख्खनचे पठार हे पूर्णपणे बेसॉल्ट खडकापासून बनलेले असून त्याची जाडी सुमारे ६ हजार ५०० फूट आहे. याच कारणामुळे येथे भूकंपही फार होत नाहीत. दख्खनच्या पठाराशिवाय अंदमानमधील बॅरन आयलंड (Barren Island) व नारकोंडम (Narcondam) ही ‘ज्वालामुखीय बेटे’ही आहेत. ही दोन्ही बेटे इंडियन प्लेट व बर्मा मायनर प्लेट यांच्यामुळे तयार झालेल्या सबडक्शन झोनमध्ये स्थापित आहेत. यातील बॅरन आयलंड हा सक्रिय ज्वालामुखी असून याचे उद्रेक चालूच असतात. याचा शेवटचा उद्रेक २०१७ मध्ये झालेला आहे. नारकोंडम हा निष्क्रीय ज्वालामुखी आहे. याचा शेवटचा उद्रेक ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी झालेला आहे. याशिवाय भारतात बारतंग (Baratang) - अंदमान हा चिखलाचा ज्वालामुखी (Mud Volcano) व दिनोधारच्या टेकड्या (Dinodhar Hills) - गुजरात, ढोसीची टेकडी (Dhosi Hill) - अरवली, तोशामची टेकडी (Tosham Hill) - हरियाणा हे मृत ज्वालामुखीही आहेत. आता मानवी इतिहासातील काही ज्वालामुखी उद्रेकांची उदाहरणे बघू.
 

१.क्रॅकाटोआ (Krakatoa)- २६ व २७ एप्रिल, १८८३ रोजी इंडोनेशियातील क्रॅकाटोआ बेटावर हा उद्रेक झाला. याचा स्फोटकांक सहा इतका होता. या उद्रेकामुळे सुमारे ४० मीटर उंच त्सुनामी लाटा उसळल्या. यातून बाहेर पडलेली ऊर्जा ही हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बच्या ऊर्जेपेक्षा १३ हजार पट जास्त होती. याचा आवाज एवढा मोठा होता की, जवळजवळ ४ हजार ८०० किलोमीटर दूर असलेल्या मॉरिशस बेटावरही तो ऐकू आला. तसेच १६ किलोमीटरच्या परिसरातील सर्वजण बहिरे झाले. या प्रलयात सुमारे ३६ हजार लोकांचे बळी गेले व हजारो लोक जखमी झाले. १९२७ पासून याच जागेवर अनुक क्रॅकाटोआ (Anuk Krakatoa) नावाचा नवीन ज्वालामुखी तयार होत आहे.

 

२.माऊंट तांबोरा (Mt. Tambora)- १८१५ साली इंडोनेशियातच हा उद्रेक झाला. हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा उद्रेक आहे. याचा स्फोटकांक सात होता. यामुळे इतकी राख बाहेर पडली की, ती जगभर पसरली व त्यामुळे संपूर्ण जगाचे तापमान खाली आले. याचाच परिणाम म्हणून १८१६ साली प्रचंड दुष्काळ पडला. यामुळेच १८१६ सालाला ‘उन्हाळा नसलेले वर्ष’ (An Year Without Summer) असेही म्हणतात. नोंदींनुसार या उद्रेकात किमान ७१ हजार लोकांचे बळी गेले.

 

३.माऊंट पिनाट्युबो (Mt. Pinatubo)- हा ज्वालामुखी त्याच्या १९९१च्या उद्रेकामुळे कुप्रसिद्ध आहे. दि. १५ जून, १९९१ रोजी फिलिपाईन्स येथे हा उद्रेक झाला. याचा स्फोटकांक सहा होता. हा उद्रेक २०व्या शतकातील दुसरा सर्वात मोठा उद्रेक आहे. उद्रेकाबरोबरच युंगा नावाचे चक्रीवादळही आले व त्यामुळे परिस्थिती अजूनच चिघळली. ज्वालामुखीच्या आसपासच्या प्रदेशाचे यात प्रचंड नुकसान झाले. या उद्रेकामुळे सुमारे दहा किमीवर तीन कोटी टन मॅग्मा व दोन कोटी टन सल्फरडायॉक्साईड बाहेर पडले. पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे अर्ध्या सेल्सियसने कमी झाले. या उद्रेकात सुमारे ८५० लोक मृत्युमुखी पडले. सुदैवाने या ज्वालामुखीच्या उद्रेकाची सूचना आधीच मिळाल्याने बऱ्याचजणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले व जीवितहानी टळली.

 

४.माऊंट सेंट हेलेन्स (Mt. St. Helens) - १८ मे, १९८० रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात हा उद्रेक झाला. एका छोट्या भूकंपामुळे आधी पर्वतावरील फार मोठ्या भागाचे भूस्खलन झाले. त्यामुळे आतील मॅग्मा, तप्त वायू व इतर गोष्टी उद्रेकाच्या स्वरूपात पृष्ठभागावर आल्या. उद्रेकाची राख हवेत ८० हजार फूट उंच गेली व ती अमेरिकेतील ११ राज्यांत पसरली. तसेच प्रचंड तापमानामुळे पर्वतावरील हिमनद्या वितळल्या व प्रचंड मोठे चिखलाचे प्रवाह (Mudflow) तयार होऊन उतारावर वाहायला लागले. या उद्रेकामुळे ५७ लोक व हजारो प्राणी मृत्युमुखी पडले, तर अंदाजे एक अब्ज डॉलर्सची हानी झाली. आता या उद्रेकाची क्षमता इतर सर्व उद्रेकांच्या क्षमतेबरोबर बरोबर तुलना करण्यासाठी संदर्भ (Reference) म्हणून घेतली जाते. आता पृथ्वीच्या इतिहासातील काही महाउद्रेक (Super Eruptions) बघू. ‘महाउद्रेक’ म्हणजेच यांचा स्फोटकांक आठ म्हणजेच सर्वाधिक शक्तिशाली असणार.

 

१.येल्लोस्टोन नॅशनल पार्क (Yellowstone National Park), अमेरिका- अमेरिकेतील वायोमिंग राज्यातील हा एक असा ज्वालामुखी आहे, जो सबडक्शन झोनच्या जवळपासही नाही. हा ज्वालामुखी ‘हॉट स्पॉट’ (Hot Spot Volcanism- पृथ्वीच्या पोटातून पृष्ठभागावर एका बिंदूसदृश परिसरात थेट मॅग्मा येतो, याला ‘हॉट स्पॉट’ म्हणतात.) या प्रकारात येतो. साधारण ६ लाख ४० हजार ००० वर्षांपूर्वी याचा उद्रेक झाला होता. हा उद्रेक इतका मोठा होता की, यातून १९८० च्या माऊंट सेंट हेलेन्सच्या उद्रेकाच्या जवळजवळ आठ हजार पट अधिक मॅग्मा व इतर पदार्थ बाहेर पडले. हा ज्वालामुखी अजूनही तितकाच सक्रिय असून पुढील ‘महाउद्रेका’साठी सर्व शक्ती गोळा करत आहे. या सक्रिय ज्वालामुखीयतेमुळे तेथे गरम पाण्याचे झरे व गेइझर्स आहेत. ‘ओल्ड फेथफुल’ (Old Faithful) हे जगप्रसिद्ध गेइझरही इथेच आहे.

 

२. लेक टोबा (Lake Toba), इंडोनेशिया- याचा उल्लेख मागील एका लेखात आलेलाच आहे. साधारण १०८० चौरस मैल इतका मोठा कॅलडेरा असलेला हा ज्वालामुखी येल्लोस्टोनची मोठी बहीण (Big Sister of Yellowstone) म्हणूनही ओळखला जातो. साधारणत: ७४ हजार वर्षांपूर्वी याचा उद्रेक झाला तेव्हा याने १९८० च्या माऊंट सेंट हेलेन्सच्या उद्रेकापेक्षा कित्येक हजार पट अधिक पदार्थ बाहेर फेकले. या उद्रेकामुळे संपूर्ण दक्षिण-पूर्व आशियामध्ये ज्वालामुखीय राखेचा सुमारे १५ सेंमी थर जमला. शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे एक ज्वालामुखीय हिमयुगही आले.

 

३. ओरुआनुई (Oruanui), न्यूझीलंड- हा जगाच्या इतिहासातील झालेला सर्वांत अलीकडील महाउद्रेक आहे. हा उद्रेक साधारण २६ हजार ५०० वर्षांपूर्वी झाला. उद्रेकाच्या वेळी याने १,१७० किमीपर्यंत तीन पदार्थ बाहेर टाकले. यामुळे न्यूझीलंडमधीलमध्य-पूर्व भागातील बेटांवर २०० मीटर, तर अगदी एक हजार किलोमीटर दूर असणाऱ्या चॅथॅम आयलंडवरही १८ सेंमीचा राखेचा थर आढळून आला आहे. ज्वालामुखींच्या जगात एवढी भटकंती केल्यावर पुढील भागात भूस्खलनांकडे वळू.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/