खाडीकिनाऱ्यावरून...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018   
Total Views |





 

 
 

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी अणसुरे खाडी ही सागरी संरक्षित क्षेत्रासाठी निवडलेल्या कोकणातील तीन ठिकाणांपैकी एक आहे. या खाडीकिनाऱ्यावरून एक फेरफटका मारला की इथलं लोभसवाणं निसर्गसौंदर्य आणि विपुल जैव विविधता पाहायला मिळते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
माझं मोठं सद्भाग्य म्हणजे सौंदर्य आणि जैव विविधता या दोन्ही दृष्टींनी समृद्ध आणि संपन्न असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अणसुरे खाडीच्या किनारी मी जन्मलो आणि वाढलो. सकाळी उठून दार उघडून घराबाहेर आलं की, या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या खाडीचं दर्शन होतं. अणसुरे खाडी म्हणजे विजयदुर्ग खाडीचं सहा किलोमीटर आत आलेलं शेपूट. उत्तरेला राजापूरची जीवनवाहिनी असलेली अर्जुना नदी आणि दक्षिणेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे विभागणारी वाघोटण नदी या दोघांच्या मध्ये, दोघांना समांतर असलेली ही खाडी. विजयदुर्ग किल्ल्याच्या बरोबर समोर असलेल्या दांड्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळून ही खाडी क्रमाक्रमाने शिर्से, सागवे, कारिवणे या गावांमधून घुसत घुसत गोठीवरे गावापर्यंत जाते आणि संपते. उत्तरेकडे याच खाडीचं एक टोक अणसुरे, बाकाळे, जानशी आणि निवेली या गावांच्या मधून वाहत जाऊन हुर्से गावापर्यंत आलेलं आहे. ‘दी बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ (BNHS), जर्मनीची संस्था आणि भारत सरकारचं पर्यावरण मंत्रालय (MOEFCC) यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रातील तीन ठिकाणांची ‘सागरी संरक्षित क्षेत्रे’ घोषित करण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक म्हणजे ठाण्याची खाडी, दुसरं म्हणजे दापोली तालुक्यातील वेळास-दाभोळ किनारा आणि तिसरं म्हणजे ही अणसुऱ्याची खाडी.
 

या खाडीची संरक्षित क्षेत्रासाठी का निवड झाली असावी, हे खाडीकिनाऱ्यावरून एक फेरफटका मारला की सहज लक्षात येतं. अर्थात, सौंदर्य न्याहाळण्यासाठी फेरफटका मारणं वेगळं आणि जैव विविधता अभ्यासण्यासाठी फेरफटका मारणं वेगळं. पण निसर्गाकडे पाहण्याची अभ्यासात्मक दृष्टी ज्याच्याकडे आहे, त्याचे दोन्ही उद्देश इथे साध्य होतात. अणसुऱ्याच्या खाडीकिनाऱ्यावरून पदयात्रा करताना आपल्याला भेटतं ते इथलं विस्तीर्ण कांदळवन. यालाच खारफुटीचं जंगल (Mangrove Forest) असंही म्हणतात. कांदळवनातल्या वनस्पती खाडीकिनाऱ्यावरील चिखलात प्रचंड दाटीवाटीने वाढलेल्या असतात. कांदळ (Rhizophora mucronata) ही इथे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी खारफुटी वनस्पती. या वनस्पतीला शेकडो आधारमुळं फुटून ती जमिनीच्या दिशेने वाढतात. या आधारमुळांचं केवढंतरी मोठं जाळं खाडीकिनाऱ्याला तयार होतं. याची फुलं बारीक व पांढरी असतात. त्याची शेंग जमिनीच्या दिशेने वाढते. ही शेंगच पुढे खाली पडून त्यातून नवीन रोपं तयार होतात. कांदळाखालोखाल दुसरी सर्वाधिक आढळणारी वनस्पती म्हणजे चिपी (Sonneratia alba). चिपीचं फूल पांढऱ्या काड्यांचं आणि गुलाबी पाकळ्यांचं असतं. मारांडी (acanthus ilicifolius) ही काटेरी पानांची वनस्पतीही अत्यंत दाटीवाटीने या खाडीकिनाऱ्यावर वाढलेली दिसते. ‘किर्पा’ (Lumnitzera racemosa) ही छोटी हिरवी पानं आणि पांढरी टिकलीसारखी दिसणारी फुलं असलेली वनस्पतीही इथे भरपूर दिसते. हिची बारीक मुळं जमिनीला समांतर लांबवर पसरतात. पांढरी सुगंधी फुलं आणि बोटभर लांबीच्या गुलाबी शेंगा असणारी ‘काजळा’ (aegiceras corniculatum) ही वनस्पतीही या खाडीकिनाऱ्यावरून फिरताना भरपूर दिसते. ‘तिवर’ या वनस्पतीचे Avicennia marina आणि Avicennia officinalis हे दोन प्रकार या खाडीकिनारी पाहायला मिळतात. ‘सोनचिप्पी’ (Ceriops tagal) ‘हुरा’ (Excoecaria agallocha), कोयनेल (Clerodendrum inermi) याही वनस्पती इथल्या कांदळवनातील कुटुंबसदस्य आहेत.

 

वनस्पतींप्रमाणेच इथली जैव विविधता समृद्ध करतात ते इथले मासे, खेकडे, पक्षी आणि इतर समुद्री जीव. वाटू, रावस, तांबवशी, पालू, बाणोशी, वाघळी, कोंबडा, शेंगटी, चांदमासा, गोबरा, करकरी, कोकर, कुंबारू, घावा, रेणवी, शेतुक, गुंजा, चेरय, शेवूट, चिंगूळ (ही सगळी अणसुरे खाडी परिसरातली स्थानिक नावे आहेत.) अशा हरतर्‍हेच्या माशांना या खाडीने आश्रय दिला आहे. ‘कुर्ली’ (Uca annulipes) हा या खाडीकिनारी सर्वाधिक आढळणारा खेकडा. याचा रंग लाल-पांढरा असतो आणि नांगी शरीरापेक्षा मोठी असते. ओहोटीच्या वेळी पाणी ओसरल्यावर चिखलात या खेकड्यांनी पाडलेल्या भोकांचं जाळं दिसतं. लांबून भरपूर फिरताना दिसणारे हे खेकडे जवळ गेलं की जमिनीत गडप होतात. कालवं (Oysters) आणि शिंग गोगलगाय (Telescopium telescopium) हेही इथे पुष्कळ प्रमाणात असणारे समुद्री जीव आहेत. याशिवाय अनेक तर्‍हेचे शिंपले, गोगलगायी आणि इतर समुद्री जीवांचा अधिवास या खाडीकिनारी प्रस्थापित झाला आहे.

 

या खाडीत तयार झालेली खारफुटीची छोटी छोटी बेटं ही बगळ्यांचं रोजचं निवासस्थान आणि घरटं करण्याची जागा बनली आहेत. कधीतरी चक्कर मारताना एखाद्या बेटावर शंभर-सव्वाशे बगळे एकत्र बसलेले पाहायला मिळतात. राखी बगळा (Grey Heron), गायबगळा (Cattle Egret) आणि हिरवा बगळा (Little Green Heron) हे इथे प्रामुख्याने दिसतात. मराल (Lesser Whistling Duck) हा बिनशेपटीचा पक्षीही इथे भरपूर प्रमाणात दिसतो. सुमारे 60-70 मरालांचा थवा इथे पाहायला मिळतो. एखाद्या जलतरणपटूसारखा एका बाजूने पाण्यात डुबकी मारून दुसऱ्या बाजूने वर येणारा छोटा पाणकावळा मन मोहून टाकतो. हिरवा तुतारी (Greenshank) आणि लाल तुतारी (Redshank) हे दोन स्थलांतरित पक्षी थंडीच्या दिवसांत लडाख प्रांतातून येथे वास्तव्यास येतात. रातबगळा उर्फ कोका (Night Heron) हा निशाचर पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रात्री मोठ्या आवाजात ओरडतो. तो ओरडायला लागला की ‘कोका मिठाला चालला’ असं लोक गमतीने म्हणतात. याशिवाय कुदळ्या (Glossy Ibis), चिखल्या (Plover), इबुकली (Little Grebe), लाजरी पाणकोंबडी (White Breasted Waterhen), शेकाट्या (Black Winged Stilt), ताम्रमुखी टिटवी (Red Wattled Lapwing) अशा अनेक प्रकारचे सुंदर पाणपक्षी या खाडीतले कुटुंबीय आहेत. जलमांजर (ज्यांना स्थानिक भाषेत ‘उद’ म्हणतात) इथल्या कांदळवनात क्वचित पाहायला मिळते.

 

इथे राहणारा प्रत्येक माणूस प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या खाडीवर अवलंबून आहे. इथल्या सुमारे 10 हजार लोकांच्या उपजीविका इथल्या मासेमारीवर अवलंबून आहे. ‘कालवं बोचणे’ हा इथल्या महिलांचा मोठा उद्योग आहे. कालवं, चिंगळं, खेकडे, मासे यांना स्थानिक मागणी तर आहेच, पण राजापूरला तालुक्याच्या ठिकाणी नेऊन हे सगळं विकण्याचा व्यवसायही इथले बरेच लोक करतात. ‘वाण लावणे’ ही इथली मासेमारीची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. ओहोटीच्या वेळी खाडीत सुमारे 25 ते 50 मीटर परिघाचं अर्धवर्तुळाकार जाळं प्रवाहाच्या विरुद्ध उभं करतात. भरती लागल्यावर पाण्याच्या लोटाबरोबर येणारे मासे जाळ्यात अडकतात. तसंच या जाळ्याच्या मध्यभागी उभं राहून माणूस जोरजोराने पाण्यावर काठी हाणतो. त्या धक्क्याने मासे पळतात आणि जाळ्यात अडकतात. खारफुटीच्या जंगलातली लाकडं स्थानिक लोक सरपणासाठी वापरतात. अर्थात, हल्ली बऱ्याच घरांमध्ये गॅस आल्यामुळे ही तोड कमी झाली आहे. या खाडीमुळेच आजूबाजूच्या गावांमधली भूजल पातळी राखली गेली आहे आणि इथल्या विहिरींना मुबलक पाणी आहे. कांदळवनातील बऱ्याचशा वनस्पती उन्हाळ्याच्या सुरुवातीला फुलतात आणि त्यांचा बहर तीन-चार महिने असतो. यांच्या फुलांमधून मधमाशांना मोठ्या प्रमाणात मध मिळतो. तसंच इथल्या प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही औषधी उपयोग आहेत. खारफुटीचं जंगल खाडी स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. पाण्यातील सगळा कचरा खारफुटीच्या मुळांमध्ये अडकतो आणि पाणी स्वच्छ होतं. अर्थात, खाडीकिनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळी सहज चक्कर टाकली, तर कांदळवनात प्लास्टिक पिशव्या, चप्पल, रबरी टायर, दारूच्या बाटल्या, औषधांचे खोके, थर्माकोलची मखरं असा सगळा अविघटनशील कचरा साठलेला दिसतो तेव्हा मात्र मन विषण्ण होतं. कांदळवन हे मासे आणि अनेक समुद्री जीवांचं प्रजननकेंद्र आणि आश्रयस्थान असतं.

 

आजपर्यंत या खाडीचं सौंदर्य, इथली जैवविविधता आणि अधिवास उत्तमपैकी टिकून आहे. पण अजून 25 वर्षांनी या खाडीचं रूप काय असेल? ती आजच्यासारखीच स्वच्छ आणि जिवंत असेल? की कोकणातल्या वाशिष्ठी-जगबुडी नद्यांसारखी विषवाहिनी बनलेली असेल? या खाडीकिनारी राहण्याचा, भटकण्याचा, मासेमारी करण्याचा, कालवं बोचण्याचा, पक्षीनिरीक्षण कऱण्याचा आनंद अजून 25 वर्षांनी इथल्या लोकांना मिळेल का?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@