कठीण समय येता…
महा एमटीबी   03-Sep-2018
 

‘…..ये केव्हाही परि रात्र नको चांदणी
तुटताना वाटे जावे तम उजळुनी’
 
वि. स. खांडेकर यांनी प्रत्यक्ष स्वत:च्या मृत्यूला उद्देशून लिहिलेल्या या ओळी जेव्हा मी पहिल्यांदा वाचल्या तेव्हा अक्षरश: अंगावर काटा आला. जातानादेखील कुणाच्या तरी जीवन-अंध:कारात थोडासा प्रकाश देऊन जावा ही यातली भावना प्रेरक आहे. एकूणच शेवटपर्यंत परोपकार करीत रहावे, आणि जीवन संपल्यावरही कुणाला तरी आपला उपयोग व्हावा हा भाव आपल्याकडे पूर्वापार रुजलेला आहे. मुळातून असलेला हा भाव अवयवदानासारख्या पुण्यकर्माशी सहज जोडता येतो. कारण मृत व्यक्तीच्या शरीरातील डोळे, यकृत, मुत्रपिंड आणि हृदयासारखे महत्वपूर्ण अवयव गरजू रुग्णास नवजीवन देऊ शकतात हे तर आता आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक यशस्वी प्रत्यारोपणांतून सिद्ध केलं आहे. अर्थात अशा प्रकारे अवयवप्रत्यारोपण झालेले रुग्ण पुन्हा एकदा स्वस्थ जीवनाचा आनंद, तोही दीर्घकाळ घेऊ शकतात हे अनुभवसिद्ध आहे. त्यामुळे ’मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ या उक्तीचाच आधुनिक काळातील हा नव-आयाम म्हणायला हरकत नाही.
 
परंतु, ’तुटताना तम उजळण्याचा’ किंवा ’कीर्तीरूपे उरण्याचा’ भाव नि:संशय उदात्त असला तरी प्रत्यक्ष अवयव-प्रत्यारोपण प्रक्रिया आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे त्याची पूर्वतयारी ही अत्यंत बिकट बाब आहे. एकाच वेळी अनेकांना अचानकपणे आणि अनिवार्यपणे कामाला लावणारा हा एक ’डेंजर कॉल’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. कारण एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर वरील अवयवांचा गरजू रुग्णासाठी उपयोग करावयाचा झाल्यास मृत्यूनंतर खूप कमी वेळात पुढील प्रक्रिया करणे अत्यावश्यक असते. त्यामुळे अर्थातच अवयव, तंत्र, तंत्रज्ज्ञ वगैरे सर्व बाबींपेक्षा वेळ अधिक महत्वाचा ठरतो. मृत व्यक्ती जिथे असेल त्या ठिकाणाहून आवश्यक ते अवयव, जिथे प्रत्यारोपण होणार आहे, अशा ठिकाणी लवकरात लवकर स्थानांतरित करणे, हे मोठे जिकिरीचे काम असते. तरी आता याबाबतीत बऱ्यापैकी जागरण होत आहे. अशा स्थानांतरणासाठी ’ग्रीन कॉरिडॉर’ सारखी यंत्रणा उभी करणे वगैरे गोष्टी आता आपल्याकडेही लोकांच्या अंगवळणी पडु लागल्या आहेत. पण केवळ ग्रीन कॉरिडॉर उभारुन अवयव योग्य त्या ठिकाणी पोहोचला म्हणजे झाले, असे नव्हे, तर या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तघटकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गरज भासते. विशेषत: यकृत, गर्भाशय अशा अवयवांच्या प्रत्यारोपणांमध्ये तर फ़ार मोठ्या प्रमाणावर रक्तघटकांची गरज भासु शकते. एकाच रुग्णासाठी लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, प्लाज्मा असे रक्तघटक पन्नास-पन्नासाच्या संख्येतही लागु शकतात. त्यामुळे अगदी अचानकपणे एकाच रक्तगटाचे रक्तघटक तेही इतक्या मोठ्या प्रमाणात सज्ज ठेवणे हे कामही अवयव-प्रत्यारोपणाचे वेळी महत्वपूर्ण ठरते. ही तयारी असल्याशिवाय डॉक्टर्सही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायला धजत नाहीत, हे वास्तव आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे, कारण अशा वेळी जर रक्तघटकांची उणीव भासली तर एखाद्या चालत्या-बोलत्या व्यक्तीच्या जीवाला अचानकपणे धोका उत्पन्न होऊ शकतो. म्हणूनच अवयव-प्रत्यारोपण हा रक्तघटकांसाठीदेखील ’डेंजर कॉल’च असतो.
 
हाच सर्व विचार करुन ग्लोबल हॉस्पिटल, परळ (मुंबई)चे डॉ. राजीव निकते यांनी गेल्या वर्षी जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये सातत्याने यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु यासाठी लागणाऱ्या रक्तघटकांच्या उपलब्धतेसाठी मात्र त्या त्या वेळी प्रचंड धावपळ करावी लागत होती. प्रत्येक वेळी तेथील टीमचा जीव – या रक्तघटकांपायी - अक्षरश: टांगणीला लागत होता. या सर्व परिस्थितीचा विचार करुन डॉ. निकते यांनी याबाबतीत जनकल्याण रक्तपेढीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि ’जनकल्याण’च्या नित्यसिद्धतेच्या परंपरेला अनुसरुन डॉ. कुलकर्णी यांनी त्यांना आश्वस्त केले. पण अर्थातच पुण्यातून मुंबईच्या एका रुग्णालयास कुठल्याही वेळी येऊ शकणाऱ्या मागणीनुसार आवश्यक त्या रक्तघटकांचा पुरवठा करणे ही काही साधी बाब नव्हती. कारण हे रक्तघटक या रुग्णालयात प्रत्यक्ष नेऊन पोहोचवायचे होते, तेही मागणी येईल तेव्हा लगेच, तातडीने ! आणि हे काही ’ऑनलाईन ट्रांजॅक्शन’ नव्हते. म्हणजेच कुठल्याही वेळी मुंबईला जाण्यासाठी एक मनुष्य कायम तयारच ठेवावा लागणार होता. शिवाय एकाने कुणीतरी ठरवूनही हे काम होण्यासारखे नव्हते. स्वागतकक्ष, तांत्रिक विभाग, कुरियर सेवा, चालक यांच्यासह डॉक्टर्स, जनसंपर्क अधिकारी अशा सर्वांनीच आपापली जबाबदारी योग्य वेळेत निभावली तरच हे जुळण्यासारखे होते. पण यातील सर्वांनीच अत्यंत सकारात्मक पद्धतीने ही नवीन जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर जनकल्याण रक्तपेढीमार्फ़त या अनोख्या सेवेला प्रारंभ झाला.
 
ग्लोबल हॉस्पिटलचा हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ’प्रत्यारोपणा’ची धांदल काय असते, ते आम्हाला खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळाले. दिवसा, रात्री, अपरात्री अशा कोणत्याही वेळेला ग्लोबल’मधून रक्तघटकांची मागणी येऊन धडकली की, मग सर्व स्तरांवर पटापट सूत्रे हलु लागली. तांत्रिक विभागाकडुन सर्व रक्तघटकांची त्वरेने जुळवणी, त्याच वेळी कुरियर सेवा अथवा चालकांची जुळवाजुळव, दोन्हीकडच्या डॉक्टरांचे संवाद अशा सर्व संबंधित सोपस्कारांची सर्वांना हळुहळु सवय होऊ लागली. यात प्रत्यक्ष रक्तघटक घेऊन जाणारा कुरियर कर्मचारी वर्ग म्हणजे आमच्या दृष्टीने ’मॅन ऑफ़ द मॅच’ म्हणायला हरकत नाही. कारण वेळी-अवेळी स्वत: ओढाताण सहन करत मिळेल ती गाडी पकडुन वेळेच्या आत रक्तघटक योग्य त्या ठिकाणी पोहोचविणे हे काम खरोखरीच सहनशक्तीची परीक्षा पाहणारे काम आहे. त्यात रक्तघटकांची वाहतुक करताना त्यांची शीतसाखळी सांभाळणे हेही महत्वाचे, किंबहुना यावरच त्यांचा परिणाम सर्वथा अवलंबुन असतो. अचानकपणे अंगावर येणारे हे पळापळीचे काम बघून ’हे आपण करायलाच हवे का ?’ अशी शंकाही काही जणांच्या मनात प्रारंभीच्या काळात स्वाभाविकपणे उत्पन्न झाली. पण या पळापळीमुळे एक जीवन सावरले जाणार आहे, यांचे गांभीर्यही यथावकाश सर्वांच्याच लक्षात आले. प्रत्येक मागणीच्या वेळी सर्वांचे टीमवर्क मोठेच काम करुन गेले आणि ग्लोबल हॉस्पिटलसारख्या मुंबईतील रुग्णालयासही ’जनकल्याण रक्तपेढी’बद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. ज्या ज्या वेळी अशी मागणी येऊन धडकली, त्या प्रत्येक वेळी जनकल्याणने हा विश्वास सार्थ ठरविला. एकदा तर रात्री दहाच्या आसपास अचानकपणे ’सिंगल डोनर प्लेटलेट’ या रक्तघटकाची मागणी आली, तीही सकाळी होऊ घातलेल्या शस्त्रक्रियेकरिता. असे दोन रक्तघटक लागणार होते, पण त्यावेळी रक्तपेढीत उपलब्ध मात्र एकच होता. पण अशा वेळीही ’नाही’ असे उत्तर न जाता त्वरेने फ़ोनाफ़ोनी झाली. एक बहाद्दर ’प्लेटलेटदाता’ साडेअकराच्या सुमारास रक्तपेढीत आला. प्लेटलेटदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली आणि पहाटेपर्यंत आवश्यक ते रक्तघटक ग्लोबलमध्ये पोहोचलेसुद्धा !
 
पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले, तेव्हाही आवश्यक त्या रक्तघटकांच्या साठ्यासह जनकल्याण रक्तपेढीचा एक कुरियर कर्मचारी पूर्णवेळ या रुग्णालयात ठिय्या देऊन बसला आणि त्यामुळे अर्थातच प्रत्यारोपण करणारी डॉक्टरांची टीम आश्वस्त झाली. यानंतरही अशी दोन प्रत्यारोपणे गॅलेक्सीमध्ये संपन्न झाली, त्याही वेळेला रक्तपुरवठ्याची महत्वाची बाजू सांभाळली ती जनकल्याण रक्तपेढीनेच.
 
’हे आपणच करायचे का ?’ या सार्वत्रिक प्रश्नाला ’जनकल्याण रक्तपेढी’ मधील उत्तर तरी ’होय, हे आपणच करायचे आहे आणि तडीलाही न्यायचे आहे’ असे आहे. ही सकारात्मकता वरपासून खालपर्यंत रुजलेली आहे. त्या बळावरच आजमितीला जनकल्याण रक्तपेढीची सेवा पुणे वगळता महाराष्ट्रातील सुमारे दहा ते बारा जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांना दिली जात आहे. संपूर्णत: स्वेच्छा रक्तदात्यांकडुन संकलित झालेले आणि अत्यंत अद्ययावत अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रक्रिया झालेले रक्त सहजपणे सर्वदूर भागांमध्ये उपलब्ध होत आहे.
 
प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या बाबतीत बोलायचे तर हे जग सोडुन जात असताना ’जावे तम उजळुनी’ असे वाटणे आणि जगतानाही ’कीर्तीरूपे उरण्यासाठी’ रक्तदानासारखी साधना अखंडपणे करीत राहणे या दोन्ही गोष्टी गुणात्मकदृष्ट्या सारख्याच आहेत. कारण ’परोपकार’ हा भाव दोन्हीकडे एकच आहे.
 
अशा कठीण समयी हा भावच खऱ्या अर्थाने बळ देतो.
 
 
 
- महेंद्र वाघ