एनएसजी सदस्यत्त्वासाठी ब्रिटन भारताचे समर्थन करणार
महा एमटीबी   28-Sep-2018
 
 

नवी दिल्ली : अणुपुरवठादार गट म्हणजेच न्युक्लिअर सप्लायर ग्रुप (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यासाठी तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनने जाहीर केले आहे. गटात सहभागी होण्यासाठी भारताने वारंवार योग्यता सिद्ध केल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान निर्यातीच्या नियंत्रणासाठी चार मुख्य व्यवस्था आहेत. १९७४मध्ये भारताने केलेल्या अणुचाचणीवर प्रतिक्रिया म्हणून एनएसजीची स्थापना करण्यात आली होती.

 

ब्रिटन भारताकडे एक जबाबदार देश म्हणून पाहत आहेत. वारंवार चीनने विरोध केलेला असतानाही भारत पुन्हा एकदा एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. अमेरिकेसह झालेल्या 2+2 डायलॉग आणि अमेरिकेकडून भारताला टियर-1 देशांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने अमेरिका एनएसजी सदस्यत्वासाठी मदत करेल अशी भारताला अपेक्षा आहे. गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर राजकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनकडून सांगण्यात आले की, ‘भारताकडे एनएसजी सदस्यत्व मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी आणि योग्यता आहे. त्यांना सदस्यत्व मिळाले पाहिजे असे आमचे मत आहे. आता हे चीनच सांगू शकतो की त्याला भारताच्या सदस्यत्वावर आक्षेप का आहे’.

 

उत्तर कोरिया आणि इराणच्या मुद्द्यावर भारत आणि ब्रिटनची भूमिका सारखीच आहे. गुरुवारी ब्रिटनने भारताच्या त्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले, जेव्हा त्यांनी ब्रिटनच्या प्रस्तावाचा विरोध केला. हा प्रस्ताव रासायनिक शस्त्रांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांसंबंधी होता. भारताने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. भारत आपल्या निर्णयावर पुनर्विचार करेल अशी अपेक्षा ब्रिटनकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

         माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/