पुणे : ब्र, भिन्न आणि कुहू आदी गाजलेल्या कादंबरींकार, लेखिका आणि कवियत्री कविता
महाजन यांचे आज सायंकाळी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. कविता महाजन या काही दिवसांपासून न्यूमोनियाने
त्रस्त होत्या. बाणेरच्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापासून
फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता. कविता महाजन या महिनाभरापूर्वीच पुण्याला मुलीकडे गेल्या होत्या. मुलीला
ताप येत असल्याने त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनाही ताप आणि फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागला.
दरम्यान त्यांना बाणेरच्या चेलाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कविता महाजन यांचा कुहू हा लेखसंग्रह लहान मुलांमध्ये
खूपच लोकप्रिय झाला होता. तसेच म्रृगजळीचा हा काव्यसंग्रह, ब्र आणि भिन्न या कादंबऱ्याही गाजल्या होत्या.
उर्दू भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते.
कविता महाजन यांचा जन्म नांदेड मधला. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या कन्या होत. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती. त्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८) मध्ये मिळाला होता. याचबरोबर कवयित्री बहिणाबाई पुरस्कार (२००८), साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला, २०११), मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/