चक्क शरद पवारांकडून संघाचे कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2018
Total Views |




मुंबई: “देशात किंवा राज्यात आलेल्या कोणत्याही संकटावेळी मदतीला धावून जाणारे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असतात. विधायक कामांच्या माध्यमातून संघ आतापर्यंत जनतेसमोर जात होता आणि संघाने संवादसेतुद्वारे आपली प्रतिमा व्यापक करण्यावर भर दिला आहे,” अशा शब्दांत शरद पवार यांनी संघाचे कौतुक केले.

 

‘न्यूज १८ लोकमत’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी आपल्या वृत्तवाहिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांना रा. स्व. संघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी पवारांनी संघाविषयी आपले मत मांडले. डॉ. उदय निरगुडकर यांनी दिल्लीमध्ये नुकत्याच रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या तीन दिवसीय जनसंवादाबाबत पवारांना मत विचारले. शरद पवारांनी उत्तरादाखल सांगितले की, “दोन-तीन वर्षांपूर्वी पुण्याजवळ रा. स्व. संघाचा कार्यक्रम, संचालन होते. यावेळी माझे मोठे बंधू तिथे गेले होते. यावेळी रा. स्व. संघाने दिल्लीमध्ये जनसंवादाचे आयोजन केले. संघ आता बदलत असून आतापर्यंत संघाला एक संकुचित, विशिष्ट जातीधर्माची विचारधारा मानणारी संघटना समजले जात होते. पण नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातून संघाने आपली जुनी प्रतिमा पुसून अधिक व्यापक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.”

 

संघाच्या कामाबाबत शरद पवार म्हणाले की, “देशात, राज्यात वा कुठेही भूकंप, पूर वा नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तींची संकटे आली की, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक लगेच धाव घेतात, ही संघाची जमेची बाजू आहे. संघाने आपल्या याच कामाच्या माध्यमातून जनतेसमोर आपली प्रतिमा उभी केली.” दरम्यान, राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी काँग्रेस व विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होत असताना “सरकारने राफेल विमानांशी संबंधित तांत्रिक बाबी उघड करु नयेत. मात्र, विमानांच्या किंमती सांगण्यास काही हरकत नाही,” असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

 

जिथे जातो तिथे संघाची पुस्तके वाचतो

 

शरद पवारांच्या मुलाखतीतील विशेष बाब म्हणजे संघाच्या पुस्तकांचे वाचन. शरद पवार म्हणाले की, गेली महिनाभर मी रा. स्व. संघाविषयीची निरनिराळी पुस्तके वाचत आहे. गोळवलकर गुरुजींचे विचारधन पुस्तक तर माझ्या पुण्यातल्या, मुंबईतल्या आणि दिल्लीतल्या घरीदेखील आहे. मी जिथे जातो, तिथे संघाची पुस्तके वाचतो, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@