जेथ श्रद्धा अन् भक्ती। तेथ होय भगवत् प्राप्ती॥
महा एमटीबी   26-Sep-2018भक्तीमधून मनाची शक्ती वृद्धीत होते. जीवनाची चंचलता नाहिशी होऊन भगवंताला सारसर्वस्व मानणं म्हणजे भक्ती होय. भक्ती जीवनाला व्यापते आणि चराचराला व्यापणाऱ्या भगवंताला आपलं मानते. रोजच्या दिनचर्येमध्ये भगवंत अग्रस्थानी आला की भक्ती रुजली असे समजायला हरकत नाही.

 

भक्ती आणि श्रद्धा यांचा अगदी जवळचा संबंध आहे. भगवंतावर प्रेम करणं म्हणजे भक्ती होय. त्याच्याविषयीचे विचार सदैव असणे आणि या विचारानुसार आचार आपोआप घडवते ती भक्ती! भगवंताच्या गुणांनी प्रभावित होऊन त्याच्या सतत सान्निध्याचा ध्यास लागतो ती भक्ती! भक्ती म्हणजे भगवंताच्या रुपामध्ये रमून जाणं होय. नारदमुनींची भक्तिसूत्रं सुप्रसिद्ध असून जो त्यानुसार जीवन जगतो ना त्याचं जगणं सार्थकी लागतं. अखंड अनुसंधानात ठेवते ती भक्ती! भक्ती मोठी भावपूर्ण असून अस्थिर भावनांना भगवंताच्या चरणी स्थिर करते. भक्तीमधून मनाची शक्ती वृद्धीत होते. जीवनाची चंचलता नाहिशी होऊन भगवंताला सारसर्वस्व मानणं म्हणजे भक्ती होय. भक्ती जीवनाला व्यापते आणि चराचराला व्यापणाऱ्या भगवंताला आपलं मानते. रोजच्या दिनचर्येमध्ये भगवंत अग्रस्थानी आला की भक्ती रुजली असे समजायला हरकत नाही. भगवंताच्या भरवशावर येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचं बळ यामधून मिळतं. त्याच्या इच्छेला महत्त्व देऊन सहजपणानं मान तुकवली जाते. स्वतःची इच्छा यापेक्षा भगवंताची इच्छा हा भाव अंत:करणात स्थिर झाला की अस्थिरता संपुष्टात येते.
 

भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला गोपींची अवस्था बघण्यासाठी गोपींकडे पाठवलं, गोपी श्रीकृष्णाच्या अलौकिक सौंदर्याचं वर्णन उद्धवला सांगताना देहभाग विसरुन गेल्या. त्याच्या बासरीच्या सुरांमधून नादब्रह्मापर्यंत सहजपणानं कशा गेल्या, ते कथन करू लागल्या. खाताना, पिताना, कर्म करताना त्यांच्या मनात श्रीकृष्णाशिवाय अन्य विचार नव्हता. त्यांच्या दिवसाचा प्रारंभ श्रीकृष्णापासून होऊन निद्रेच्या अधीन श्रीकृष्ण स्मरणात होत असलेल्या उद्धवाने बघितलेल्या गोपी कृष्णमय होऊन गेल्या होत्या. त्यांना कृष्णाशिवाय चैन पडत नव्हतं. जळी-स्थळी- काष्ठी-पाषाणी गोपींना श्रीकृष्णच दिसायचा. गोकुळात कृष्णासह गोपी रमून गेल्या होत्या. त्यांचं देहभान, देहभाव केव्हाच नाहीसं झालं होतं. गोपी देहभावावरून देवभानापर्यंत कोणतेही विशेष साधन न करताही पोहोचलेल्या होत्या. गोपींची उत्कट भक्ती बघून उद्धव थक्क झाला.

 

गोकुळ श्रीकृष्णमय झालेलं होतं. रोजचं जगणं गोपी विसरून गेल्या होत्या. कृष्णाभोवती त्यांचं भावविश्व फिरत होतं. त्यांना लौकिकाचा विसर पडलेला होता. भक्तीची किमया उद्धवानं जवळून निरखली. यज्ञ, याग, योग अशा अवघड साधनांचा अवलंब न करताही त्यांनी कृष्णप्रेमाचंअमृत प्राशन केलं. साधी, सोपी, सरळ भक्ती गोपींना थेट भगवंताच्या, कृष्णाच्या हृदयात स्थान देऊन गेली. भक्ती किती सुंदर बदल घडवून आणू शकते, ते सगळ्या गोपींकडे बघितल्यावर लक्षात येतं. गोपींच्या चित्ताची चोरी करणारा ‘चित्तचोर’ मोठा खट्याळ ! बासरीच्या नादासवे, यमुनेच्या जळासवे, गोवत्सासवे अवघ्या सृष्टीला भारून टाकणारा श्रीकृष्ण! त्याची विविध रुपं, नाना खोड्या गोपींना वेड लावत होत्या. इतर लोकांना श्रीकृष्णाच्या अफाट शक्तीची विशेष कल्पना आली नाही. सामान्य गोपींना मात्र कृष्ण ओढ अनावर झाली. त्याच्या अस्तित्वानं त्यांचं अस्तित्व मिटवून टाकलं. त्या सामान्य असूनदेखील श्रीकृष्णभक्तीमुळे असामान्य ठरल्या. हिमालयात जाऊन साधना, घोर तपश्चर्या करणाऱ्या साधू-संन्यासी यांना भगवंताची प्राप्ती होतेच असं नाही. त्यांना अनेक जन्म घ्यावे लागतात. गोपींना मात्र एका भक्तीमुळे असाध्य अशा भगवंताची प्राप्ती झाली. भक्तीचा आदर्श म्हणजे ‘गोपी’होय.

 

भक्ती कधी एकटी येत नाही. श्रद्धेला घेऊन येते. श्रद्धा म्हणजे संशय रहित होऊन भगवंतावर भार सोपवणं होय. श्रद्धेमुळे विश्वास हाच खास श्वास होऊन जातो. श्रद्धेची पाळं-मूळं खोलवर गेली की जगण्याला बळ मिळतं. कमकुवतपणा संपून जातो. भगवंतावर पूर्ण भार टाकला जातो. त्यामुळे भगवंत आधार देतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात श्रद्धेचे महत्त्व विषद केलेलं आहे. श्रद्धा बळकट झाली की संकटात दोन हात करण्याचं बळ प्राप्त होतं. जो श्रद्धावान असतो ना, त्याला दु:ख स्पर्श करू शकत नाही. श्रद्धा पक्की असण्याची खूण म्हणजे श्रद्धावानाचं मन कायम शांत असणं. जगाविषयी कल्पना बदलायला श्रद्धा हाच एकमेव मार्ग आहे. हे संपूर्ण जग मिथ्या आहे तरी, आपण ते खरं मानतो. त्यामुळे दु:ख भोगतो. ज्ञानेश्वर महाराज श्रद्धेचं महत्त्व मोठ्या खुबीनं सांगतात की, भगवंताच्या चरणी आणि त्याच्या करणीवर पूर्ण श्रद्धा ठेवली की तो प्राप्त होतो. श्रद्धा नसेल तर मनुष्य जन्म व्यर्थ जातो. ईश्वराच्या शक्तीवर श्रद्धा असली की सगळं जगणं आशयघन होऊन जातं. विश्वामध्ये विविधता आहे. दृश्य विश्वाच्या मागे अदृश्य असं विश्वमन आहे. ती अज्ञान शक्ती अव्यक्त आहे. त्यावर श्रद्धा असणं आवश्यक आहे. अज्ञात शक्ती जे काही घडवून आणते ना ते भगवताचं ऐश्वर्य आहे. भगवंताच्या ऐश्वर्याची अनुभूती दृढ श्रद्धेशिवाय येणं शक्य नाही. भक्ती आणि श्रद्धा एकमेकींच्या प्रिय सख्या आहेत. या सख्या समवेत जो जगतो तो भगवंताचं ऐश्वर्य उपभोगतो. अक्षय आनंदाचा धनी होऊन ऐश्वर्यात राहतो. ज्ञानेश्वर माऊली लिहिते,

 

हा आमुचा ऐश्वर्य योगु।

तुवां देखिल की चांगु।

 

अर्जुनाला ऐश्वर्ययोगाचं गूढ भगवान श्रीकृष्ण भक्ती आणि श्रद्धा यामधून सहजपणानं उकलेलं असं आश्वासकपणानं कथन करतात. भक्तीसह श्रद्धा आणि श्रद्धेसह भक्ती लाभली की, भगवंतप्राप्तीचा लाभ सहजपणानं प्राप्त होतो. तो लाभ आपण प्राप्त करून घेण्याची घाई करणं अगत्याचं आहे.
 
 
-कौमुदी गोडबोले