समर्थांचे धारिष्ट...
महा एमटीबी   26-Sep-2018


 


परकीय सत्तेचा तो जुलमी कालखंड हिंदू देवदेवतांच्या दृष्टीने, हिंदू संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने फार कठीण होता. मुसलमानी अंमलामध्ये मूर्ती स्थापन करणे, देवालये बांधणे, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, देवदेवतांचे सार्वजनिक उत्सव करणे या गोष्टींना मनाई होती. पण, समर्थ मसूरला आल्यानंतर त्यांनी ही बंदी मोडण्यास सुरुवात केली.

 
 
मर्थस्थापित वीर मारुती म्हणजेच प्रतापमारुती आणि दासमारुती स्थापन करण्यात समर्थांचा काय उद्देश होता, त्यात काय सांकेतिकता दडली होती, याचा आढावा आपण घेतला. परंतु, या मूर्ती स्थापन करणे तसेच रामजन्मोत्सव साजरा करणे यांसाठी किती धैर्य लागते याची आज आपण कल्पना करू शकत नाही. परकीय सत्तेचा तो जुलमी कालखंड हिंदू देवदेवतांच्या दृष्टीने, हिंदू संस्कृती रक्षणाच्या दृष्टीने फार कठीण होता. मुसलमानी अंमलामध्ये मूर्ती स्थापन करणे, देवालये बांधणे, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, देवदेवतांचे सार्वजनिक उत्सव करणे या गोष्टींना मनाई होती. पण, समर्थ मसूरला आल्यानंतर त्यांनी ही बंदी मोडण्यास सुरुवात केली. या परगण्याची देशमुखी व जहांगिरी शहाजीराजांकडे असली तरी आदिलशहाचे स्थानिक अधिकारी मुसलमान होते. त्यांचा या गोष्टींना विरोध होता. रामदासांना अशा कठीण परिस्थितीत कार्य करायचे होते. त्यांचा आदर्श हनुमान होता. त्यामुळे कधी युक्तीने, तर प्रसंगी शक्तिप्रयोग करून त्यांनी सारे निभावून नेले. सुरुवातीच्या काळात समर्थांनी मुसलमान अधिकाऱ्यांना विरोध न करता युक्तीने सारे सांभाळून नेले. पण आपले संघटन तुटू दिले नाही. मसूर परगण्याची जहागिरी शहाजीराजांकडे येण्याअगोदर ती जगदाळ्यांकडे होती. जगदाळ्यांचा एक पूर्वज देशमुखीच्या वादात बहुदा बाटून मुसलमान झाला असावा. तो मेल्यानंतर मुसलमानांनी त्यालाच जलालउद्दीन बनवले व त्याच्या कबरीला ते ‘जलालउद्दीन पीर’ म्हणू लागले. तो हिंदुंचा ‘वीर’ व मुसलमानांचा ‘पीर’ झाला. हे मुसलमान तेथे दरवर्षी जलालउद्दीन उरुस भरवत असत. हा पीर नवसाला पावतो अशा अफवा तेथील मुजावरांनी पसरवल्या. त्यामुळे अनेक हिंदू त्या उरुसात हिरीरीने भाग घेत व आपला नवस फेडायला जात असत. त्याकाळी नवसाला पावणारे असे अनेक पीर होते. हे दर्गे व पीर नवसासाठी प्रसिद्ध होऊ लागले. हिंदू त्यांना नवस बोलत. इतकेच कशाला काही घरात पीराची पूजा करीत व त्याला नैवेद्य दाखवीत. या पीरांचे हिंदुंकडून होणारे पूजा नैवेद्य, उरुस, उत्सव पाहून, आपल्या लोकांचे धार्मिक अधःपतन पाहून समर्थांच्या मनाला यातना होत. आपल्या धर्मातील राम, कृष्ण, हनुमान या वीरांना हे लोक विसरले काय, असेही त्यांना वाटे. आपण त्यांचे उत्सव सार्वजनिक का करू नये, या विचाराने उचल खाल्ली.

 

मसूरला आल्यानंतर समर्थांनी इ. स. १६४५ साली मारुतीची स्थापना केली आणि नऊ दिवसांचा रामजन्मोत्सव साजरा केला. हा उत्सव सार्वजनिकरीत्या साजरा करण्यामागे पीर जलालउद्दीनच्या उरुसात जे हिंदू हिरीरीने भाग घेत असत, त्यांच्या उत्सवप्रियतेला वाट करून द्यावी व त्यांचे धार्मिक अधःपतन थांबावे असा असू शकेल. रामाच्या मिरवणुकीला तेथील मुसलमान अधिकाऱ्यांनी विरोध केला. समर्थांना त्याची कल्पना होती. त्यांनी अगोदरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशी परवानगी मिळवली होती. रामाचा उत्सव निर्विघ्न पार पडला. समर्थस्थापित मारुतीजवळ त्यांनी मठाची स्थापना केली. समर्थांचा मुक्काम जवळच्या डोंगरात किंवा घळीत असे. म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन मठाची देखभाल करण्यासाठी मुसळराम नावाच्या सशक्त शिष्याची योजना केली. तो मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. त्याच्या वाटेला जाण्याची कुणाची हिंमत नसे. आत्मारामस्वामी एक्केहाळीकर यांनी लिहिलेल्या ‘दास विश्रामधाम’ या समर्थचरित्रात मुसळरामाची कथा आहे. मुसळ खांद्यावर टाकून मनाचे श्लोक म्हणत तो गावात भिक्षा मागत फिरत असे. मुस्लीम फकिरांनी गावच्या मुख्य पठाणाकडे त्याची तक्रार केली. हे फकीर गुंड असत. सरदार पठाणाने त्यांना सुचवले की, या काफराशी समोरासमोर लढता येत नसेल, तर तो बेसावध असताना गुप्तपणे मठावर हल्ला चढवा. प्रथम मारुतीची मूर्ती फोडा आणि लांबूनच या मुसळरामाला बंदुकीतून गोळी झाडा. समर्थांना हे वृत्त कळताच ते तातडीने मसूरला आले आणि थेट सरदार पठाणासमोर उभे राहिले. समर्थांनी त्या पठाणाला एक सणसणीत मुस्कटात लगावली. समर्थांचा आवेश एवढा जबरदस्त होता आणि तडाखाही एवढा जोरदार होता की, तो पठाण समर्थांच्या पाया पडून गयावया करू लागला. समर्थ युक्तीबरोबर शक्तीचाही प्रयोग करीत.

 

असाच आणखी एक प्रसंगदास विश्रामधाम’ या ग्रंथात दिला आहे. त्यातून समर्थांचे धारिष्ट प्रत्ययास येते. समर्थांचा एक मठ माहुलीला होता. त्या मठावर मठाधिपती म्हणून समर्थांनी उद्धवबाबा या सात्विक महंताची नेमणूक केली होती. उद्धवबाबा सात्विक तसेच मवाळ होते. ते स्नानाला जात असताना तेथील मुसलमान त्यांची टवाळी करीत. पण, उद्धवबाबा शांतपणे मठाच्या तळघरात बसून भजन-पूजन करीत असत. माहुलीचा ठाणेदार मुसलमान होता. एक दिवस त्याच्या मनात आले, हा बाबा गावात फिरतो, भिक्षा मागतो. तेव्हा या ब्राह्मणाला पकडून त्याला मुसलमान बनवून बाटवून टाकू. म्हणजे आपोआप मठही गुंडाळावा लागेल. त्याने ठरवले, या ब्राह्मणाला पकडा. त्याची सूंता करा. काजीलाही बोलावून आणले व उद्धवबाबाला बाटवण्यास सांगितले. ही बातमी गावात पसरली. पण भ्याड गावकरी आपापल्या घरात लपून बसले. समर्थांना ही बातमी कळताच ते त्वरेने माहुलीस आले. त्यांच्या हातात वेताची छडी होती. ती छडी घेऊन ते काजीवर धावून गेले आणि त्याला झोडपून काढले. ‘दास विश्रामधाम’ ग्रंथात काजीची अवस्था वर्णन केली आहे
 

छडी पादुका घेऊनि गुरूराय।

चौताळले जसा मारुती ।

म्हणोनि ये कें करा रे पाजी ।

ताडिता उभ्याने मुततो काजी ॥

तोबा तोबा न ज्यानो हमजी ।

या अल्ला या खुदा म्हणतसे ॥

 

काजीची अशी दयनीय अवस्था झाल्यावर समर्थ ठाणेदाराकडे वळले. त्यालाही समर्थांनी चोप दिला. ‘भुईस पाडिले मारमारी।’ असा चोप बसल्यावर तोही समर्थांना शरण आला. मुसलमानी राजसत्तेच्या तीव्र विरोधामुळे समर्थांच्या धर्म व हिंदू संस्कृती रक्षणाच्या कामास राजकीय वळण लागले हे समजून घेतले पाहिजे. म्हणजे समर्थांना कोणी रूढी-परंपरावादी फक्त पूजाअर्चा करणारा ब्राह्मण म्हणणार नाही.
 

-सुरेश जाखडी

[email protected]