मालदीवसाठी आशेचा किरण...
महा एमटीबी   25-Sep-2018


 

 

सोलिह व त्यांचा पक्ष कट्टर चीनविरोधी असल्याने भारताला पुन्हा एकदा मालदीवशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यास संधी मिळाली आहे. यासोबतच चीनला नामोहरम करत चीनला एक मोठा धक्का देण्याची आयती संधी भारत आणि सोलिह यांना चालून आली आहे.

 

मालदीव हा भारताचा अत्यंत जवळचा शेजारी. भारताच्या तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारीपासून अवघ्या 800 किमी अंतरावर वसलेले हे अत्यंत छोटे द्वीपराष्ट्र. हिंदी महासागरातील अनेक बेटांचा समूह असलेला मालदीव येथील स्वच्छ नितळ पाणी आणि उंची रिसॉर्टसाठी ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात वादग्रस्त ठरलेल्या याच मालदीवमध्ये सोमवारी ऐतिहासिक घटना घडली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये वादग्रस्त वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांचा जोरदार पराभव झाला असून इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. मालदीव प्रोग्रेसिव्ह पक्षाचे उमेदवार अब्दुल्ला यामिन यांच्याविरोधात मालदिवीयन डेमोक्रेटिक पक्षाचे इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी निवडणूक लढवली होती. यात यामिन यांना 41.7 टक्के मते मिळाली, तर मालदीवच्या नागरिकांनी सोलिह यांना बहुमत मिळवून देत 58.3 टक्के मते दिली. मालदीवच्या नागरिकांचा हा ऐतिहासिक कौल मानला जात असून हाच ऐतिहासिक कौल मालदीवच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

 

रविवारी 23 सप्टेंबर रोजी मालदीवमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, यामिन आणि सोलिह या दोघांमध्येच या निवडणुकीची चुरस होती. यामध्ये 88 टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवला होता. वर्तमान राष्ट्रपती यामिन यांच्याविरोधात प्रचंड रोष असल्याचे येथील जनभावनेवरुन समजते. त्याचा परिणाम हा रविवारी झालेल्या निवडणुकीत आणि सोमवारी झालेल्या मतमोजणीत पाहायला मिळाला. या निवडणुकीत 2 लाख, 62 हजार नागरिकांनी मतदान केले होते. यापैकी यामिन यांना 95 हजार, 526 मते मिळाली तर सोलिह यांना 1 लाख, 33 हजार,808 मते मिळाली. आपल्या ऐतिहासिक विजयानंतर सोलिह यांनी मालदीवच्या नागरिकांना पहिल्यांदा संबोधित करताना म्हटले की, “हा माझ्यासाठी, माझ्या देशासाठी आणि माझ्या देशातील नागरिकांसाठी आनंदाचा क्षण आहे. यापुढे आपल्या देशात फक्त शांतता असेल आणि फक्त विकासावर भर दिला जाईल.” सोलिह यांचा हा ऐतिहासिक विजय भारताच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा मानला जात आहे. कारण सोलिह हे भारताचे समर्थक असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहेत.

 

अब्दुल्ला यामिन नोव्हेंबर 2013 मध्ये राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात अनेक राजकीय पक्ष, न्यायालये आणि मीडिया यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला. यात अनेक जण तुरुंगात गेले, तर अनेकांना आपला देश सोडून दुसर्‍या देशात स्थलांतर करावे लागले, तर गेल्या काही महिन्यांपूर्वी मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने यामिन सरकारला राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रपती यामिन यांनी हा आदेश झुगारत देशात 15 दिवस आणीबाणी लागू केली आणि न्यायाधीशांचीच तुरुंगात रवानगी केली. अशा या हुकूमशाही यामिन यांच्यामुळे मालदीवला आपल्या जवळ करायला चीनला बाहुला मिळाला होता. त्यात यामिन यांची विचारसरणी चीनच्या बाजूने झुकणारी होती. त्यामुळे चीनचे काम अत्यंत सोपे झाले होते. विशेष म्हणजे 2011 सालापर्यंत मालदीवमध्ये चीनचे साधे दूतावासदेखील नव्हते. मात्र, यामिन राष्ट्रपती झाल्यानंतर चीनने या ठिकाणी सैनिकी तळ सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळेच 2013 साली यामिन हे राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यापासून जुने मित्र असलेले भारत आणि मालदीव यांचे संबंध बिघडले होते.

 

यामिन हे चीनचे समर्थक असल्याने त्यांनी चीनसोबत मुक्त व्यापार करार करत चीनला आपल्या देशात मुक्त हस्त दिला होता. यामुळे चीनच्या कंपन्यांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत भारताला धोका निर्माण केला. गेल्या काही वर्षांपासून भारत आणि चीनचे संबंध बिघडले आहेत. यामुळे चीन भारतविरोधी कारवाया करत असून भारताला चहूबाजूने घेरणार्यांसाठी भारताला लागून असलेल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. याचाच भाग म्हणून हिंदी महासागरात भारताला घेरण्यासाठी चीनने मालदीवमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती ओढवली तर चीन मालदीवचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकत होता. त्यामुळे भारताला मालदीवला जवळ करणे अत्यंत आवश्यक होते. सोलिह व त्यांचा पक्ष कट्टर चीनविरोधी असल्याने भारताला पुन्हा एकदा मालदीवशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यास संधी मिळाली आहे. यासोबतच चीनला नामोहरम करत चीनला एक मोठा धक्का देण्याची आयती संधी भारत आणि सोलिह यांना चालून आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/