उत्सवाचा उद्देश
महा एमटीबी   22-Sep-2018संत सातत्याने काळानुरूप भक्तीचं माहात्म्य कथन करतात. कहाण्यांमधून भक्तीचा हेतू सांगितलेला असतो. कहाण्या कालबाह्य नसून त्यामधील मतितार्थ काढता आला की, प्रपंचामधून परमार्थ साधणं सोपं जातं. ज्ञानदेवांचा ज्ञानमय गणेश तर नामदेवांचा कीर्तनात रंगून नाचणारा गणेश!


 

उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. गायन, वादन, नृत्य, नाटक अशा कार्यक्रमांचा उद्देश उत्साहनिर्मिती हा असतो, कलागुणांचा विकास हा असतो. देवाची सेवा करण्याची ही सोपी पद्धत आहे. ईश्वराला कला प्रिय आहेत. परंतु, सध्या कला सादरीकरणामागील ‘सेवा’ हा मुख्य हेतू संपुष्टात आलेला दिसून येतो. त्यामध्ये ‘प्रदर्शन’ जास्त असते. गाण्याची-नृत्याची निवड महत्त्वाची असते. वासना चाळवणारे हावभाव आणि आशय असेल, तर ती सेवा या ‘सेवा’ सदरात येणं शक्य नाही. भगवंताचं वर्णन, स्तुती आणि सात्विकभावाला पुष्ट करणारी, समाजमनाला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारी कला सादर करणं अपेक्षित असतं. मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन मरगळ, मलिनता नाहीशी करण्याची ताकद कलेच्या अभिव्यक्तीमध्ये असावी. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कला हे माध्यम प्रभावी आहे. उत्सवामध्ये कार्यक्रम, कला सादरीकरणाच्या दर्जाला महत्त्व आहे. सवंग, हीन दर्जाची, उद्देशहीन कला सादर करणं ही ‘सेवा’ होऊ शकत नाही. उत्सवांमधून आपली कृती व्यक्त होत असते. भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड, भक्तिगीतं अशा कार्यक्रमांमधून समाजाला ईश्वराभिमुख करण्याचा प्रयत्न असतो. मायेमधून, मोहामधून बाहेर पडण्याचा मार्ग यामधून दाखवला जातो. षड्विकारांपासून सुटण्याचा सोपा उपाय कथन केला जातो. प्रपंच नेटका करून परमार्थ उत्कट करण्याची प्रेरणा प्राप्त होते. नामाची धून छेडताना भगवंतनामामध्ये धुंद होण्याचा छंद जडतो.

 

रोजच्या रटाळ जीवनाला भक्तीचा रंग देऊन जीवन रंगतदार कसं करावं, ते कथन करणारे कार्यक्रम सार्वजनिक उत्सवात अभिप्रेत असतात. कलह, कलकलाट दूर होऊन एकी, ऐक्य साधणं हा सुंदर हेतू असतो. लोकसमूहाने एकत्र येऊन भगवंताच्या गुणगायनामधून कर्तृत्वभावाचं विसर्जन करायचं असतं. गणपती विसर्जन म्हणजे ‘मी’पणा, अहंभाव याचं विसर्जन. जलतत्त्वामध्ये पृथ्वीतत्त्वाचं मिसळून जाणं होय. गणरायाच्या मूर्तीसमवेत षड्रिपू, षड्विकारांचं विसर्जन अपेक्षित आहे. मोठेपणाचा लय आणि विनम्रतेचा अंगीकार करणं, हे महत्त्वाचं. भगवंताच्या संपूर्ण उत्सवामधून आपल्या पूर्वजांनी काय साध्य करण्यास सांगितलं आहे, याचा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. संतांनी वर्णन केलेला गणपती मनाला, चित्ताला शांत करणारा आहे. अपेक्षारहित जीवनाला उजाळा देणारा आहे. गुणाचं संवर्धन आणि अवगुणांचं विसर्जन करण्यास प्रोत्साहित करणारा आहे. पापांचा क्षय आणि पुण्याला वर्धित करणारा संतांचा गणपती आहे. कलांचा कलंदर आविष्कार करणारा आहे. विविध विद्या प्राप्त करून विधात्याला समजून घेणारा आहेमायेचे बंध तोडण्यास साहाय्यक असणारा गणेश संतांनी ग्रंथात मांडला आहे. अविद्या नष्ट करून ज्ञान प्राप्त करण्यास बुद्धी प्रदान करणारा आहे. संतांनी साधनेतून अनुभवलेला गणेश व्यक्त केला आहे. शब्दांत न मावणारा, शब्दांच्या पलीकडील गणेश सामान्य समाजाला समजायला सोपा जावा म्हणून ओवी, अभंगातून मांडला आहे. दैवी गुणांचा अंगीकार आणि असुरी गुणांचं (अवगुणाचं) विसर्जन संतांनी साध्या शब्दांमधून सांगितलं आहे. भावना हिंदोळत खाली-वर होणार्‍या असू शकतात. परंतु भगवंताप्रती, त्याच्या सामर्थ्याप्रती श्रद्धाभाव मात्र पक्का असावा. अवघं जीवन भगवंताला अर्पण करण्यासाठी उत्सव असतात. प्रपंच फिका करण्याची कला साधण्यासाठी गणेशोत्सव असतो. परमार्थ पक्का करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उत्सव असतात.

 

संत सातत्याने काळानुरूप भक्तीचं माहात्म्य कथन करतात. कहाण्यांमधून भक्तीचा हेतू सांगितलेला असतो. कहाण्या कालबाह्य नसून त्यामधील मतितार्थ काढता आला की, प्रपंचामधून परमार्थ साधणं सोपं जातं. ज्ञानदेवांचा ज्ञानमय गणेश तर नामदेवांचा कीर्तनात रंगून नाचणारा गणेश! गोंदवलेकर महाराजांचा नाममय गणेश! विष्णुदास महाराजांचा भक्तिमय गणेश! तुकाराम महाराजांचा गाथामय गणेश! सकल संतांनी गणेश विविध पद्धतीने मांडला आहे. विविधतेमध्ये मूळ चैतन्याला जाणून घेण्याची एकता आहे. हे ऐक्य आकलन झालं की, भेद मावळून जातो. भगवंत प्राप्तीकरिता तसेच भगवंताच्या सहवासाचा सुगंध लुटण्यासाठी भक्ती करायची असते. उत्सवांमधून भक्ती समाजमनात रुजावी, त्या बीजाला अंकुर फुटावा, त्याचं इवलंसं रोपटं तरारावं आणि भक्तीचा वेल गगनापर्यंत जावा, त्या बीजामधून वटवृक्ष तयार होत जावा. अक्षयाचं वरदान लाभलेला वटवृक्ष पिढ्यान्पिढ्या, युगानुयुगे बहरत राहतोच ना! उत्सव साजरा करण्यामागे हीच भावना संत-महंत यांची आहे. संस्कृती, सणांचादेखील हाच उद्देश आहे. अंतःकरण, चित्ताच्या क्षोभाचं शमन आणि अक्षय आनंदाचे अलंकार प्रदान करणं... सात्विक सौंदर्याचं संवर्धन करणं हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. समाजाने समजून घेऊन समंजसपणे उत्सव साजरे केले की, त्यापासून निखळ आनंदाचा, असीम शांतीचा, चैतन्याच्या अफाट शक्तीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही.

 

एकमेकां साहाय्य करू

अवघे धरू सुपंथ ॥

-कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/