डिजिटल वृत्तमाध्यमे संघटना गरज आणि अस्तित्व
महा एमटीबी   22-Sep-2018वृत्तक्षेत्रामध्ये अनेक नवनवीन संधी डिजिटल मीडियामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत या बातम्या पोहोचत गेल्याने त्याचं व्यावसायिक महत्त्वदेखील वाढलं आणि त्यामुळे डिजिटल वृत्तमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये एक खूप मोठी संधी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. 

 

गेल्या काही वर्षांमध्ये खूप झपाट्याने डिजिटल तंत्रज्ञान वाढले आहे आणि या डिजिटल तंत्रज्ञानाबरोबरच वृत्तमाध्यमांसाठी एक सशक्त असा पर्याय निर्माण झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर लोक डिजिटल तंत्रज्ञानावर म्हणजे मोबाईलवर किंवा समाजमाध्यमांवर बातम्यांसाठी अवलंबून राहू लागले आहेत. यात मोबाईल उपकरणाच्या साहाय्याने विशेषतः स्मार्टफोनच्या साहाय्याने लोकांनी वेगवेगळ्या डिजिटल मोबाईल अॅपचा वापर हा बातम्यांसाठी आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे, हे आपल्याला लक्षात येते. या सगळ्या बदललेल्या वातावरणात खूप मोठा वाटा हा पूर्वीच्याच उपलब्ध असलेल्या वृत्तजगतातील मोठ्या अशा माध्यमसमूहांचा आहे, हे आपण जाणतोच. मोठ्या माध्यमसमूहांनी जागतिक पातळीवर बातम्यांचे प्रसारण आणि विविध पातळ्यांवरती बातम्यांची उपलब्धताही वाढवली आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. डिजिटल मीडियाला पर्यायी माध्यम म्हणूनसुद्धा आज मान्यता मिळालेली दिसते. त्यामध्ये जगातील मोठमोठ्या उद्योग समूहांचा सहभाग आहे. वेगवेगळ्या बातम्या शोधणे, समाजमाध्यमांचा वापर करणे, व्हिडिओ शेअर करणे या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या माध्यमसमूहांचे वर्चस्व आपल्याला दिसून येते. त्यातही जी प्रसारमाध्यमे आहेत, त्यात दृक्श्राव्य माध्यमे आधीपासूनच खूप मोठ्या प्रमाणावर बातम्यांचे किंवा विविध सेवांचे प्रसरण करत होती हे आपण जाणतोच. मात्र, या नवीन लाटेमध्ये जी मुद्रितमाध्यमे आहेत, त्यांनीसुद्धा जागतिक पातळीवरती आपली वृत्तसेवा सुरू केली आहे आणि त्यासाठी या डिजिटल व्यासपीठाचा वापर केला आहे. डिजिटल माध्यम क्षेत्रात तुलनेने कमी लागणारी गुंतवणूक आणि बाजारपेठेमध्ये एकूणच माध्यमांचे संमिल्लन या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. मात्र, या सर्व माध्यमसमूहांध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रश्न उभा राहतो. महसूल व उत्पन्न मिळविण्याचा आणि दुसरा डिजिटल माध्यमांच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात पुन्हा हे तंत्रज्ञान सर्वत्र उपलब्ध असल्याने व तुलनेने स्वस्त असल्याने अनेक छोटी-मोठी माध्यमे किंवा व्यक्ती या स्पर्धांमध्ये उतरलेली दिसतात.

 

डिजिटल वृत्तमाध्यमांचे जागतिक वर्चस्व

 

इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्याचबरोबर माहितीच्या महामार्गावरती अनेक अविकसित देशांचीसुद्धा आता घौडदौड सुरू झालेली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत त्याची पोहोच आणि उपलब्धता याच्यात मोठ्या प्रमाणावर फरक पडला. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि नवनवीन साधनांचा उपयोग करून बातमी आता ग्राहकांकडे किंवा सर्वसामान्य जनतेकडे पोहोचवता येते. वृत्तक्षेत्रामध्ये अनेक नवनवीन संधी या डिजिटल मीडियामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत या बातम्या पोहोचत गेल्याने त्याचं व्यावसायिक महत्त्वदेखील वाढलं आणि त्यामुळे डिजिटल वृत्तमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये एक खूप मोठी संधी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेला जागतिक पातळीवर वेगवेगळ्या अशा मोठ्या माध्यमसंस्थांचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येते की, काही मोजक्या अशा माध्यमसंस्थांकडे खूप मोठ्या प्रमाणावर या डिजिटल माध्यमांची मालकी आणि त्याचप्रमाणे यांच्या बातम्यांचे प्रसारणसुद्धा याच माध्यमांवरती अवलंबून आहे. त्यामुळे बातमीच्या क्षेत्रामध्ये नवीन अशा खेळाडूंचा प्रवेश हा निश्चितच अवघड होऊन जातो. जी माध्यमे डिजिटल व्यासपीठावर वापरली जातात, त्या माध्यमांचा उपयोग हा सर्वसामान्यांकडून होत असताना सर्वसामान्य माणूस त्यासाठीचा स्रोत तपासून पाहात नाही आणि फक्त वापर करण्यावरती भर देतो. हीच गत वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यामुळे बातम्यांची विश्वासार्हता धोक्यात येते. पण, त्याचा नेमका फायदा हा मोठ्या माध्यमसमूहाला होताना दिसतो आणि त्यामुळे जागतिक पातळीवरसुद्धा खूप मोठ्या अशा माध्यमसंस्थांचे, माध्यमसमूहांचे वर्चस्व हे डिजिटल मीडियावरती आपल्याला दिसून येते. या संदर्भात जागतिक वृत्तपत्र आणि वृत्तपत्र संस्था संघटना WAN ifra म्हणजे World Association of Newspapers and News publishers यांनी या संदर्भात खूप महत्त्वाची आकडेवारी प्रकाशित केली आहे. या आकडेवारीचा विचार केला असता, जगातील काही विकसित माध्यमांमध्ये मुद्रितमाध्यमे, दूरचित्रवाणी आणि इंटरनेटवर आधारित माध्यमे यांच्या जाहिरातीचे आकडे बघितले, तर आपल्याला या डिजिटल माध्यमांचे महत्त्व लक्षात येईल. या आकडेवारीनुसार फिनलँड, जर्मनी, युरोपात २५ ते ३० टक्के वृत्तपत्रांना मिळणाऱ्या जाहिरातींमधील महसूलात घट झाली आहे. इटली आणि पोलंड येथे तर ही घट ५० ते ६५ टक्क्यांवर पोहोचली आहे. दुसरीकडे दूरचित्रवाणीवरून मिळणाऱ्या उत्पन्नात ६ ते २५ टक्क्यांपर्यंतची घट याच देशांमध्ये दिसून येते आणि ज्यावेळी इंटरनेटवरील जाहिरातींचे प्रमाण आपण बघतो, तेव्हा त्यात फिनलँडमध्ये २० टक्के, पोलंडमध्ये ६७ टक्के, युरोपमध्ये ७० टक्के, इटलीमध्ये ८३ टक्के आणि जर्मनीमध्ये जवळपास ९२ टक्के इतका विकास हा इंटरनेटवरील जाहिरातींमुळे दिसून येतो. त्याचप्रमाणे गुगलच्या वेगवेगळ्या साईट्स गुगल, फेसबुक, लललच्या साईट्स यांच्यावरसुद्धा नेटकर्यांचे भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने डिजिटल क्षेत्रात महसुलाद्वारे होणारी वाढ हीसुद्धा या क्षेत्रातील मोठ्या माशांना आकर्षित करत असते, यात नवल नाही आणि म्हणूनच डिजिटल वृत्तमाध्यमांना समर्पित अशा संस्थांची स्थापना गेल्या दोन दशकात झालेली दिसते. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये स्थानिक बातमीला जास्त महत्त्व आहे. म्हणूनच, या स्थानिक बातम्यांचा पुरवठा करण्यासाठी डिजिटल माध्यमांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संस्थेशी वा संघटनेची गरज भारतामध्ये मोठ्या समूहांना भासत होती.
 

संघटनेचे ध्येय आणि धोके

 

देशातील १० सर्वात मोठ्या माध्यमसमूहांनी एकत्र येऊन ‘डिजिटल न्यूज पब्लिशर असोसिएशन’ची स्थापना केली आणि आजवर भारतातील डिजिटल बातम्यांच्या ७० टक्के वाचकांपर्यंत यांची पोहोच आहे. या संस्थेची स्थापना करण्याचा उद्देश हा नवीन बातम्यांना प्रोत्साहन देणे, ऑनलाईन बातम्यांच्या प्रकाशकांना प्रोत्साहन देणे, त्यांची मदत करणे, तसेच त्यांच्या व्यावसायिक आणि संपादकीय हिताचे रक्षण करणे हे असल्याचे सांगितले गेले. त्याचबरोबर जी काही ऑनलाईन वृत्तमाध्यमे आहेत, त्यांच्यासाठी स्वयंशासित नियामक संस्था म्हणूनसुद्धा ही संस्था काम करेल. लोकांना विश्वसनीय अशा बातम्या उपलब्ध करण्यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. यामुळे या संघटनेचे ध्येय हे या उद्योगामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या संधी आणि यामधील समस्या या संदर्भात अभ्यास करणे हे आहे. निश्चितच हे एक खूप मोठे ऐतिहासिक पाऊल आहे. यात जो खरा धोका आहे तो म्हणजे पुन्हा एकदा मोठ्या समूहांना बातम्यांवर नियंत्रण ठेवणे. डिजिटल मीडियाचे सर्वात मोठे बलस्थान हे होते की, अतिशय कमी भांडवलामध्ये हवे ते माध्यम सुरू करून फक्त चांगली आशयनिर्मिती करून बातम्यांच्या क्षेत्रात विश्वसनीयता मिळवून सर्वसामान्य लोकांना किंवा छोट्या बातम्यांच्या माध्यमांनासुद्धा आपले वर्चस्व निर्माण करणे शक्य होते. मात्र, आता या संघटनेच्या स्थापनेनंतर आणि या क्षेत्रातील विकासाचे भविष्यकालीन अंदाज पाहता, डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रात मालकीचे केंद्रीकरण होईल व वर्चस्ववाद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
 
-प्रा. गजेंद्र देवडा 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/