कल्याणमधील संघसृष्टीचे पितामह भाऊराव सबनीस
महा एमटीबी   22-Sep-2018

 


 
 
जीवनात भाऊंनी सर्व प्रकारची समाजसेवा केली. छत्रपती शिक्षण मंडळ, स्त्री शिक्षण मंडळ, रेल चाईल्ड संस्था, विद्यार्थी साहाय्यता प्रतिष्ठान, राष्ट्रीय शिक्षण संस्था, न्यू लुर्ड्स, नमस्कार मंडळ या संस्थांच्या सर्व कामांत भाऊरावांची मदत झाली. केवळ भाऊरावांच्या ओळखीमुळेच अनेक शाळांना जागा मिळालेल्या आहेत. संस्था आपल्या पायावर उभ्या आहेत. 
 
 
कल्याण हे संघकार्यकर्त्यांचे मोहोळ आहे म्हणतात, कारण येथील स्वयंसेवकांनी संघशाखेबरोबरच संघाला अपेक्षित अशा समाजोपयोगी सर्व संस्था येथे सुरू केल्या. विविध सामाजिक कामांत ते आघाडीवर राहिले. संघाच्या अशा सर्व कार्यकर्त्यांची जडणघडण करणे, त्यांना जबाबदारी घेऊन काम करायला उद्युक्त करणे अशी कामे करणाऱ्या दामूअण्णा टोकेकर, दादा चोळकर या संघ प्रचारकांबरोबरच ज्या गृहस्थी कार्यकर्त्यांनी हे मोलाचे काम केले, यात श्रीधर नीळकंठ तथा भाऊराव सबनीसांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संघापासून प्रेरणा घेऊन अनेक संस्थांच्या माध्यमांतून त्यांनी संघविचार सर्वत्र पसरविला. भाऊरावांचा जन्म कल्याण येथेच दि. २४ जून १९२७ रोजी झाला. १९३५ साली कल्याणात संघ सुरू झाला. शालेय जीवनातच भाऊंचा संघाशी संबंध आला व ते संघस्वयंसेवक बनले. गटनायक, शाखा कार्यवाह अशा जबाबदाऱ्या घेऊन संघाचे काम करू लागले. १९४८ साली संघावर पहिली बंदी आली. एका सत्याग्रहाचे नेतृत्व करत भाऊराव सबनीसांनी तुरूंगवास पत्करला. १९५० साली मौलीचंद्र शर्मा व रामभाऊ म्हाळगी यांच्या उपस्थितीत कल्याणात भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली. जनसंघाच्या समितीत भाऊराव सबनीसांचाही समावेश होता. तेव्हा पासून भाऊरावांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली असे म्हणावे लागेल. त्याचवर्षी ते शास्त्रशाखेचे पदवीधर झाले.
 

सामाजिक काम करण्यासाठी कायम समाजाबरोबर राहिले पाहिजे व यासाठी वकिलीचा व्यवसाय सर्वोत्तम आहे, हे ध्यानात आल्यावर त्यांनी विधी शिक्षणाला सुरुवात केली व १९५३ साली जनसंघाचा शहरमंत्री म्हणून भाऊरावांकडे जबाबदारी आली. १९५४ साली त्यांनी ठाणे जिल्ह्यात वकिलीला सुरुवात केली व काही वर्षांतच एक सर्वसामान्यांचा ज्ञानी वकील, कार्यकर्त्यांची सर्वोतोपरी काळजी घेणारा सहकारी, सामाजिक भान असलेला नेता, आपल्या सर्वांना सहकार्य करण्याच्या स्वभावामुळे अपार जनसंग्रह मिळविलेली कल्याणातील प्रतिष्ठित व्यक्ती असे नावलौकीक त्यांनी मिळविले, ज्याचा त्यांना व समाजाला उर्वरीत आयुष्यात खूप उपयोग झाला. संघ-जनसंघाचे काम त्यांनी आयुष्यभर केलेच; पण कल्याण परिसरात संघसृष्टी निर्माण करण्यात व ती दृढमूल करण्यात त्यांचा फार मोठा हातभार आहे. मोरोपंत पिंगळ्यांचे भाऊंच्या जीवनात फार मोठे स्थान होते. मोरोपंतांनी सांगितलेली सकल महाराष्ट्रातील संस्थांची कामे भाऊंनी निष्ठेने केली आहेत. १९५५ साली जनसंघाचे प्रांतिक अधिवेशन कल्याणला पाठारे मैदानात उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. या अधिवेशनासाठी कुवारींनी भाऊंच्या आग्रहाखातर नवीन माल विकत घेऊन महांकाळ नगर उभे केले. या अधिवेशनाला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीही आले होते. पक्षाने सांगितले म्हणून त्यांनी १९६० साली कल्याण पालिकेची निवडणूक लढविली व ते निवडून आले. आणीबाणी काळात भाऊ जनसंघाचे ठाणे जिल्हामंत्री होते. त्यांना मिसाखाली अटक झाली.

 

जीवनात भाऊंनी सर्व प्रकारची समाजसेवा केली. छत्रपती शिक्षण मंडळ, स्त्री शिक्षण मंडळ, रेल चाईल्ड संस्था, विद्यार्थी साहाय्यता प्रतिष्ठान, राष्ट्रीय शिक्षण संस्था, न्यू लुर्ड्स, नमस्कार मंडळ या संस्थांच्या सर्व कामांत भाऊरावांची मदत झाली. केवळ भाऊरावांच्या ओळखीमुळेच अनेक शाळांना जागा मिळालेल्या आहेत. संस्था आपल्या पायावर उभ्या आहेत. दुर्गाडी किल्यावरील वास्तूचा वाद सोडविण्यासाठी शासनाने रंगनाथन या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या समोर हिंदू समाजाच्यावतीने पुरावे सादर करण्याच्या कामी भाऊरावांनी पुढाकार घेतला. इतिहास अभ्यासक अण्णा सहस्त्रबुद्धे, वामनराव साठे, गोपाळराव टोकेकर, भगवानराव जोशी, अॅ. श्रीनिवास मोडक व अनेक कार्यकर्ते यांची प्रचंड मेहनत कामी आली १९७२ साली जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ल्यावरील वास्तू ही दुर्गादेवीचे ऐतिहासिक मंदिर आहे, असा निर्णय दिला. कल्याणातील धार्मिक मंदिरांचा समाजाला उपयोग व्हावा, कोणाच्या व्यक्तिगत मालमत्ता होऊ नयेत याकडे भाऊंनी आपल्या जीवनात लक्ष दिले. काळा तलाव, राम मंदिराच्या मालमत्तेवर अवैध लोकांनी कब्जा केला होता, त्याविरुद्ध ३२ वर्षे कायदेशीर लढा देऊन, प्रसंगी जीवावरच्या हल्ल्यांना तोंड देऊन, राम मंदिराचा सार्वजनिक ट्रस्ट शासनाकडून घोषित करण्यात १९८१ साली भाऊंना यश मिळाले. परंतु, प्रत्यक्षात ताबा मात्र १९८७ साली ट्रस्टला मिळाला. मलंगगडावर हिंदू धर्म निशाण्या व परंपरा बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला, तेव्हा पुण्याचे मोहनदादा गोखले यांनी कल्याण न्यायालयात दावा केला. त्याचे पूर्ण मार्गदर्शन भाऊंनी केले होते. या शिवाय डहाणूचे महालक्ष्मी मंदिर, पारनाका राम मंदिर, मुस्लीम समाजाचे टेकरी कब्रस्तान मशीद, सिंडीकेट मशीद, मुरबाड रोड, पीरशहा गुल्हुसेन साहेब दर्गा ट्रस्ट, कोन यांनाही वेळोवेळी सर्व कायदेशीर मदत भाऊंनी करून समाजासाठी या स्थानांचा उपयोग होईल, असे पाहिले आहे. रामजन्मभूमी आंदोलनासाठी गेलेल्या सर्व सेवकांच्या घरी भाऊराव गेले व त्यांना धीर दिला. भाऊंच्या घरी येण्याने सर्व कल्याण आपल्या बरोबर आहे, असा विश्वास कुटुंबीयांना मिळाला. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून त्यांनी गरीबांसाठी दवाखाना चालविला. तोंडली गावी लागलेल्या आगीत मदत केली. अनगाव येथे फेब्रुवारी १९६६ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन निवडून आलेल्या सदस्यांचा प्रशिक्षण वर्ग, देहरे येथे गावकऱ्यांकडून त्यांनी विहिरी खणून घेऊन इतर सर्व साहित्य देऊन तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांकडून, भाजीपाला विक्रेते संघ, रेल्वे हमाल संघटना, दुग्धव्यावसायिक संघटना, हॉटेल मजदूर संघटना, रेऑन वर्कर्स युनियन अशा नवीन संघटना उभ्या करून घेतल्या. रेल्वेसंपाच्या वेळी रेल्वे कामगारांना सर्वतोपरी मदत केली. ‘हिंदू सेवा संघ’ डोंबिवलीचे अभ्युदय प्रतिष्ठान, मोखाडा भागातील सुंदर नारायण गणेश मंदिर, देवबांध सेवाप्रकल्प यांना कायम मदत केली. भाऊंच्या प्रयत्नांमुळेच भाईंदर येथील केशवसृष्टीच्या जमिनीचा विषय मार्गी लागला. प्रारंभीच्या काळात १०-१२ वर्षे जो विविध स्वरूपाचा न्यायालयीन व इतर संघर्ष करावा लागला त्यात दादा नलावडे, आबा मयेकर, भाई गायतोंडे व भाऊराव सबनीस नेहमी आघाडीवर राहिले.

 

रेल्वे प्रवासी संघटना हे भाऊरावांच्या कामाचे एक वैशिष्ट्य होते. उपनगरीय रेल्वेचा अहवाल त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सादर केला. लोकसभेत त्यांचे टिपण वाचले गेले. भिवंडीला भीषण दंगल झाली. शेकडो गरीब हिंदुंचे संसार उघड्यावर आले. अशा प्रसंगी भाऊराव कल्याणातील कांता अगलावे, अनिल पांचाळ अशा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भिवंडीला गेले. कुंटे, जोगळेकर, व्यास यांना भेटले. दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनाला मदत केली. भाऊरावांच्या पुढाकाराने कल्याणात जनता सहकारी बँक व आदर्श सहकारी सोसायटी या संस्था सुरू करण्यात आल्या. ‘उत्पादक ते ग्राहक’ ही संकल्पना राबवून भाऊंनी दिगंबर विशे यांच्या सहकार्याने वाघिवली गावातील पालेभाज्या उत्पादक शेतकरी व कल्याण-डोंबिवलीतील ग्राहक यांच्यासाठी विक्री केंद्रे सुरू केली, तर ग्रामीण दुधाला चांगला भाव यावा म्हणून ‘वैशाखरे’ येथे एक दुग्धसंस्था सुरू केली. अनेक नवीन वकिलांना त्यांनी तयार केले व अनेक सामाजिक कामांतही त्यांना जोडून दिले. सर्वसामान्य जनतेला कायदा समजला पाहिजे, म्हणून त्यांनी मराठीतून विविध कायद्यांची पुस्तके लिहिली. सामाजिक जाणिवेतून भाऊरावांनी महापालिका, विद्युत मंडळे, अनेक धार्मिक व सामाजिक संस्था यांचे खटले चालविले व जिंकले. त्यांच्या तरुण मुलाचे १९७८ साली दु:खद निधन झाले. हे मोठे दु:ख पचवून भाऊ व सुमतीताईंनी कल्याणच्या समाजकार्यात कायम आपले योगदान दिले. दोघांच्याही सामाजिक कामाचा गौरव म्हणून कल्याणकरांतर्फे १९९६ साली त्यांचा सत्कार मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते करून त्यांना मानपत्र देण्यात आले. लो. टिळकांनी सुरू केलेल्या सुभेदार वाडा गणेशोत्सवाच्या शताब्दी पुरस्काराचेही ते मानकरी ठरले. आपले आयुष्य कृतकृत्यतेने जगून वयाच्या ९२ व्या वर्षी भाऊरावांचे प्राण गुरुवार दि. १३ सप्टेंबर, २०१८ रोजी पूर्ण समाधानाने त्यांच्या कुडीतून निघून गेले. त्यांच्या जीवनातून सर्वांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 
 
- प्रवीण देशमुख
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/