अबब!! अवघ्या ८५ रुपयांत घर...
महा एमटीबी   21-Sep-2018


 

 
वाचून धक्का बसला ना....कारण, हल्ली एवढ्या पैशात तर पुरेसं पोटभर जेवणही मिळत नाही. पण, आता त्याच किमतीत जर घर मिळत असेल तर? होय, ही गोष्ट अगदी खरी आहे


घराची किंमत आणि ती ही केवळ ८५ रुपये!!! वाचून धक्का बसला ना....कारण, हल्ली एवढ्या पैशात तर पुरेसं पोटभर जेवणही मिळत नाही. पण, आता त्याच किमतीत जर घर मिळत असेल तर? होय, ही गोष्ट अगदी खरी आहे. जगभरातील सर्वात सुंदर देशांमध्ये इटलीचं नाव घेतलं जातं. निरनिराळे चविष्ट खाद्यपदार्थ, मनमोहक निसर्गसौंदर्य आणि मन प्रसन्न करणारं वातावरण याचा उत्तम संगम अनुभवता येतो तो इटलीत. अनेक तरुण-तरुणींच्या ‘ड्रीम डेस्टिनेशन’च्या यादीतही या इटलीचं नाव आवर्जून घेतलं जातं. म्हणूनच जर कोणी या ठिकाणी घर घेण्यासाठी समोरून विचारलं तर अशा वातावणात घर घेण्याचा मोह कोणाला आवरणार नाही? इटलीत घर घेण्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल, हा विचारही करवणार नाही. पण जर केवळ एक युरोमध्ये म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे केवळ ८५ रुपयांमध्ये जर कोणी या ठिकाणी घर देत असेल तर? आपला कदाचित यावर विश्वास बसणार नाही, परंतु हे अगदी खरं आहे. इटलीमध्ये केवळ ८५ रुपयांमध्ये आपण घर खरेदी करू शकतो. इटलीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं ओलोली हे शहर. या शहरात सध्या शेकडो घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध असतानाही खरेदीदार मात्र फिरकत नाहीत. त्यामुळे या घरांची किंमत फक्त १ युरो म्हणजेच अंदाजे ८५ रुपये इतकीच आहे. हे ऐकून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेलही, पण ओलोलीमध्ये या घरांची किंमत कमी असण्याला कारणही अगदी तसंच आहे. या शहराची सध्याची लोकसंख्या केवळ १३००च्या आसपास आहे. जगातल्या सर्वात लहान शहरांपैकी असं हे शहर. पाच दशकांपूर्वी या शहराची लोकसंख्या जवळपास अडीज हजार इतकीच होती. मात्र, कालांतराने यामध्ये घट झाली. कालौघात हे शहर कदाचित नष्ट तर होणार नाही ना या भीतीने या शहरातील नागरिकांना ग्रासले आहे. कारण, या शहरात वर्षाला अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नवजात बालके जन्माला येतात.

 

शहराची अनोखी परंपरा आणि वारसा जपण्यासाठी १ युरोमध्ये घर खरेदी करण्याची योजना सुरू केल्याचे शहराच्या महापौरांनी सांगितले. या ठिकाणी घर खरेदी करून आपल्या कुटुंबीयांसोबत स्थायिक होण्याची विनंतीही स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या ठिकाणचा असलेला वारसा जपण्यासाठी आणि संस्कृती लोप पावू नये यासाठीच १ युरोमध्ये घरांची विक्री केली जात आहे. पण, या घरांची खरेदी करणाऱ्यांना एका अटीची मात्र पूर्तता करणे बंधनकारक असेल. या ठिकाणी घर खरेदी करणाऱ्यांना पुढील एक वर्षाच्या आत त्यांच्या घराचे नूतनीकरण करावे लागेल आणि तीन वर्षांच्या कालावधीमध्ये नूतनीकरणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या नूतनीकरणाची किंमत तब्बल २५ हजार डॉलर्सच्या आसपास म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे 18 लाखांच्या जवळपास खर्च करावा लागणार आहे. यातही घर खरेदी करणाऱ्याला स्थानिक प्रशासनाने थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नूतनीकरणादरम्यान येणाऱ्या खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंतची रक्कम अनुदान स्वरूपातही मिळणार आहे. यासाठी संबंधितांना अर्ज करावा लागेल. या घर खरेदीत याव्यतिरिक्त आणखी एक अट घालण्यात आली आहे. घर खरेदी करून नूतनीकरण केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत संबंधितांना हे घर विकता येणार नाही. या अटी घर खरेदी करणाऱ्यांना दूर लोटण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. मात्र, डोंगराळ भाग, निसर्गाच्या सान्निध्यात हे शहर वसले असल्याने या योजनेला चालना मिळण्याचीही शक्यता आहे. अशा प्रकारची योजना आणून खरेदी-विक्री करण्याची ही पहिली योजना नाही. एप्रिल २०१५ सालीदेखील अब्रुझोच्या राष्ट्रीय उद्यानातही अशाच प्रकारे घरांची खरेदी-विक्री करण्यात आली होती, तर त्यापूर्वी गांगी क्षेत्रातही एका ऐतिहासिक धोकादायक इमारतीची याच किमतीत विक्री करण्यात आली होती. सध्या या ठिकाणी असलेल्या घरांपैकी ८ ते १० घरांची विक्री झाली असून जगभरातून अनेकांनी अर्ज केल्याचे शहराच्या महापौरांकडून सांगण्यात येत आहे. इटलीमधील अनेक छोट्या शहरांमध्ये आजही या प्रकारच्या अनेक नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. कँडेला या शहर प्रशासनानेही शहरात येणाऱ्यांची संख्या वाढावी आणि घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी घरापाठी २ हजार युरोचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. भारतात आज अनेक अशी शहरे आहेत, ज्यांची लोकसंख्या जागेच्या तुलनेने जास्त आहे. भारतात अशी स्थिती असताना निसर्गाच्या सान्निध्यात इटलीसारख्या देशात घरखरेदीचा मोह झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही, हे मात्र खरं...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/