जरा विसावू या वळणावर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
 
कविवर्य सुधीर मोघे यांच्या कवितेचे शब्द आहेत-

भलेबुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर...”

 

पण, कवीला जिथे सगळं विसरून थांबावं, विसावा घ्यावा, असं वाटतं; नेमक्या त्याच वळणावरून अभ्यासक, राजकीय-सामाजिक निरीक्षक, संशोधक, पत्रकार, इतिहासकार यांना अभ्यासाकरिता प्रचंड बौद्धिक खाद्य उपलब्ध होत असतं. हा अभ्यास वृत्तपत्रांचे आणि नियतकालिकांच्या विशेषांकांचे रकाने भरण्यापुरताच नसतो. शहाणे आणि जाणते समाजधुरीण त्यावरून समाजाची, लोकांची नाडीपरीक्षा करीत असतात. आपल्या हालचालींची पुढची धोरणं ठरवत असतात.

 

नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा अत्यंत पराक्रमी, महत्त्वाकांक्षी आणि अफाट लोकप्रिय असा राजा होता. त्याला प्रथम संपूर्ण युरोप खंड आणि नंतर आफ्रिका आणि भारतही जिंकायचा होता. अर्धाअधिक युरोप त्याने जिंकलाही, पण वॉटर्लूच्या रणमैदानात ब्रिटनचा सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टनने नेपोलियनचा निर्णायक पराभव केला आणि नेपोलियन संपला. हे इतिहासाचं एक फार मोठं वळण होतंनंतर काही काळाने लंडनमध्ये वेलिंग्टनच्या सन्मानार्थ एक जंगी मेजवानी झडली.वेलिंग्टनच्या अप्रतिम रणकौशल्याने नेपोलियनच्या अपराजित, अजेय रणकौशल्यावर मात केली, याबद्दल सगळ्या वक्त्यांनी त्याची स्तुती केली. सत्काराला उत्तर देताना वेलिंग्टन म्हणाला,“नेपोलियनच्या अजोड रणनेतृत्वासमोर मी कुणीच नाही, पण नियती माझ्या बाजूने होती म्हणून मी जिंकलो.” वेलिंग्टनच्या या उद्गारांत खोटी विनम्रता नाही. ते शब्दश: खरे आहेत, असा अभ्यासकांचा निर्वाळा आहे. मग प्रश्न उरतो की, हे असं का घडलं? नियतीची मर्जी नेपोलियनऐवजी वेलिंग्टनवर का बरं बहाल झाली? इतिहासाने सरळ वहाण्याऐवजी एकदम वळण का घेतलं?

 

गेल्या वर्षी म्हणजे २०१७ साली रशियन राज्यक्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली. १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झालं. अँग्लो-फ्रेंच विरुद्ध जर्मनी यांच्यातल्या या युद्धात रशियाचा सम्राट झार हा अँग्लो-फ्रेंचांच्या बाजूने उतरला. महायुद्ध पुढे १९१८ पर्यंत चालू राहिलं. पण, ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात लेनिन-ट्रॉट्स्की यांच्या साम्यवादी बोल्शेव्हिक पक्षाने यशस्वी राज्यक्रांती केली. त्यांनी सत्ता हातात घेऊन झारला पदच्युत केलं. जर्मनीशी तह करून रशियाला महायुद्धातून बाहेर काढलं. झार आणि त्याच्या कुटुंबासह अनेक राजनिष्ठ लोकांना सरळ गोळ्या घातल्या. या सगळ्या घटनाक्रमावर २०१४ पासूनच अनेक नवनवीन संशोधनं मांडणारी पुस्तकं येऊ लागली. २०१७ साली तर अशा पुस्तकांचा पूरच लोटला आणि आता २०१८ साल मावळतीकडे झुकलं तरी ती येतच आहेत. यातली धंदेवाईक पुस्तकं सोडली तरी अभ्यासपूर्ण पुस्तकंही भरपूर आहेत. शंभर वर्ष उलटून गेल्यावरही पाश्चिमात्त्य अभ्यासकांना रशियन साम्यवादी क्रांतीचा अभ्यास का करावासा वाटतो?

 

आज इस्लामी दहशतवाद आणि तेल उत्पादनाचं आर्थिक राजकारण हे ताजे विषय आहेत. साम्यवाद आणि त्यावर आधारित राज्यक्रांती यांचा आज काही ‘रेलेव्हन्स’च राहिलेला नाही, असं आपल्याला वाटतं. पण अभ्यासकांना तसं वाटत नाही, कारण मानवी जीवन, त्याचा इतिहास हा नदीप्रमाणे अखंड वाहणारा काळाचा एक प्रवाह असतो. त्या प्रवाहाची वळणं अभ्यासण्यातून आपल्याला मागचं बरंच काही समजतं नि त्या आधारावर पुढचे आडाखे बांधता येतात, असा अभ्यासकांचा अनुभव आहेतर, अभ्यासकांना प्रश्न पडतात की, बोल्शेव्हिक क्रांती का यशस्वी झाली? झारविरुद्ध जनतेत असंतोष होता. झारशाहीविरुद्ध अनेकदा उठाव झाले होते. ते चिरडण्यात आले होते, पण म्हणून झारला आणि त्याच्या कुटुंबाला गोळ्या घालून ठार करण्याइतके काही रशियातले शेतकरी- कामकरी पिसाटलेले नव्हते आणि लेनिन-ट्रॉट्स्कीच्या साम्यवादी पक्षापेक्षा अलेक्झांडर केरेन्स्की या नेत्याच्या लोकशाही पक्षाला जनमत नक्कीच जास्त अनुकूल होतं. तरीही या सगळ्या प्रतिकूल घटकांवर मात करून लेनिन- ट्रॉट्स्की जिंकू शकले. लोकमत आपल्या बाजूला आहे, असा देखावा उभा करणं, म्हणजे आधुनिक युगातलं रणकौशल्य. त्यात ते केरेन्स्कीपेक्षा वरचढ ठरले हे तर नक्कीच, पण नियतीने आपलं दान त्यांच्या बाजूने टाकलं हेच सगळ्यात महत्त्वाचं. कोणत्याही अभ्यासक-लेखकाने साम्यवादी पक्षाच्या यशाचं विवेचन करताना ‘नियती’ हा शब्द ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ प्रमाणे प्रत्यक्ष उच्चारलेला नाही, पण त्यांच्या एकंदर लेखनाचा निष्कर्ष त्या शब्दाकडेच बोट दाखवतो.

 

या पाश्चिमात्त्य अभ्यासकांचं एक गमतीदार वैशिष्ट्य असतं. ते त्यांचा सगळा अभ्यास वाचकांसमोर मांडतात. निष्कर्ष मात्र वाचकांनी काढावा. उदा. काही अभ्यासकांनी ‘पुनर्जन्म, खरा की खोटा?’ या विषयावर प्रचंड अभ्यास केला. जगभरच्या असंख्य सभ्यता, विविध लोकसमुदाय, संप्रदायांचा त्यांनी कसून अभ्यास केला. आधुनिक वैज्ञानिक प्रयोग, अनुभव हे सगळे पारखले. ते जाहीरपणे लोकांसमोर मांडले. इतक्या ठणठणीतपणे की, ते वाचतावाचताच पुनर्जन्माच्या सत्यतेबद्दल वाचकाची खात्रीच पटावी, पण लेखक तसं स्पष्टपणे म्हणत नाहीत. ते एवढंच म्हणतात की, या सर्व उपलब्ध पुराव्यांकडे पाहता, “पुनर्जन्म सत्य असावा, असं आम्हाला वाटतं!” असो. तर १९१७ साली साम्यवादी क्रांती यशस्वी का झाली? या प्रश्नाच्या चिंतनातून पुढचे प्रश्न निर्माण होतात. स्वत:ला शेतकरी-कामकरी-श्रमिक-कष्टकरी-बहुजन याचं राज्य म्हणवून घेणाऱ्या या साम्यवाद्यांनी पुढच्या काळात साम्राज्यवाद्यांवरही ताण केली. झारने आपल्याविरुद्ध झालेले उठाव निर्घृणपणे चिरडले होते, हे खरंच, पण तरीही सर्वसामान्य रशियन जनता झारला आपला पिता मानत असे. इतकंच नव्हे तर सर्वसाधारणपणे झार राजेही आपल्या प्रजेशी प्रेमाने वागत असत. याची असंख्य उदाहरणं आहेत, राजाने आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करावे, या प्राचीन (हिंदू) परंपरेचा प्रभाव चक्क दोन्ही बाजूंनी बऱ्यापैकी टिकून होता. साम्यवाद्यांनी मात्र हे सगळंच मोडीत काढून आपल्याच देशबांधवांना लाखांच्या नव्हे, कोटींच्या संख्येत सरळ ठार मारून प्रचंड दहशत बसवली. पाठोपाठ ‘लाल क्रांतीची निर्यात’ या गोड नावाखाली संपूर्ण जग आपल्या पंजाखाली आणण्याचा अथक प्रयत्न केला. त्यासाठी असंख्य खून पाडले, रणगाड्यांसाठी चिरडून माणसं ठार मारली. अनेकांना जिवंतपणी माणसातून उठवलं. ही पाशवी राजवट पाच-दहा नव्हे तब्बल ७४ वर्ष टिकली. १९१७ ते १९९१. तशी १९८५ पासूनच ती कोसळण्याचे संकेत मिळू लागले, पण प्रत्यक्षात ती पूर्ण संपायला पुढची सहा वर्ष लागली.

 

१९९१ नंतर नव्या रशियन सत्ताधीशांनी म्हणजे बोरिस येल्त्सिन सरकारने साम्यवादी सरकारची सगळी कागदपत्रं अभ्यासकांना खुली केली. पाश्चिमात्त्य अभ्यासक-संशोधक त्या घबाडावर तुटून पडले. त्यांच्या संशोधनाचे विषय अक्षरक्षः अगणित होते. त्यामुळे त्यावर आधारित पुस्तकं येणं, जे साधारण १९९२ पासून सुरू झालं, ते आजही चालूच आहे. ही सगळीच पुस्तकं आपल्याकडे येतात असं नाही. किंबहुना अत्यल्प येतात. उशिरा येतात. अशीच दोन उशिरा आलेली पुस्तकं म्हणजे पीटर ग्रोज या लेखकाचं ‘ऑपरेशन रोलबॅक’ आणि ग्रेगरी मित्रोविच याचं ‘अंडरमायनिंग द क्रेमलिन.’ रशियातील साम्यवादी राजवटीविरुद्ध उठाव घडवून आणण्यासाठी अमेरिकन गुप्तहेर खातं सीआयएने कसकसे उद्योग केले; पण खुद्द वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये रशियन गुप्तहेर खातं केजीबी याने आपलं अधिक प्रभावी हेरजाळे उभारलेलं असल्याने ते कसे अयशस्वी झाले, याचं वर्णन या दोन्ही लेखकांनी केलं आहे. पण मग पाऊणशे वर्षांनी साम्यवादी साम्राज्य का कोसळलं? इतिहासाने पुन्हा एकदा का वळण घेतलं? यावर या दोन्ही लेखकांच्या विवेचनाचा आशय असा की, सीआयएच्या आचरट घातपाती कारवायांपेक्षा अमेरिका आणि युरोपीय देशांनी मिळून ‘रेडिओ फ्री युरोप’ नावाचं जे आकाशवाणी केंद्र चालवलं होतं, त्याचा प्रचार निश्चितच प्रभावी होता आणि अखेर अंतर्गत असंतोष; शिवाय सर्वात निर्णायक म्हणजे डबघाईला आलेली आर्थिक स्थिती यांनी सोव्हिएत साम्राज्य संपवलं. राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह, युरी आन्द्रोपोव्ह आणि कॉन्सन्टाईन चेरनेन्को हे जुने कडवे साम्यवादी सत्ताधीश पटापटा मेले आणि उदारमतवादी मिखाईल गोर्बाचेव्ह सत्तेवर आले. त्यांनी स्वतःच वास्तवाचं भान ठेऊन सोव्हिएत साम्राज्य विसर्जित केलं. मग हे जुने तीन सत्ताधीश मृत्यूने असे ओळीने उचलले नसते तर इतिहासाने हे वळण घेतलं असतं का? हाच तर खरा अभ्यासाचा विषय आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@