उद्धरावा स्वयेआत्मा...
महा एमटीबी   20-Sep-2018
 


 
 

वि. वि. चिपळूणकर म्हणजे राज्यातील शिक्षणाला दिशा देणारे एक थोर व्यक्तिमत्त्व. सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणारा एक शिक्षक, अधिकारी आणि तज्ज्ञ अशी त्यांची ओळख होती. शिक्षण विभागातल्या प्रत्येकाने आदर्श घ्यावा, असे राज्यातील शिक्षणाला दिशा देणारे एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे वि. वि. चिपळूणकर. 

  
 
 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू चिपळूणकर यांचे मंगळवारी निधन झाले आणि राज्याच्या शिक्षणाला दिशा देणारे एक छत्र हरपले. शिक्षणाच्या क्षेत्रात ‘विद्यानिकेतन’ ही संकल्पना रूजवणार्‍या चिपळूणकरांचा जन्म मुंबईतील विलेपार्ले येथे झाला. १९७६ ते १९८६ या कालावधीत त्यांनी शिक्षण संचालक म्हणून काम पाहिले, तर ‘बालभारती’च्या उभारणीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता आणि या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून चिपळूणकर यांनी संस्कृतमधून बी. ए. आणि एम. ए. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतीलच एस. टी. कॉलेजमधून एम.एड्.चे शिक्षण पूर्ण केले. १९५० पासून त्यांनी मुंबईतील अनेक शाळांमधून शिक्षक म्हणून काम काम करण्यास सुरुवात केली. रात्रशाळेतही शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. १९६१ मध्ये ते शासकीय सेवेत शिक्षण खात्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील ’एसएमटीटी’ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले. त्यानंतर १९६३ मध्ये बीडमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. १९६६ मध्ये शासनाने ‘विद्यानिकेतन’च्या शाळा सुरू केल्या. औरंगाबाद येथील शासकीय ‘विद्यानिकेतन’चे चिपळूणकर पहिले प्राचार्य होते. १९६६ ते १९७१ पर्यंत त्यांनी ‘विद्यानिकेतन’चे प्राचार्य म्हणून काम केले. ‘विद्यानिकेतन’मधून ते पुन्हा मुंबईत १९७१ मध्ये एस. टी. कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झाले. राज्य शिक्षणशास्त्र संस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९७७ ते १९८७ या काळात शिक्षण संचालक म्हणून त्यांनी काम केले.
 
 
 माजी पंतप्रधान नरसिंह रावदेखील चिपळूणकरांचा आदर करत. त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदाची जबाबदारी असताना त्यांनी चिपळूणकर यांना दिल्लीत बोलावून त्यांच्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन संस्थेचे सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवली होती. प्रत्येक विभागाला अधिकारी अशी आजच्यासारखी स्थिती पूर्वी नव्हती. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या खालोखाल अनेक निर्णय घेण्याची जबाबदारी ही संचालकांच्याच खांद्यावर देण्यात येत होती. त्यावेळी राज्याच्या दुर्गम भागांमध्ये फिरून पालकांचे प्रबोधन करत शिक्षणाचे महत्त्व निरक्षरांना पटवून देण्याचे महत्त्वाचे कामही चिपळूणकरांनी अगदी योग्यरित्या पार पडले. डहाणू तालुक्यातील बालवाड्या पाहण्यासाठी ते डोंगराळ भागातून स्वत: अगदी पायीदेखील फिरले होते. त्यामुळे त्यांच्या मनात शिक्षणाप्रती असलेले प्रेम आणि आदर दिसून येत असे. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणकर यांनी ‘शासकीय तंत्रनिकेतन’ ही संकल्पना राबविली आणि निवासी शाळांसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. गुणवत्ता असलेले शिक्षण सर्वापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांच्याच काळात रात्रशाळाही सुरू करण्यात आल्या. पहिल्या आणि दुसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करू नये, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यांची ही सूचना राज्य सरकारने मान्य करत त्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
 

शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. अनौपचारिक शिक्षणाची संकल्पना राबवत त्यांनी अनेक वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणले. मुलींनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू केली. याद्वारे त्यांनी गरीब कुटुंबातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. याचा फायदा राज्यातील अनेक मुलींना झाला. शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान देताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यावेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटवला. समितीवर कार्यरत असताना त्यांनी सर्वांशीच उत्तम संवाद साधत शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल केले. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर १९९० मध्ये चिपळूणकर औरंगाबादेत स्थायिक झाले. औरंगाबादमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांसाठी संस्कृतचे मोफत वर्ग घेतले. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षदेखील होते. त्यांच्याच काळात सिडको एन ५ येथील गीताभवन इमारतीचे काम पूर्णत्वास गेले. त्यांना औरंगाबाद भूषणपुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता, कार्यक्षमता या गुणांचा संगम त्यांच्या अंगी होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय हे दूरगामी ठरले. अनेकदा रात्रशाळा बंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चिपळूणकर यांनी आक्रमक होत त्यालाही मोठा विरोध केला. शिक्षणाबद्दल कमालीची आस्था असणारा आणि समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलणारा द्रष्टा तज्ज्ञ अशी चिपळूणकरांची ओळख होती. त्यांनी विद्यार्थ्यांसोबतच अधिकारी आणि शिक्षकदेखील घडवले. काही दिवसांपूर्वीच वयाच्या ९०व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि शिक्षण क्षेत्रातला मोठा तारा हरपला. चिपळूणकर यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्रातील मार्गदर्शक व अनुभवी व्यक्तिमत्त्व आपण गमावले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/