हे म्हणे देश वाचवणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 
 
 
 
 
 
 
 
ज्यांना जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाआडून मिळालेला सरकारी बंगला सोडतानाही त्या बंगल्याच्या भिंती फोडून फोडून साहित्य घेऊन जावेसे वाटले ते अखिलेश यादव आता देश वाचविण्याच्या गप्पा मारताहेत. तसेही शरद पवारांपासून तर मायावतींपर्यंत, जी जी म्हणून मंडळी मागील काळात सत्तेतून हद्दपार झाली, त्या सर्वांनाच आता निवडणुकीच्या तोंडावर देशभक्तीचे उमाळे येऊ लागले आहेत. वर्षानुवर्षे सत्तेच्या दालनात वावरलेल्या या शहाण्यांना, जनतेने आपल्याला पदांवरून हाकलून का लावले आणि भाजपा सत्तेत का आली, याचे आकलन करायचेच नाहीय्. चुका नेमक्या कुठे झाल्यात, जनतेला गृहीत धरताना आपण मर्यादा तर ओलांडल्या नाही ना, खुच्यार्ंवर बसताच अंगात आलेला सत्तेचा माज तर लोकांना आपल्या वर्तणुकीतून जाणवला नाही ना, असल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या भानगडीत न पडता, केवळ लोकप्रियतेच्या मागे धावत चाललेला राजकारणाचा खेळ खेळून दमलेली विविध राजकीय पक्षांतली दिग्गज मंडळी, आता नव्या उमेदीनं मैदानात उतरण्याची तयारी करताना दिसते आहे. शरद पवारांची तर बातच सोडा. तसेही, त्यांना सत्तेचे डोहाळे लागण्याची ही काही पहिली वेळ नाही, की निवडणुकीच्या मुहूर्तावर तिसर्या आघाडीचा कायम फसत आलेला प्रयोग दरवेळी नव्याने साकारण्याची उपरती त्यांना वेळोवेळी होण्याचेही आता नवल राहिलेले नाही. सध्या जो कोणी विरोधक सत्तेत असेल, त्याला बाजुला सारून आपला सहभाग असलेल्या पक्षाचा झेंडा रोवत, सरकार सत्तारूढ करण्यासाठी धडपडण्यात त्यांचा हातखंडा.
 
 
शरद यादवांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत असे कितीतरी लोक या देशाच्या कानाकोपर्यात विखुरलेले आहेत, ज्यांना अशाच कुठल्याशा राजकीय म्होरक्याची गरज असते, जो त्यांच्या मनातले इप्सित स्वत:चे म्हणून लोकांपुढे मांडतो. यांना शरद पवार गवसले आहेत एवढेच. त्याआडून स्वत:च्या राजकारणाची गणितं तरी फत्ते होतील अशा भाबड्या आशेने ती मंडळीही तिसर्या आघाडीची स्वप्न रंगविण्यास साह्यभूत होते. इतिहास साक्षीदार आहे, या देशात विविध राजकीय पक्षांच्या साह्याने तयार झालेले तिसर्या आघाडीचे कडबोळे कधीच फार काळ टिकले नाही. अगदी आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्ताधीश झालेल्या तत्कालीन आघाडीला देखील अधिक काळ आपले अस्तित्व टिकवून धरता आले नाही. प्रत्येकालाच पंतप्रधान बनण्याची झालेली घाई हेच बहुतांशी या आघाडीची शकले पडण्यासाठी प्रमुख कारण ठरले आजवर. आताही पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत आणि लालूप्रसाद यादवांपासून तर मुलायमिंसहांपर्यंत, कोण स्वत: त्याग करून इतर कोणाचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करील, विचारून बघा एकदा सर्वांना! पण या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कॉंग्रेस असो की मग भाजपा, दरवेळी विरोधात बसलेले लोक, या प्रयोगाचे तुणतुणे वाजवित आले आहेत.
 
 
खरं तर विरोधी पक्ष ही लोकशाही व्यवस्थेची ताकद आहे. पण आज नेमकी तीच ताकद इथे विखुरलेल्या अवस्थेत खितपत पडली आहे. कारण, सत्तेपलीकडील राजकारणाची गणितं मांडायचीच नाहीयेत् कुणाला अलीकडे. सारेच नेते तेवढ्या एकाच मुद्याभोवती घुटमळत राहिल्याने, विरोधी पक्षाची भूमिका प्रभावशाली ठरण्याची उदाहरणे हळूहळू दुर्मिळ होत गेलीत. काही वर्षांपूर्वीपर्यंत सत्तेपासून अगदी कोसो दूर असताना भाजपा-सेनेच्या, बोटावर मोजण्याइतक्या सदस्यांनी अख्खे सभागृह गाजविल्याची उदाहरणे महाराष्ट्र विधानसभेने अनुभवली आहेत. इंदिरा गांधींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर उसळलेल्या लाटेच्या जोरावर लाभलेल्या सत्तेच्या जोरावर मुजोरी करत मन मानेल तसे सरकार चालवू पाहणार्या तत्कालीन नेत्यांचे मनसुबे, विरोधी बाकांवर बसणार्या तेव्हाच्या अत्यल्पसंख्येतील लोकांनी पाऽऽर उधळून लावले होते. लोकहितासाठी चाललेल्या साधनेतून हे सामर्थ्य त्यांच्या ठायी अवतरले होते. अगदी परवा परवा पर्यंत हीच परिपाठी चालू होती. पण विरोधी बाकांवर बसण्याची सवय नसलेले लोक सत्ता हातून जाताच बावचळले अन् मग सध्याची ‘ही’ परिस्थिती उद्भवली. उपोषणाला बसण्यापूर्वी हॉटेलात बसून खाद्य पदार्थांवर येथेच्छ ताव मारणारे नेते उपजलेले बघायला मिळाले देशाला. ज्याने सरकारला धारेवर धरायचे, तोच नेता पंतप्रधानांच्या गळ्यात काय पडतो, डोळे काय मिचकावतो...हसे होऊन बसलेय् अलीकडे विरोधी पक्षाचे! बहुधा म्हणूनच लोकांनीही त्यांना मर्यादित संख्येच्या परिघातच बंदिस्त ठेवले आहे. तरीही निवडणुकी जवळ आल्या की तिसर्या आघाडीचे कडबोळे पुन्हा एकदा साकारून बघण्याची खुमखुमी काही केल्या जात नाही कुणाचीच.
 
 
भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्याने अस्वस्थ झालेल्या अखिलेश यादवांना आता उत्तर प्रदेशात जमेल त्यांना, जमेल तेवढे सोबतीला घेऊन विरोधी पक्षांची मोट बांधायचीय्. कालपर्यंत ज्यांना शिवीगाळ केली त्या मायावतींपासून तर भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत, कोणालाही सोबत घेण्याची त्यांची तयारी आहे. मायावतींनी लाथाडले तरी त्यांना चुचकारण्यातही त्यांना कसलीच खंत वाटत नाही. हीच अवस्था देशभरातल्या इतर नेत्यांचीही झाली आहे. सत्तेबाहेर बसण्याची वेळ आल्याने सर्वच जण जणू बेचैन झाले आहेत. सारेच भाजपाला सत्तेबाहेर घालवण्यासाठी कसे आतुर झाले आहेत! त्यासाठी देश वाचविण्याची हाळी देण्यासही सरसावले आहेत काही लोक. नाटकाच्या या प्रयोगाची नांदी तर एव्हाना झालेली आहेच. पण, निदान सहा दशकं या देशावर सत्ता गाजविणार्या कॉंग्रेसलाही उद्या या आघाडीचा एक भाग बनण्याची इच्छा झाली तरी नवल वाटण्याचे कारण नाही. अर्थात त्या पक्षाची अवस्था सध्या त्याच पातळीवर पोहोचली आहे. राजकारणात सत्ताप्राप्तीचे उद्दीष्ट कुणी नजरेसमोर ठेवण्यात गैर असे काहीच नाही. फक्त देशहिताच्या बाता करण्याचा विनोद कुणी करू नये एवढेच. दुर्दैवाने तेच करायला प्रत्येक जण सरसावलेला दिसतोय्.
 
 
कालपर्यंत सत्तेत असताना घोटाळ्यांमागे घोटाळे करणार्या कॉंग्रसने, मुलायमिंसहांच्या चिरंजीवांनी, दस्तुरखुद्द मायावतींनी, बाहेर देशातील नागरिकांना आपल्या राज्यात येण्याचे आवतन देत मतांचे राजकारण करणार्या ममता दीदींनी देशभक्तीची ग्वाही देत त्यांच्या हाती सत्ता सोपविण्याची भाषा वापरावी, यापेक्षा विनोद दुसरा तो काय असणार? त्यामुळे या पक्षांनी जरूर एकत्र यावे. त्यांच्या नेत्यांनी आपसात दहादा कुस्त्या खेळत, एकमेकांना आपटी देत, पुन्हा गळाभेटीचा जाहीर कार्यक्रमही करावा. पण निलाजरेपणाने त्याला राष्ट्रभक्तीचा किंवा देशहिताचा मुलामा देण्याचा उपद्व्याप मात्र करू नये. कारण यांचे घाणेरडे राजकारण आणि देशहीत याची सांगड कधीच घातली जाऊ शकत नाही. उलट देशहिताला तिलांजली देतच त्यांच्या राजकारणाचा दर्जाहीन खेळ चालला आहे आजवर. आता फक्त भाजपाला बाजुला सारण्यासाठी ते देशहिताची ग्वाही देणार असतील, तर त्यासारखा खोटारडेपणा दुसरा नसेल. तेव्हा, पवारांपासून तर अखिलेशपर्यंत सर्वांना एवढीच नम्र विनंती आहे. देशभक्तीचा असा बाजार मांडू नका राजेहो! एरवी प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करता. निदान एवढा एक मुद्दा तरी सोडून द्या...!
@@AUTHORINFO_V1@@