जातीव्यवस्था ही व्यवस्था नव्हे, अव्यवस्था! : सरसंघचालकांचा प्रहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |
 

 

‘भविष्यातील भारत’ व्याख्यानमालेची प्रश्नोत्तरांनी सांगता
 

नवी दिल्ली  जातीव्यवस्था ही व्यवस्था नसून ‘अव्यवस्थाआहे, अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदू समाजातील जातीव्यवस्थेवर प्रहार केला. तसेच, पूर्वी जातीव्यवस्था कशी होती याचा आज विचार करण्याचे काहीच कारण नसून ती केव्हा न केव्हा जाणारच आहे. परंतु, त्यासाठी प्रयत्न केल्याने ती निश्चितच जाईल. अंधारात काठी मारून अंधार जाणार नाही तर एक दिवा पेटवून जाईल. हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असून सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या सर्व गोष्टी हद्दपार झाल्याच पाहिजेत, असे आग्रही प्रतिपादन सरसंघचालक डॉ. भागवत यांनी केले.

 

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 'भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीकोनातून' या गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना सरसंघचालकांनी विस्तृतपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी हिंदुत्व, जातीव्यवस्था, समरसता, शिक्षणव्यवस्था, भाषा, महिला, महिलांची सुरक्षा, गोरक्षा, जातीय आरक्षण, समान नागरी कायदा, अयोध्येतील राममंदिर या व अशा असंख्य प्रश्नांवर मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांवर आपले मत मांडले. आंतरजातीय विवाहासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, आंतरजातीय विवाहांचे संघ समर्थन करतो. जर आज देशातील आंतरजातीय विवाहांची संख्या मोजली तर त्यात सर्वाधिक विवाह हे संघस्वयंसेवकांनी केल्याचे आढळून येईल, असाही दावा त्यांनी केला. अभेद आणि अभेद्य समाज घडवण्यासाठीच संघ कार्यरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. भागवत पुढे म्हणाले की,आंतरजातीय विवाह हे समाजासाठी अतिशय गरजेचे आहेत, त्यामुळे समाजात समरसतेची भावना वाढीस लागण्यास मदत होते. संघात कधीही जात विचारली जात नाही, जात ही व्यवस्था नसून ती अव्यवस्था आहे आणि ती नष्ट करण्यासाठी संघ काम करीत आहे. सुरूवातीस म्हणजे पन्नासच्या दशकात संघात ब्राह्मणांची संख्या जास्त होती. आज मात्र सर्व जातींमध्ये संघ रूजला आहे. भटक्या आणि विमुक्तांसाठीही संघ कार्यरत आहे, महाराष्ट्रातील यमगरवाडी प्रकल्प हा सर्वांनी जरूर पहावा असे आवाहन करतानाच या प्रकल्पाद्वारे भटक्या आणि विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संघाने केले असल्याचे सरसंघचालक म्हणाले.

 

डॉ. मोहनजी भागवत यांना गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांविषयी विचारले असता ते म्हणाले की, केवळ गाय नव्हे, कोणत्याही प्रश्नासाठी कायदा हाती घेणे अयोग्य आहे. कायदा हातात घेण्याचे समर्थन रा. स्व. संघाने कधीही केलेले नाही, अशा प्रकारास आमचा विरोधचआहे. मात्र, गाय हा भारतीयांच्या श्रद्धेचा विषय आहे, गायीमुळे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. त्यामुळे गायीचे संरक्षण करण्यासोबतच संवर्धनही करणे गरजेचे आहे. संरक्षण हे संवैधानिक पद्धतीनेच झाले पाहिजे, गोहत्याबंदी कायदा हे संविधानातील एक तत्व आहेच. त्याचप्रमाणे गोरक्षांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची ज्या तीव्रतेने चर्चा होते, तेवढी तीव्र चर्चा गोतस्करांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांविषयी होत नाही, असा दुटप्पीपणा का दाखविला जातो, असे सांगत प्रामाणिकपणे गोसंवर्धन करणाऱ्यांना ‘मॉब लिंचिंगशी जोडू नका’असेही डॉ. भागवत यांनी यावेळी सांगितले. आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, आरक्षणास संघाचा विरोध असल्याचा अपप्रचार अनेकदा केला जातो, त्यात काहीही तथ्य नाही. हजारो वर्ष सामाजिक विषमतेमुळे आपल्याच समाजातील एका घटकास वंचित ठेवण्याचे काम आपणच केले आहे, त्यामुळे विषमता नष्ट होईपर्यंत आरक्षण हे राहणारच. आरक्षण कधी संपुष्टात आणायचे याचा निर्णय ज्यांन आरक्षण मिळते, तेच घेतील. खरी समस्या आरक्षण नसून आरक्षणाचे होणारे राजकारण ही खरी समस्या आहे. संविधानाने दिलेल्या सर्व प्रकारच्या आरक्षणास रा. स्व. संघाचा पाठींबा आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातींवर अत्याचार होतात, हेही सत्य असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. हा कायदा योग्य प्रकारे लागू व्हावा आणि त्याचा गैरवापर होऊ नये,अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यासाठी समाजात सद्भावना आणि समरसता निर्माण करणे गरजेचे आहे. समलैंगिक हे आपल्याच समाजाचा भाग आहे आणि त्यांच्यासाठी आपणच व्यवस्था करणे गरजेचे असल्याचेही सरसंघचालक डॉ. भागवत यांनी नमूद केले.

 

समान नागरी कायद्याबाबतदेखील डॉ भागवत यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, समान नागरी कायद्याला केवळ हिंदू मुस्लिम धर्मासोबत जोडू नये. यामुळे सर्व धर्मांत परिवर्तन येणार आहे. एक संहितेसाठी समाजाचे मन वळवायला पाहीजे. समान नागरी कायदा एकतेसाठी गरजेचा आहे. ‘गोली नही, बोली से बात हो सकती है’ असे सांगतानाच सरकारने लोकांपर्यंत पोहचावे, असे ते म्हणाले. कायदा तोडणारे, देशद्रोहाची भाषा करणारे आदींच्या बाजूने समाजाने उभे राहू नये. तरच अंतर्गत सुरक्षा मजबूत राहील. जम्मू आणि काश्मिरंमधील कलम ३७० रद्द व्हावे, असेही ठाम मत डॉ. भागवत यांनी मांडले. धर्मपरिवर्तन कोणाकडून केले जाते, याची माहिती घ्या आणि मग समजेल की विरोध का करायला हवा. त्यासाठी संघाचा डाटा नव्हे तर विरोधकांनी काढलेला डाटा अभ्यासावा. चर्चमध्ये आणण्यासाठी आर्थिक अमिष दिले जाते. देव-आध्यात्म ही विकण्याची गोष्ट नाही. त्यामुळे संघाचा धर्मांतरास विरोध आहे, असेही डॉ. भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे : अयोध्येमध्ये लवकरात भव्य राममंदिर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी अध्यादेश आणायचा की संवादातून मार्ग काढायचा, हे सरकार आणि रामजन्मभूमी न्यासाने ठरवायचे आहे. मात्र, राममंदिर झाल्यास हिंदू-मुस्लिम वादाचा एक मोठा मुद्दा संपणार आहे, तसेच सामोपचाराने ते झाल्यास मुस्लिमांवर बोट उचलले जाण्याचे प्रमाण कमी होईल. देशभरात रामाची अनेक मंदिरे आहेत, बरीचशी पाडण्यातही आली आहेत. मात्र, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, तेथे राममंदिर असावे, अशी हिंदुंची साधी मागणी आहे. या प्रश्नाचे राजकारण झाले नसते, तर कधीच राममंदिर बांधून झाले असते, असेही मत सरसंघचालक डॉ. भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@