जातियतेच्या पलीकडे माणूस होणे महत्वाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018   
Total Views |



जातीयतेचा विखार परजत विद्वेश पसरविण्याचे काम सध्या समाजात काही समाजकंटक करत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुष्याच्या संघर्षाला कोणतेही लेबल न चिकटवता ‘भवतू सब्ब मंगलम्’ची उदात्त भावना असणारे महेश कांबळे!

 

सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग हे महेश कांबळे यांचे मूळ गाव. महेशचे वडील अंकुश मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई नगरात राहायचे, खाजगी कंपनीत अंगमेहनतीचे काम करायचे. आई शशिकला दहावी शिकलेली गृहिणी. या दोघांना दोन मुले, एक मुलगी आणि एक मुलगा महेश. रमाबाई नगर ज्याने अनुभवलंय त्यालाच तिथले धगधगते वातावरण माहिती. या वातावरणात महेश घडत होता. महेश आठवीला असतील. अंकुश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच ते बुद्धवासी झाले. शशिकला यांच्यावर सर्व जबाबदारी आली. त्या माऊलीने कंबर कसली. दोन मुलांना शिकून सवरून रंगारूपाला आणायचे हेच तिचे ध्येय झाले. अंगणवाडी सेविका म्हणून ती काम करू लागली. आईचे कष्ट, तिची मुलांना जगवण्याची धडपड पाहून महेशला वाटे, आपणही काम करावे. पण वय लहान कोण काम देणार? मग महेश जवळच असलेल्या कामराज नगर येथील आरटीओच्या कार्यालयात आलेल्या गरजू वाहनचालकांना फॉर्म भरून द्यायचे काम करू लागलामहेश दहावी पास झाले. महाविद्यालयात प्रवेश कसा घ्यावा? कुणी मार्गदर्शन करायला नव्हते. सकाळी सहा वाजता उठून चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी रांग लावावी, असे महेशने ठरवले आणि तसे केलेही. पण पुढे पाहिले तर तिथे त्या गर्दीत आई सुरुवातीला उभी. बहुतेक उपाशीच आली असेल. सकाळी ४ वाजताच ती तिथे आली होती. महेशला भडभडून आले. आपल्यासाठी नाही तर आईसाठी शिकायचेच, हे त्याने ठरवले. महाविद्यालयीन जीवन सुरू झाले. छानछोकीत राहणे तर सोडा वह्या पुस्तके मिळणे हीसुद्धा महेशसाठी मोठी गोष्ट होती.

 
 

१९९१ साल होते. रमाबाई नगरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून उद्भवलेल्या परिस्थितीत दहा जण मृत्युमुखी पडले. भयाण आणि भीषण वातावरण होते. त्यावेळी भाजप-शिवसेनेची सत्ता होती. महेशचे मित्र हरीश यांनी महेशला सांगितले, ज्या दहा कुटुंबातल्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या त्यांना भाजपचे स्थानिक नगरसेवक शरद कांबळेंच्या सोबत भेट देऊया. सुशिक्षित आणि मनमिळाऊ महेशचे सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे त्या दहा कुटुंबीयांची भेटही झाली. तोपर्यंत वस्तीत काही स्वार्थसाधू राजकारणी जातीय विद्वेष वाढविण्याचे काम इमानेइतबारे करत होते. मात्र, महेश आणि सहकारी या सर्वांच्या पलीकडे जाऊन रमाबाईमधील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पुन्हा कसे उभे करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. आ. भाई गिरकरांच्या पुढाकाराने तसेच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी विषय लाऊन धरल्यामुळे या कुटुंबातील प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळाल्याचे पत्रही मिळाले. महेशला हुरूप आला. वाटले, छे! जातीय विद्वेषाच्या पलीकडेही समन्वय आणि भारतीयत्व हे मोठेच आहे. पण जेव्हा हे दहाजण नोकरीचे पत्र घेऊन वस्तीत आले, तेव्हा काही जातीयवादी लोकांनी या मुलांना भडकावले की, भाजपच्या लोकांनी दिलेली नोकरी घेऊ नका वगैरे वगैरे. त्यामुळे त्या दहाजणांपैकी काहींनी ती नोकरी स्वीकारली नाही. महेश हे खुल्या डोळ्याने आणि मनाने पाहत होते. त्यांच्या मनात आले, घरची रोजीरोटी, सुरक्षितता आणि सन्मान महत्त्वाचा. ते देणारे हात कधीही विघातक नसतातच. असे असताना वस्तीतल्या भोळ्या मुलांना चांगली नोकरी मिळत असतानाही ती नाकारा असे सांगणारे लोक काय विचार करतात? आणि मुलांनीही गरज असताना मिळालेली सरकारी नोकरी अशी सहज नाकारावी? समाजात पसरवला गेलेला विद्वेष समाजासाठी आणि प्रत्यक्ष समाजातील तरुणांसाठीही घातकच. हे विषारी वास्तव महेश यांनी अनुभवले. पुढे अशाच वातावरणात १९९४ ला महेश पदवीधर झाले. छोट्यामोठ्या नोकर्‍या करू लागले. पण सिप्झची नोकरी करताना ते युनिटच बंद झाले. अर्थार्जन तुटले. मित्र हरीशने भाई गिरकर यांच्या माध्यमातून जनकल्याण बँकेत क्लेरिकल पोस्टवर कामाला लावले. त्याच दरम्यान महेश बँकेची परीक्षा पास झाले. पुढे बँकेचे संगणकीकरण होताना त्यांची नियुक्ती आयटी विभागात झाली. त्यांचा जनकल्याण सहकारी बँकेच्या विविध शाखांशी संपर्क, संवाद होऊ लागला. बँकेची संपूर्ण कार्यप्रणाली त्यांनी जवळून अनुभवली, हाताळली. पुढे बँकेच्या उच्च पदासाठीची परीक्षा पास करत महेश जनकल्याण सहकारी बँकेच्या कन्नमवारनगर विक्रोळी शाखेचे मॅनेजर झालेबँकेची ही शाखा नफ्यात चालत नव्हती, पण महेश यांनी विविध उपक्रम राबवून बँकेला नफ्याच्या टप्प्यात आणले. बँकेची कर्जाची क्षमता ६ कोटी होती. ती १३ कोटी म्हणजे दुप्पट झाली. महेश म्हणतात,“विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज आणि महिलांनी स्वयंरोजगार करून सक्षम व्हावे यासाठी मी विशेष प्रयत्न करतो. कारण मला माहिती आहे, एक आई सक्षम असेल तर ती मुलाला शिकवते. सक्षम बनवते. एक चांगला माणूस बनवते. समाज आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने सर्व भेद सारत एक चांगला माणूस बनणे आवश्यक आहे. भवतु सब्ब मंगलम् हीच इच्छा आहे.” आर्थिक-सामाजिक-वंचित पार्श्वभूमीतून संघर्षापेक्षा समन्वय साधत यशस्वी झालेले महेश. त्यांच्यातले माणूसपण मोठे आहे.

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
 
@@AUTHORINFO_V1@@