कुमारस्वामी सरकारवर टांगती तलवार ?
महा एमटीबी   17-Sep-2018
 

कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारची अवस्था एवढी नाजूक झाली आहे की, कोणत्याही क्षणी हे सरकार अखेरचा श्वास घेईल अशा अवस्थेत आहे. चिंताजनक स्थितीत अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजत असलेल्या रुग्णासारखी या सरकारची अवस्था झाली आहे, असे कर्नाटकमधील भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी जे म्हटले आहे तशी काहीशी अवस्था त्या सरकारची झाली आहे.

 

सरकार सत्तेवर राहायला हवे, यासाठी कुमारस्वामी यांच्यापेक्षा काँग्रेसचेच नेते धावपळ करीत असल्याचे चित्र त्या राज्यात दिसत आहे. कर्नाटक सरकार शंभर टक्के सुरक्षित असल्याचा दावा त्या पक्षाचे अ.भा. सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला असला तरी काँग्रेस पक्षात विविध नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी जी धावपळ चाललेली दिसत आहे, ती पाहता पक्षात सर्व काही ठाकठीक नाही हेच दिसून येत आहे. पण आपल्या पक्षातील ही धुसफूस शांत करण्याकडे लक्ष देण्याऐवजी उलट भाजपवर आरोप करून, भाजप फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करीत आहेत. काँग्रेसचेच नेते असा आरोप करीत नसून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही भाजपचे नेते आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असून त्यासाठी वाममार्गाने मिळविलेल्या पैशांचा वापर करीत आहेत, असा आरोप केला आहे. मात्र कुमारस्वामी यांचा हा आरोप भाजप नेते सोमशेखर जयराज यांनी ठामपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर जे आरोप केले आहेत, त्याबद्दलचे पुरावे सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध काय कारवाई करायची त्याचा निर्णय घेऊ, असा इशाराही त्यांनी कुमारस्वामी यांना दिला आहे. मात्र, काँग्रेसने भाजपवर जे आरोप केले आहेत, ते आरोप भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी फेटाळून लावले आहेत. कर्नाटकात आघाडी सरकार सत्तारूढ आहे, त्याचे भाजपला काहीही देणेघेणे नाही आणि या स्थितीचा फायदा उठविण्यामध्ये भाजपला रस नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

काँग्रेसच्या काही आमदारांमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी आहे तर काही ठिकाणी काँग्रेसमधील अंतर्गत गट हमरीतुमरीवर येऊन एकमेकांशी भांडत आहेत. विरोधक सरकार अस्थिर करीत असल्याचे आरोप सत्तारूढ युतीचे नेते करीत असले तरी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच सरकार अस्थिर करीत आहेत, असा आरोप करण्यात आल्याने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांना तसे काही नसल्याचा खुलासा करावा लागला. सिद्धरामय्या यांचे नाव या वादात विनाकारण ओढले जात आहे, असे गुंडू राव यांनी म्हटले आहे. मध्यंतरी, कर्नाटक सरकारमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल बेळ्ळारी जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना शांत केले जात नाही तोपर्यंत बेळगावमधील काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील आठ आमदारांचा गट पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा माध्यमांमधून सुरू आहे. बेळगावमधील वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या युरोप दौर्‍यावर गेले होते. जे आमदार सिद्धरामय्या यांचे समर्थक असल्याचे मानले जात होते त्यांनी, सिद्धरामय्या दौरा करून येईपर्यंत थांबण्याची तयारी दर्शविली होती. त्यांची भेट घेऊन पक्षातील समस्येवर मार्ग काढण्याचे ठरविले होते. मात्र आता त्यांनी ‘घूमजाव’ केले असून, त्यांचे कट्टर समर्थक असलेले बेळगावमधील नेते त्यांना भेटण्याची गरज नसल्याचे सांगत आहेत. हे सर्व पाहता सिद्धरामय्या यांचे ऐकण्याच्या स्थितीतही ते नाहीत, असे लक्षात येत आहे. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सिद्धरामय्या हे मार्ग काढतील हे लक्षात घेऊन के. सी. वेणुगोपाल, दिनेश गुंडू राव आदींनी त्यांची भेट घेऊन या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व आमदार पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दावे करण्यात येत असले तरी ते तसे नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते, बेळगावचे दोघे भाऊ रमेश जारकीहोळी आणि सुरेश जारकीहोळी पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यातील रमेश जारकीहोळी हे तर नगरपालिका प्रशासन खात्याचे मंत्री आहेत आणि ते काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. तर त्यांचा भाऊ सुरेश जारकीहोळी यांनी, पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे सांगितले आहे. पुढील काही दिवसांत युतीच्या सरकारला धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सूचित केल्याचे पाहता कुमारस्वामी सरकारच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे. काही काँग्रेसचे आमदार पक्ष सोडून भाजपमध्ये गेले तर त्यास आम्ही (भाऊ) काय करू शकतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

 

बेळगाव काँग्रेसवर कोणाचे नियंत्रण असावे यावरून जारकीहोळी बंधू आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गटात जे चहाचे वादळ उठले होते, त्याने आता वादळाचे रूप धारण केले आहे. बेळगावात जो वाद उफाळला आहे, त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले असले तरी काही नेते त्यांच्याकडेही बोट दाखवित आहेत. काँग्रेस पक्षातील आठ आमदार बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांना पक्षातील अनेक ज्येष्ठ असंतुष्ट नेते अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना ज्येष्ठ नेते शिवकुमार हे पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. मुख्यमंत्री होण्याची त्यांचीही मनिषा आहे. या घटना घडत असताना मंत्रिपदावर असलेले रमेश जारकीहोळी सध्या कोठे आहेत याचा ठावठिकाणा त्यांच्या भावालाही माहिती नाही! कोणत्याही अधिकृत कार्यक्रमांनाही ते हजेरी लावत नाहीत. त्यामुळे त्यांची पुढची खेळी काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसमध्ये असंतोष असताना, त्यावरून लक्ष वळविण्यासाठी, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, आमदारांना आमिषे दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप होत आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या येडीयुरप्पा यांच्यापासून अनेक नेत्यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कुमारस्वामी यांचे सरकार शंभर टक्के सुरक्षित असल्याचा के. सी. वेणुगोपाळ यांचा दावा कितपत खरा आहे, त्याची प्रचिती पुढील काही दिवसांत येईल. २३ मे २०१८ रोजी सत्तेवर आलेले कुमारस्वामी सरकार आपले सहा महिने तरी पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/