कर्तव्य चौथ्या स्तंभाचे...
महा एमटीबी   17-Sep-2018

 


 
 
म्यानमारमधील दोन पत्रकांराना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.या प्रकरणाकडे पाहताना दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा. मुळात पत्रकार म्हटल्यावर जबाबदाऱ्या या आल्याच. वृत्तांकन करताना काही पत्रकारांना भान राहत नाही. आपल्याकडील एखादी गोपनीय माहिती आपल्याच वृत्तवाहिनीवर कशी सर्वप्रथम देता येईल, हेच पाहिले जाते. स्पर्धेत टिकण्यासाठी काय वेगळे करता येईल? यालाच प्रथम प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारची स्पर्धा ही खरोखर वाईट आहे.
 
 
म्यानमारमधील दोन पत्रकांराना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. रखाईन येथे रोहिंग्या समाजावरील सैन्याच्या कारवाईचे वृत्तांकन करताना या पत्रकारांनी म्यानमार सरकारच्या गोपनीयतेच्या नियमांचा भंग केला होता. या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. वा लोन (वय वर्षे ३२) आणि क्यो साई ओ (वय वर्षे २८) अशी या दोन तरुण पत्रकारांची नावे आहेत. त्या पत्रकारांना करण्यात आलेली शिक्षा ही योग्यच आहे, असे म्यानमारच्या नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आँग सान सू ची यांनी म्हटले. याप्रकरणी या दोन पत्रकारांना झालेली शिक्षा म्हणजे त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आलेली गदा आहे, अशा प्रतिक्रिया जगभरातून उमटत होत्या. 
 
 
परंतु या प्रकरणाकडे पाहताना दुसऱ्या बाजूनेही विचार करायला हवा. मुळात पत्रकार म्हटल्यावर जबाबदाऱ्या या आल्याच. वृत्तांकन करताना काही पत्रकारांना भान राहत नाही. आपल्याकडील एखादी गोपनीय माहिती आपल्याच वृत्तवाहिनीवर कशी सर्वप्रथम देता येईल, हेच पाहिले जाते. स्पर्धेत टिकण्यासाठी काय वेगळे करता येईल? यालाच प्रथम प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारची स्पर्धा ही खरोखर वाईट आहे. भारतातही याचे उदाहरण पाहायला मिळेल. २६/११ चा ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ला याचे जिवंत उदाहरण आहे. पोलिसांचे बचावकार्य कशाप्रकारे चालू आहे, इथपासून ते हेलिकॉप्टरमधून किती कमांडो तैनात करण्यात आले आहेत, ते कमांडो ताजमध्ये कोणत्या मार्गाने प्रवेश करत आहेत, इथपर्यंत अगदी बित्तंबातमी दहशतवाद्यांना वृत्तवाहिन्यांद्वारे मिळत होती. हे उशिरा लक्षात आल्यावर मात्र लाइव्ह रिपोर्टिंग थांबविण्यात आले. त्यामुळे पत्रकारिता करताना आपल्या मर्यादा कुठेतरी ओळखल्या पाहिजेत. कुठे थांबायला हवे, हे कळले पाहिजे अर्थात पत्रकारिता कुठवर करावी आणि कुठवर नाही याचे भान आता यायला हवे. समाजात दबलेल्या आवाजांना वाचा अवश्य फोडावी, पीडितांना न्याय मिळवून द्यावा. परंतु कुठेतरी, कधीतरी सगळ्याच गोष्टींकडे बातमीच्या दृष्टिकोनातून न पाहता आधी एक माणूस म्हणून पाहावे. म्हणजे स्वत:लाही जगता येईल व दुसऱ्यांना जगण्याचा आधारही देता येईल, तसेच कसे जगावे याचा कदाचित पायंडादेखील घालून देता येईल. रोहिंग्या हा मुळात वादग्रस्त विषय आहे. त्यामुळे या विषयाचे वृत्तांकन करताना ते दोन पत्रकार कुठेतरी मर्यादेपलीकडे वाहवत गेलेही असतील, पण आजकाल अशा प्रकरणांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला जातो. मग आपल्याला खरंच स्वातंत्र्य आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. याचे उत्तर म्हणजे, हो! स्वातंत्र्य आहे, हे खरे परंतु आपल्या कृतींमुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल, कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर तर मात्र ते स्वातंत्र्य म्हणावे का?
 

स्वत: मानवाधिकार कार्यकर्त्या असलेल्या आँग सान सू ची यांनी याप्रकरणी त्या पत्रकारांना दिलेली शिक्षा ही योग्यच आहे, असे म्हणण्यात काहीतरी तथ्य असणारच ना! एखाद्या देशाची गोपनीय माहिती अशाप्रकारे वृत्तांकन करताना जाहीरपणे उघड करणे, ही काही साधी बाब नव्हे! कदाचित यात आपण काहीतरी शौर्य करत आहोत, असे त्या दोघा पत्रकारांना वाटलेही असेल. पण त्याचे पुढे एवढे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांना वाटले नसेलचभारतात तर माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते, परंतु त्याचे तितके गांभीर्यही माध्यमांतील लोकांनीच जपायला हवे. पत्रकार म्हणून असलेले अधिकार सवलती मिळविण्यासाठी वापरण्यात गैर काहीच नाही. पण मुळात पत्रकार हा सामान्य नागरिकांपेक्षा कधीही वेगळा नसतोच. जनसामान्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम पत्रकार करत असतो. कोणत्याही प्रकरणातील सत्य काय आहे, याचा शोध घेत, बातमीचा पाठपुरावा करत, ते सत्य लोकांसमोर निर्भिडपणे सादर करणे हीच पत्रकारितेची खरी व्याख्या म्हणता येईल. आता म्यानमारमधील त्या दोन पत्रकारांवरून जगातील सर्वच पत्रकारांनी धडा घ्यायला हवा. त्यांची पत्रकारितेतील कारकीर्द तर आता संपल्यातच जमा आहे, पण यावरून धडा घेत आपण देत असलेली बातमी कितपत खरी आहे, हे एकदा तपासूनच ती द्यायला हवी. तसेच सरकारनेही पत्रकारांसाठी असलेले नियम प्रकरणाचे गांभीर्य पाहून गरजेनुसार शिथिल किंवा कडक करायला हवेत.

- साईली भाटकर

 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/