उदय नावापुरताच
महा एमटीबी   17-Sep-2018
 
  
गांजाचे सेवन कायदेशीर करा, त्यातून सरकारला मोठे उत्पन्न मिळेल,” अशी दुर्बुद्धी उदय चोप्राला झाली आणि त्याने ट्विटही केले. गांजा ही भारताची कशी संस्कृती होती, गांजा हा दारूपेक्षा कसा चांगला आहे, याचे महत्त्व त्याने पटवून दिले. पोलिसांनीही ट्विटरवरूनच त्याला प्रत्युत्तर दिले. भारताचा नागरिक म्हणून आपण अभिव्यक्त होणे योग्यच आहे. मात्र, गांजाचे सेवन आणि तस्करी कायद्याने गुन्हा आहे, अशा शब्दांत त्याला समज देण्यात आली. पोलिसांनी ट्विट पिन करून ठेवले आहे. मात्र, उदय चोप्राने अद्याप हे ट्विट मागे घेतलेले नाही किंवा त्याच्या वक्तव्याबद्दल पोलिसांची माफीही मागितलेली नाही. या साऱ्या बाबतीत दक्ष असलेले नेटकरी यावेळीही गप्प राहिले नाहीत. त्यांनी उदयची चांगलीच धुलाई केली. त्याच्या वक्तव्याचा समाचार घेत त्याला मनसोक्त ट्रोलही करण्यात आले. १४ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या या अभिनेत्याला देशातील इतर प्रश्नांऐवजी केवळ गांजावर बोलण्यासाठी दुर्बुद्धी व्हावी, हे दुर्दैवीच. याउलट अनेक अभिनेत्यांनी समाजकार्याचा वसा घेत काही प्रश्नांवर आवाज उठवला आहे. काहींनी स्वतःहून पुढाकार घेत कुणाच्या दुःखांवर फुंकर घालण्याचे काम केलेही आहे. किमान त्यांचा तरी आदर्श उदय चोप्राने घ्यावा, असा सल्ला नेटकर्‍यांनी त्याला दिला आहे. तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणार्‍यांनी समाजमाध्यमांचे कोलीत हाती आले म्हणून अकलेचे असे तारे तोडावेत, याची कीव करण्यासारखेच आहे. बऱ्या चदा माध्यमांवर तोंडसुख घेत त्यांना वाईट ठरविणाऱ्या कलाकारांनी या प्रकाराला काय म्हणावे तेही सांगावे. यापूर्वी आपल्या ट्विटमुळे वादात सापडलेले सलमान खान, कपिल शर्मा यांनाही नेटकर्‍यांनी धू धू धुतले आहे. या गोष्टींपासून धडा घ्यायचा की, आपणही त्या आगीत उडी मारायची, हे अभिनेत्यांना समजायला हवे. इतक्या मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असणाऱ्या या सेलिब्रिटींनी आपल्या या व्यासपीठाचा वापर लोकोपयोगी कामासाठी करावा, त्याद्वारे तरुणाईला संदेश द्यावा की, गांजा उत्पादन कसे योग्य याचा सल्ला द्यावा, हे त्यांनीच ठरवावे. नशामुक्ती चळवळ हे युवा भारतासाठी मोठे आव्हान आहे. मुंबईतील भांडुपसारख्या भागातील नशाबाजांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. किमान केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त करण्यापेक्षा निदान आपण केलले विधान चूक आहे, असे सांगण्याची हिम्मत बाळगत माफी तरी उदय चोप्राने मागावी.
 
 
 

दिल्लीचा मार्ग धोकादायक

मुंबई-दिल्लीतील राष्ट्रीय महामार्गावरील ३० टक्के भाग हा धोकादायक असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून उघड झाले. कार, बस आणि दुचाकीचालकांसाठी मुंबई आणि दिल्लीतील प्रवास जीवघेणा ठरू शकतो, असे आकडेवारी सांगते. जागतिक बँक, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यासह अन्य संस्थांनी हा सर्वे केला आहे, तर मुंबई-चेन्नई या मार्गावरील निम्म्याहून अधिक भाग धोकादायक आहे, असे निरीक्षण सांगते. मुंबई-चेन्नई, मुंबई-दिल्ली या कॉरिडोरच्या या तपासणीत केवळ ४० किलोमीटरच्या या मार्गाला पाच पैकी पाच गुण मिळाले आहेत. या मार्गावरून जाणे, हे वाहनचालकांसाठी दिव्य आहेच. याच आकडेवारीत राष्ट्रीय महामार्गावर ५२ हजार जणांचा आणि राज्य महामार्गावर ४० हजार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारीही उघड झाली आहे. त्याची कारणे वेगावरील नियंत्रण, मद्यपान करून वाहन चालवणे, स्पर्धा करणे आदीही असू शकतात मात्र, रस्त्याबाबतच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. मग प्रश्न पडतो की, या रस्त्यांवर टोल आकारणाऱ्या खासगी कंपन्यांनी महामार्गाच्या देखभालीकडे लक्ष द्यायला नको का?, रस्ते बांधकाम करतानाच त्याबाबत तरतूद करण्यापेक्षा नफेखोरीच्या नादात कंपन्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करतात. या सर्वेक्षणातील महत्त्वाची बाब म्हणजे वेग. या मार्गावरून जाताना वेग हा ताशी 80 किमी असावा, असे सांगण्यात येत आहे. देशाच्या एकूण महामार्गापैकी केवळ दोन टक्के रस्ते हे राष्ट्रीय महामार्गांतर्गत येतात. पण अपघातांची संख्या पाहता ही बाब चिंताजनक आहे. मुंबई-दिल्ली-कोलकाता-चेन्नई या चतुष्कोनाला या सर्वेक्षणात केवळ पाचपैकी एक किंवा दोन गुण मिळाले आहेत. प्रश्न उरतो तो या मार्गाच्या देखभालीचा आणि गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवण्याचा. या मार्गांच्या निर्मितीच्या निविदा निघाल्यावर त्याच वेळेस कंत्राटदार कंपन्यांकडून रस्त्याच्या गुणवत्तेची हमी घेणे यात सुधारणा ठरेल. महामार्गांची निर्मिती झाल्यावर त्यातून येणाऱ्या टोलद्वारे कंपन्या आपला जमा-खर्च आणि नफाही वसूल करतात, पण खड्डे पडल्यावर मार्गाला जबाबदार ठरवले जाते. या कंपन्यांवर वचक हवा, टोलवसुलीचे ऑडिट हे स्वतंत्र सरकारी यंत्रणेद्वारे व्हायला हवे. रस्त्यांच्या दर्जाविषयीची हमी निर्मिती करणाऱ्या कंपनीनेच घ्यायला हवी.

- तेजस परब

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/