देणाऱ्याने देत जावे...
महा एमटीबी   17-Sep-2018

 


 
 
 
विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटण्यामागील मूळ कारण म्हणजे समाजात वाचनसंपदा वाढावी; असे मला वाटते. अवांतर वाचनामुळे माणसाला चार चांगल्या गोष्टींचे ज्ञान होते.’
 

आजकाल प्रत्येकजण आपला नोकरी-धंदा सांभाळत जगत असतो. समाजकार्यासाठी आपल्याकडील काही पैसे देऊ करणेही अनेकांना जीवावर येते. आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो. हे बहुदा लोकं विसरलेलेच असतात. पण या सगळ्याला अपवाद म्हणजे नाशिकचे ‘अतुल विलास पवार’ हे व्यक्तिमत्व! अतुल पवार हे गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे कार्य करत आहेत. अभ्यासू व काहीतरी करून दाखवण्याची धमक, क्षमता असलेल्या गरजवंतांना अतुल पवार शैक्षणिक पुस्तके मोफत देतात. नाशिकमध्ये अतुल यांचे ‘पवार बुक डेपो’ हे पुस्तकांचे दुकान आहे. ‘पवार बुक डेपो’च्या नाशिक जिल्ह्यात ४ शाखा आहेत. तसेच अतुल पवार हे नाशिक जिल्हा बुक सेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पुस्तकांच्या या व्यवसायात मिळणारा नफा ते पाहत नाहीत, तर समाजकार्यासाठी २० ते २५ हजार रुपये अतुल सहज देऊ करतात. एवढी रक्कम समाजकार्यासाठी देणे म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सोप्पी गोष्ट नव्हे. “पण व्यवसाय सुरळीत चालतो. उत्पन्नही खूप होते. त्यामुळे आपल्या उत्पन्नातील काही भाग हा सामाजिक कार्यासाठी दिला तर बिघडले कुठे?” असा सवाल अतुल करतात.

 

आजवर त्यांनी नाशिक त्र्यंब्यकेश्वर येथील वनवासी मुलांना मोफत शालेय पुस्तके दिली आहेत. तसेच नाशिकमधील ताई बामणे व अंजना ठमके यांच्या ऑलिम्पिकच्या तयारीलादेखील त्यांनी आर्थिक हातभार लावला होता. या दोन्ही खेळाडू मुलींना त्यांनी शर्यतीत धावण्यासाठी स्पोर्ट शूज दिले होते. २००८ साली नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळील गंगावाडी, रामवाडी येथील घरांचे, लोकवस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. तेथील लोकांचे संसार पुरात वाहून गेले होते. या पुरात त्या घरातील मुलांच्या शाळेच्या वह्या-पुस्तकांचेही नुकसान झाले. अतुल पवारांनी या विभागात वह्या-पुस्तके व शालेय साहित्याचे मोफत वाटप केलेविद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटण्यामागील मूळ कारण म्हणजे समाजात वाचनसंपदा वाढावी; असे मला वाटते. अवांतर वाचनामुळे माणसाला चार चांगल्या गोष्टींचे ज्ञान होते. वाचनाने मिळालेले ज्ञान हे कधीच व्यर्थ जात नाही. ते ज्ञान आपल्याला कुठेना कुठे उपयोगी येतेच. वाचनाने आजवर कित्येक व्यक्तिमत्वे घडवली आहेत. त्यामुळे जर वाचन दांडगे असेल, तर जगात आपले कुठेही अडू शकत नाही. असे मला वाटते. मी विद्यार्थांना मोफत पुस्तके देण्यामागील आणखी एक कारण म्हणजे आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असतात. चांगल्या वाचनामुळे ते समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. मी मोफत पुस्तके दिल्याने त्यांच्या शिक्षणाला माझा कुठेतरी हातभार लागेल, आज मी एका विद्यार्थ्याला शैक्षणिक पुस्तके पुरवली, तर उद्या त्यांनी घेतलेले शिक्षण मात्र त्यांच्या आयुष्याभरासाठीची सोय असेल. हा उद्देश त्यामागील आहे. व्यक्तिगत विकास साधायचा असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि समाजातील प्रत्येकाने जर व्यक्तिगत विकास साधला तर सामाजिक विकास आपोआपच साधता येतो,” असे अतुल सांगतात.

 

पुढे ते म्हणतात की, “खरंतर माझ्या आजीआजोबांकडून हा वारसा मला मिळाला आहे. त्यांचे हे कार्य मी पुढे चालवत आहे. माझ्या आजीआजोबांनी १९४७ साली हा पुस्तक व्यवसाय सुरू केला होता. तेदेखील गरजूंना सर्वतोपरी मदत करायचे. या गोष्टीचा अनुभव मला आला. मी व माझे कुटुंबीय एकदा नरसोबाच्या वाडीला जात होतो. तेव्हा रात्री रस्त्यात आमची गाडी पोलिसांनी अडवली. नाकाबंदी असल्यामुळे सर्व गाड्यांची चौकशी सुरू होती. आमचीदेखील चौकशी झाली. परंतु ओळखपत्रावरील माझे नाव पाहून नाशिकचे पीएसआय यांनी माझ्या व्यवसायाबद्दल मला विचारले. त्यानंतर आम्हा सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले; पण ते खरंतर आमचे आभार मानण्यासाठी! माझी आजी मालनबाई पवार यांनी त्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याला युपीएससी व एमपीएससीची पुस्तके मोफत दिली होती. त्याच पुस्तकांच्या जोरावर अभ्यास करून ते पीएसआय झाले होते, त्याबद्दल त्यांनी आमचे आभार मानले व त्यांच्या घरी पाहुणचारासाठीही बोलावले होते. या घटनेवरून माझ्या आजीचे कार्य माझ्या लक्षात आले. माझ्या आजीने अनेकजणांना शैक्षणिक मदत केल्याचे मी आजवर खूप ऐकले आहे. माझे आजीआजोबा हे मी करत असलेल्या या कार्यासाठी माझे प्रेरणास्थान आहेत. नाशिकजवळील आदिवासी पाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मी मोफत पुस्तके व शालेय साहित्य पुरवतो. नाशिकमधील अनाथाश्रमातदेखील पुस्तके पाठवतो. गेली अनेक वर्षे मी लोकसेवा म्हणून हे कार्य करत आहे. परंतु तरीदेखील मला कुठेतरी असे वाटते की, आपण एका हाताने दिलेले दान हे दुसऱ्या हातालादेखील कळू नये!”

 - साईली भाटकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/