मेरी कॉम आणि सरिता देवी यांचे पदक निश्चित
महा एमटीबी   14-Sep-2018
नवी दिल्ली: भारताकडून खेळणाऱ्या सरिता देवी व मेरी कोम यांनी पोलंडमधील सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये धडक मारून आपले पदक निश्चित केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेतही किमान कांस्यपदकापर्यंत मजल मारली आहे. सरिताने चेक प्रजासत्ताकच्या एलिना जेचीवर ५-० अशी मात केली. त्याआधी तिने पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या एझान खोजाबेकोवाला लोळवले. आता पुढे ६० किलो गटात सरिताला उपांत्य लढतीत कझाकिस्तानच्या करिना इब्रागिमोवाशी लढावे लागणार आहे.

 

जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद व ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवणाऱ्या मेरी कोमला ४८ किलो गटात थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. तंदुरुस्तीच्या कारणास्तव मेरी कोमला जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. इतर लढतींमध्ये काहींना पराभव पत्करावा लागला. भारताच्या रितू ग्रेवालने ५१ किलो गटात रशियाच्या स्वेतलाना रोसजावर ४-१ने विजय मिळवला. यांच्यासोबतच लोव्हलिना बोरगोहेनने ६९ किलो गटातून उपांत्य फेरी गाठली आहे.

 

८१ किलो वजनी गटामध्ये सीमा पुनिया हिचा पराभव झाला. तिला कझाकस्तानच्या लझ्झत कुन्गेबायेवाकडून ०-५ने हार पत्करावी लागली. तर ६४ किलो वजनी गटामध्ये प्विलाओ बसुमातरीलाही पोलंडच्या नतालिया बार्बुसिन्स्काने नमविले. ५७ किलो गटातील शशी चोप्रा हिला इंग्लंडच्या अँजिलिया चॅपमेनने पराभूत केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/