कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी चार अटकेत
महा एमटीबी   14-Sep-2018

 

 

पुणे : कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून जवळ जवळ ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने दोघांना औरंगाबाद आणि नांदेड येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून, दि. १८ सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
 

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याची घटना दि. ११ ऑगस्टला घडली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएममधून काढण्यात आली होती. दरम्यान, गुन्हे शाखेकडून शेख मोहम्मद अब्दुल जब्बार आणि महेश साहेबराव राठोड यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात यापूर्वी फहिम मेहफुज शेख आणि फहिम अझीम खान यांना अटक करण्यात आलेली होती, तर आणखी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींनी या प्रकरणाचा कट रचून, बँकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने वेगवेगळ्या भागांतील आरोपी कोल्हापूर येथे आले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी ९५ क्लोन एटीएम कार्डसचा वापर केला आहे. तसेच यापूर्वी अटक झालेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून जब्बार आणि राठोड यांना अटक करण्यात आली आहे. क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची छायाचित्रे तयार केली.

 
 

आरोपींनी बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बँकेचा डाटा कसा मिळविला, बँकेचे सर्व्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर क्राईम विभागाच्या गुन्हे शाखेने केली होती.

 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/