देव तारी त्याला कोण मारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 सध्या पश्चिमेतील साहित्य वर्तुळात पोलंडवरून जरा खळबळ माजली आहे, ती एका पुस्तकामुळे. खुद्द पोलंडमध्ये तर त्या पुस्तकावर बंदी घालून, लेखकावर बदनामीचा खटला दाखल करता येईल का, याबद्दल सरकारी वर्तुळात खल चालू आहे.
 

साधारणत: आपल्याला इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी हे युरोपीय देश आणि मग एकदम अमेरिका, यापलीकडे पश्चिमेत इतरही देश अस्तित्वात आहेत, याचा पत्ता नसतो. म्हणजे शाळेतील भूगोलात इतरही देशांबद्दल माहिती असते. पण, ती परीक्षार्थी माहिती आपण परीक्षेच्या कक्षातून बाहेर पडतापडताच विसरून जातो. पोलंड नावाचा देश अस्तित्वात असला किंवा नसला; आपला काय संबंध? राजकारण्यांच्या भानगडी, नट्यांची लग्नं, शेअर बाजार, दोन उद्योगपती भावांची आपसातील मारामारी वगैरे चविष्ट, खमंग विषय असताना बाकी फालतू गोष्टीत लक्ष घालायला वेळ आहे कुणाला? नाही का? सोव्हिएत साम्राज्याला सुरूंग लावणाऱ्या काही महत्त्वाच्या घटनांमधील एक म्हणजे, पोलंडचे कामगार नेते लेक वालेसा यांनी पोलंडच्या गडान्स्क बंदरात घडवून आणलेला गोदी कामगारांचा अभूतपूर्व संप. यासाठी लेक वालेसांनानंतर नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

 

सध्या पश्चिमेतील साहित्य वर्तुळात पोलंडवरून जरा खळबळ माजली आहे, ती एका पुस्तकामुळे. खुद्द पोलंडमध्ये तर त्या पुस्तकावर बंदी घालून, लेखकावर बदनामीचा खटला दाखल करता येईल का, याबद्दल सरकारी वर्तुळात खल चालू आहे. हिटलरच्या ‘ज्यू हत्याकांडात पोलिश नागरिकांनी होता येईल तितक्या ज्यूंना लपवून ठेवलं, वाचवलं. कित्येकदा हिटलरच्या ‘गेस्टापो’ या अत्यंत क्रूर गुप्त पोलीस दलाच्या हस्तकांकडून जबर अत्याचार सहन करूनही पोलिश नागरिकांनी असंख्य ज्यूंना वाचवलं, असा इतिहास आहे. पण, आपल्या पुस्तकात जॉन थॉमस ग्रॉस हा इतिहासकार म्हणतो की, हे असं नाही. पाश्चिमात्त्य समाजात ख्रिश्चन आणि ज्यू यांचे परस्पर संबंध हा नेहमीच तणावाचा आणि गुंतागुंतीचा विषय राहिलेला आहे. तो नीट समजून घेण्यासाठी आपण पोलंडची थोडी पार्श्वभूमी पाहू.

 

 
आधुनिक मानववंशशास्त्राने जगभरच्या मानवांचे विशिष्ट वांशिक गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यापैकी स्लाव्ह या वांशिक गटात रशियनांप्रमाणेच पोलिश किंवा पोल्स हेही येतात. प्राचीन काळी त्यांना ’पोलानी’ असं म्हटलं जातं असे आणि मध्य युरोपातील विश्चुला व ओडर या नद्यांच्या दुआबाच्या प्रदेशात त्यांची भूमी होती. त्याच्या पूर्वेला त्यांच्याचसारखे स्लाव्ह वंशाचे रशियन लोक होते, तर पश्चिमेला जर्मेनिक वंशाचे प्रशियन लोक होते. रशियन आणि प्रशियन हे दोघेही पोलानींपेक्षा दांडगे लोक असल्यामुळे त्यांची मोठीमोठी बलिष्ठ राज्ये होती. पोलानी मात्र छोट्या छोट्या टोळ्यांमध्ये विभागलेले होते.
 
 

त्यांच्यातील पहिला नाव घेण्यासारखा कर्तबगार इसम म्हणजे मायकेस्लाव पहिला या नावाने ओळखला जाणारा राजा. हा मुळात शेजारच्या प्रशियन राजाचा जहागिंरदार होता. त्याने बर्‍याच पोलानी टोळ्यांचे एकत्रीकरण केले. त्यानेच पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म स्वीकारला. इ. स. ९६२ ते ९९२ हा त्याचा काळ आहे. हा इतिहास वाचताना आपण हेही लक्षात ठेवायला हवं की, ही सगळी माहिती ख्रिश्चन इतिहासकारांनी लिहून ठेवलेली आहे. मायकेस्लाव पहिला हा नाव घेण्यासारखा पहिला पोलानी इसम, असं ते म्हणतात. कारण, त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हणून. त्याच्या अगोदरचे सगळे लोक म्हणजे यांच्या मते ’हीदन्स’ किंवा ’पेगन्स.’ या दोन शब्दांचा गोळाबेरीज अर्थ रानटी, जंगली, नीच देवदेवतांची, मूर्तीची पूजा, उपासना करणारे मागास लोक. आपल्याकडील काही अभ्यासकांच्या मते, भारतातूनच अनेक लोक नव्या भूमीच्या शोधात बाहेर पडले. आज ज्याप्रमाणे नवीन संधींच्या पाठी आपले लोक जगभरच्या देशांमध्ये जात आहेत, स्थायिक होत आहेत, त्याचप्रमाणे हजारो वर्षांपूर्वीही घडलं आणि हे एकदाच घडलं असं नव्हे, तर स्थलांतराची ही प्रक्रिया सतत चालूच होती. भारतातून बाहेर पडलेल्या लोकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर नवनवीन प्रदेश वसवले. जिथे मुळात स्थानिक लोक होते, त्यांच्या कत्तली न करता त्यांना आपल्या उदार संस्कृतीत सामावून घेतले. पण, महाभारत युद्धातील प्रचंड संहारांमुळे ही सगळी प्रक्रिया एकदम थांबली आणि भारताच्या बाह्यभूमीशी असणारा सततचा संपर्क तुटत गेला. परिणामी, बाह्य जगतातील लोक संस्कृतीच्या मूळ प्रवाहापासून लांब होत गेले. त्यामुळेच आक्रमक ख्रिश्चन धर्मोपदेशकांना त्यांच्या उपासनापद्धती हीन वाटल्या. किंबहुना, त्या पद्धती हीन ठरल्या. कारण, ख्रिश्चनांचं बलवान आक्रमण थोपवून धरण्याचं आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्यात उरलं नव्हतं. ते कसंही असो. मायकेस्लाव पहिला याने पोलानींच्या राष्ट्रीय अस्मितेचा पाया घातला. त्याचा वारसदार ‘बोलेस्लाव द ब्रेव्ह’ (इ. स. ९९२ ते १०२५) याने पोलंड हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर आणलं. यामुळे अर्थातच रशियन आणि प्रशियन दोघेही चिडले. त्यांनी सतत पोलंडवर आक्रमणं सुरू ठेवली; पण पोल्स लोकांनीही त्यांना धैर्याने तोंड दिलं.

 

 
 

परंतु, १२४०-४१मध्ये चंगेझखान हा मंगोल माथेफिरू एखाद्या धूमकेतूसारखा पोलंडवर येऊन आदळला. त्याच्या सैतानी झंझावातासमोर पोलंड कोलमडला. जीत राष्ट्राला कसं वागवायचं याची चंगेझची पद्धत ठरलेली होती. तरुण स्त्रियांना आपल्या सैनिकांमध्ये वाटून टाकायचं आणि उरलेल्या सर्व बाल-वृद्ध स्त्री-पुरुषांची सरळ कत्तल करायची. गाव असो अगर शहर त्यातील प्रत्येक वास्तू लुटून, पाडून, जाळून टाकायची. चंगेझच्या या अनर्थामुळे पोलंड जवळपास स्मशान बनला, पण साफ मेला मात्र नाही. पुढे १३०६ साली लॅडिस्लास पहिला या कर्तबगार राजाने पोलंडचे पुनरुज्जीवन केलं. रशिया आणि प्रशिया या दोघांशीही त्याच्या कटकटी मात्र सतत चालूच राहिल्या. अखेर १७७२ साली त्या दोघांनीही पोलंडचा पूर्ण पराभव करून त्याची भूमी आपसात वाटून घेतली. पोलंड हे नाव जगाच्या नकाशावरून पुसलं गेलं. आणखी एक शतक उलटून गेलं. जगावर स्वामित्व कोण गाजवणार, या प्रश्नावरून युरोपात महायुद्ध पेटलं. त्यात प्रथम प्रशियामधून निर्माण झालेल्या जर्मनीने रशियाला चीत केलं आणि मूळचा पोलंडचा प्रदेश आपल्याकडे खेचला. पण, अखेर जर्मनीचा पराभव झाला. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका या जेत्या राष्ट्रांनी पोलंडचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. १९१९ साली पोलंड पुन्हा अस्तित्वात आला.

 
 

पण, हे जर्मनी आणि रशिया दोघांनाही आवडलं नाही. जर्मनीत हिटलर आणि रशियात स्टॅलिन प्रबळ होताच, दोघांनीही पोलंडचे लचके तोडले. यातूनच पुढे दुसरं महायुद्ध उद्भवलं. जर्मनीचा पराभव झाल्यामुळे पोलंड त्याच्या तडाख्यातून सुटला, पण रशियाने त्याला आपल्या प्रभावळीत खेचला. पोलंड प्रत्यक्ष नव्हे, पण अप्रत्यक्षरित्या रशियाचा मांडलिकच होता. लेक वालेसांच्या बंडामागे एवढी प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे. शिवाय रशियन्स आणि पोल्स हे एकाच वंशाचे म्हणजे ‘स्लाव्ह’ असले तरी दोघांचे पंथ निराळे आहेत. रशियन हे आर्थोडॉक्स ख्रिश्चन आहेत, तर पोल्स हे रोमन कॅथलिक ख्रिश्चन आहेत. हे दोन्ही पंथ एकमेकाला पाण्यात पाहतात, पण ज्यूंबद्दल जास्त वैर रोमन कॅथलिकांना वाटतं. कारण, येशू ख्रिस्ताला क्रूसावर खिळे ठोकून मारण्यात जेरुसलेमच्या ज्यू धर्मगुरूंचा मोठा हात होता. ज्यू धर्मगुरूच्या अत्याग्रहामुळे जेरुसलेमचा रोमन सत्ताधीश पाँटियस पिलात याने येशूला वधाची शिक्षा फर्माविलीपुढे रोमन लोकांनी सर्वच ज्यू धर्मियांना पॅलेस्टाईनमधून हद्दपार केलं. हे ज्यू लोक जगभर, पण मुख्यत: युरोपात वेगवेगळ्या देशांत पसरले. नंतर खुद्द रोमन लोकांनीच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे तो युरोपात सर्वत्र पसरला. येशूच्या मृत्यूला ज्यू कारण झाले म्हणून या नवीन ख्रिश्चनांनी ज्यूंना वाईट वागवण्यास सुरुवात केली. हिटलर हा स्वत: कट्टर रोमन कॅथलिक पंथीय होता. अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ जॅन थॉमस ग्रॉस हा स्वत: मूळ पोल्स नागरिक आहे. ‘फिअर : एण्टी सेमेटिझम इन पोलंड’ या आपल्या पुस्तकात तो म्हणतो, “हिटलरच्या ज्यू विरोधी वरवंट्याविरुद्ध पोलिश लोकांनी ज्यूंना मदत करून वाचवलं, अशा जशा घटना आहेत, तशाच मदत न केल्याच्याही घटना आहेत. उदा. एका गावात पोलिश नागरिकांनी ४० ज्यूंना लपवून ठेवलं आणि मग स्वत:च त्या गोदामाला आग लावून त्याचं बिल जर्मन गेस्टापोच्या नावावर फाडलं किंवा जर्मनांच्या छळछावणीतून सुखरूप परतलेल्या काही ज्यूंना गावकर्‍यांनी गुपचूप ठार मारलं. का? तर त्यांच्या जमिनी यांनी लाटल्या होत्या; त्या त्यांना परत करायला लागतील म्हणून.” 

 
 

पोलंड सरकार पुस्तकावर बंदी घालण्याचा विचार करतंय, पण शहाण्या लोकांचं म्हणणं असं आहे की, बंदी घालण्यापेक्षा उलट यावर जंगी परिसंवाद घडवून आणावा. त्यातून असं उघडकीला येईल की, वरील घटनांसारख्या तुरळक घटना असतीलही, पण जास्त घटना अशाच आहेत की, ज्यात रोमन कॅथलिक पोलिश नागरिकांनी ज्यूंना वाचवण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे.

 
 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@