आवाज नको ‘डिजे’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |

 
 
 

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडले. आता पाच, सात आणि अकरा दिवसांचे विसर्जन सोहळेही येतील. यात डिजे वाजविण्यास न्यायालयाने तूर्त नकार दिला आहे. त्यामुळे डिजेचा आवाज वाढवणे मंडळांना महागात पडेल, अशी चिन्हं सध्या तरी आहेत. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने उत्सवाच्या काळात लाऊडस्पीकर पूर्णतः बंदी घातली आहे का, याबाबत शुक्रवारी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले. यावेळी न्यायालयाने म्हटल्यानुसार, सध्या तरी परवानगी दिलेली नाही, मात्र सरसकट बंदी कितपत योग्य आहे, असा सवालही राज्याला विचारला आहे. उत्सवकाळात होणारा गोंगाट दुर्लक्षित करणे चुकीचेच. मात्र, नियमांवर बोट ठेवत सरसकट कारवाई करणे किती योग्य आहे, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. ‘ऑडिओे एॅण्ड लायटिंग असोसिएशननेही त्यांच्या व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, तूर्त या सगळ्यात डिजेवर बंदी असल्याने गणेशमंडळांतील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. कार्यकर्त्यांकडूनही काही प्रश्न विचारले जात आहेत, ते म्हणजे हिंदूंच्या सणांदरम्यानच का असे निर्णय घेतले जातात. आम्ही आवाजाची मर्यादा पाळण्यास तयार असतानाही कारवाई का? मग दहीहंडीपासून ते अगदी दिवाळीत वाजवल्या जाणार्‍या फटाक्यांबाबतही आक्षेप घेतला जातो. त्याचे काय? गणेशोत्सवांदरम्यान आवाजाचे उल्लंघन होते, असे म्हणणार्‍यांनी नियमात बसवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? उत्सवादरम्यान परंपरा जपणार्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. उत्सवाला बदनाम करणार्‍यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात निघणार्‍या विसर्जन मिरवणुका, पर्यावरणपूरक मूर्ती, गणेशमंडळांकडून केली जाणारी मदत यांचीही दखल घ्यावी. पोलिसांनी नियम सर्वांनाच सारखे ठेवावेत, मग ते मशिदींच्या भोंग्यांना आणि मिरवणुकीच्या डिजेलाही... ३ डिसेंबरला नववर्षानिमित्त फोडल्या जाणार्या फटाक्यांनाही आणि दिवाळीला अभ्यंगस्नानानंतर पहाटे वाजवल्या जाणार्‍या फटाक्यांनाही. यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनीही काय करायचे हेही सणांवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी सांगावे. परंपरा जपणे, हे त्या त्या धर्माचे आद्य कर्तव्य आहे, पण नियमांवर बोट ठेवून सणांवरच प्रश्न उपस्थित करणे कितपत योग्य?

 

गणेश मंडळांना विम्याचेकवच

 

गणेशोत्सवात होणारी गर्दी पाहता सुरक्षेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. गर्दीत एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी दक्ष असायला हवे. त्यामुळे मंडळांनी हा भार विमा कंपन्यांवर टाकला आहे. एखादा अनुचित प्रकार घडून आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी मंडळांनी आता विम्याचा आधार घेतला आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेल्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे गौड सारस्वत ब्राह्मण मंडळाने (जीएसबी) तब्बल २६४.७५ कोटींचा विमा उतरवला आहे. मंडळाची गणेशमूर्ती ७० किलो सोने आणि ३५० किलो चांदीने मढवलेली असते. ६४ वर्षे जुन्या असलेल्या या मंडळांच्या आवारात तब्बल पाचशे सुरक्षारक्षक तैनात आहेत. ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. छोट्या गणेशमंडळांनीही याचे अनुकरण करण्यास हरकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर रकमेच्या विम्यापेक्षा सहज शक्य असणारी सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निरोधक यंत्रणा बसवण्यास यंदापासून श्रीगणेशा करण्यास काहीही हरकत नाही. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य केल्यास निम्मा भार हलका होऊ शकतो. ११ दिवस उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी बाप्पा आहे, अशी भाविकांची श्रद्धा असतेच. मात्र, मंडळांनी शक्य तितकी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. मंडळांमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तू, गणेशमूर्ती आदींमध्येच अर्ध्याहून अधिक खर्च झालेला असतो. एखादी दुर्घटना घडल्यास मंडळांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. मुंबई आणि प्रमुख शहरांमध्ये मिरवणूक आणि दर्शनाला होणारी गर्दी पाहता विमाही तितकाच आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी विमा कंपन्यांची उलाढाल ही तब्बल ८५० कोटींवर गेली आहे. मंडळांच्या विम्याचा हप्ता हा एक कोटींमागे अडीच लाख इतका आहे. मुंबईतील प्रमुख मंडळांनी विम्याचे कवच घेतले असून या उद्योगातील उलाढालही डोळे दिपवणारी आहे. हा झाला आर्थिक सुरक्षेचा मुद्दा, मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना हव्यात. गर्दीच्या ठिकाणी रुग्णवाहिका, प्रथमोपचार सेवा, गरजेनुसार डॉक्टर आदींकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईतील आगी लागण्याच्या घटना लक्षात घेता, अग्निशमन यंत्रणा तयार ठेवणे, ही जबाबदारीही मंडळांनी पार पाडायला हवी, यात दुमत नाही. निर्विघ्न उत्सव पार पडू दे, असे साकडे बाप्पाकडे घालताना मंडळांनी या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

- तेजस परब
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@