लढाई न होताच राजा जिंकला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018   
Total Views |




काँग्रेस पक्षाने १० सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आहेत, असे जर कुणी म्हटले तर तो विनोदच ठरेल. ‘बंद’ करण्यासाठी कार्यकर्ते लागतात, त्यांना रस्त्यावर उतरवावे लागते, त्यांच्याकडून घोषणा द्याव्या लागतात, थोडीबहुत दगडफेक करावी लागते, रेल्वे बंद पाडण्याचे नाटक करावे लागते, या कामासाठी भाड्याने माणसे मिळू शकतात. चित्रपटात गर्दीचा प्रसंग दाखवायचा असेल तर भाड्याने अशी माणसे आणावी लागतात. यावेळेला काँग्रेसची ही उणीव मनसेने भरून काढली.

 
 

निसर्गचक्रात पावसाळा सुरू होण्याअगोदर वातावरणात उष्णता खूप वाढते. दमट हवेच्या प्रदेशात घामाच्या धारा येऊ लागतात आणि उष्ण प्रदेशात उन्हाचे असह्य चटके बसायला लागतात. दोन्ही ठिकाणी जीव कासावीस होतो. राजकीय ऋतुचक्रात सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की, राजकीय उष्मा वाढायला लागतो. सत्तेवर बसलेला पक्ष आणि त्यांचे नेते कसे नालायक आहेत, हे विरोधी पक्षातील प्रत्येकजण त्याच्या-त्याच्या भाषेत सांगत असतो. शरद पवारांची भाषा अनेक अर्थांना जन्म देणारी असते. राज ठाकरेंची भाषा राजकीय नकलाकाराची असते. अशोक चव्हाण यांची भाषा कधी काळी सत्ता भोगलेल्या आणि आता सत्ताभ्रष्ट झालेल्या, पण मस्ती न उतरलेल्या मग्रूर नेत्याची असते. सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या उद्धव ठाकरेंची भाषा तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी नही’ या ‘आँधी’ चित्रपटाच्या गाण्याप्रमाणे असते. अशी भाषणे राजकीय वातावरणात आर्द्रता वाढवितात. त्यामुळे गरम फार व्हायला लागते. नंतर सुरू होतो, ‘बंद’चा सिलसिला. काँग्रेस पक्षाने १० सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली. काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्ते आहेत, असे जर कुणी म्हटले तर तो विनोदच ठरेल. ‘बंद’ करण्यासाठी कार्यकर्ते लागतात, त्यांना रस्त्यावर उतरवावे लागते, त्यांच्याकडून घोषणा द्याव्या लागतात, थोडीबहुत दगडफेक करावी लागते, रेल्वे बंद पाडण्याचे नाटक करावे लागते, या कामासाठी भाड्याने माणसे मिळू शकतात. चित्रपटात गर्दीचा प्रसंग दाखवायचा असेल तर भाड्याने अशी माणसे आणावी लागतात. यावेळेला काँग्रेसची ही उणीव मनसेने भरून काढली. ते ‘बंद’मध्ये उतरले आणि थोडीबहुत धमाल इकडे तिकडे केली. राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत मोदी आणि शाह यांना जितके झोडायचे आहे तितके झोडून घेतले. तेही खुश आणि काँग्रेसवालेदेखील खुश!

 

प्रश्न आहे जनतेचा, जनता मात्र प्रचंड नाखुश आहे. दुपारी मी रिक्षातून मुलुंड ते घोडबंदर रोड चाललो होतो. रिक्षावाल्याला विचारले,”रिक्षा तू कधी काढलीस?” तो म्हणाला,”आजच्या दिवसातील हे माझे पहिले भाडे आहे.” मी विचारले,”तू ‘बंद’मध्ये सामील नाही झालास?” तो म्हणाला,”मी कशासाठी होऊ?” नंतर त्याने जे मला सांगितले, त्याने मी आश्चर्यचकित झालो. तो म्हणाला,”दादा, पेट्रोल आणि डिझेल आपण विदेशातून आणतो. विदेशात त्याची दरवाढ होते. त्यामुळे भारतात दरवाढ होते. यात सरकारचा संबंध येतो कुठे? आपल्याकडे भाजीपाला नाशिकमधून येतो. नाशिकमध्ये भाजी कमी पिकली तर भाज्यांचे दर वाढतात. त्याच्यासाठी बंद करण्याचे काय कारण? पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांना दरवाढ करू देण्यासाठी जर ‘बंद’ झाला असता तर मी त्यात सामील झालो असतो.” त्याचा हा संवाद ऐकून मला बरे वाटले. रिक्षाचालक हा सामान्य माणूस, अर्थशास्त्राचे सिद्धांत फारसे न समजणारा, परंतु जगण्याचे अर्थशास्त्र मात्र उत्तम जाणणारा. ज्या कारणासाठी ‘बंद’ पुकारला, ते अर्थहीन कारण सामान्य रिक्षावाल्यालादेखील समजले. राज ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण आणि राहुल गांधी यांचे अर्थशास्त्र वेगळे आहे. त्यांचे अर्थशास्त्र सत्ताशास्त्राशी निगडित आहे. ‘बंद’ करून तेल उत्पादक देश तेलाच्या किमती कशा कमी करणार? ते म्हणतील, गेला तुमचा ‘बंद’ उडत, तुम्हाला तेल हवे असेल तर त्याची किंमत मोजा, नाहीतर घरी बसा. प्रश्न सत्ताशास्त्राचा असल्यामुळे ‘बंद’ तेलाच्या किमती कमी करण्यासाठी नव्हताच मुळी, तो होता मोदी सरकार अप्रिय करण्याचा एक डाव.

 

पुढल्या वर्षी निवडणुका आहेत. काहीही करून भाजपचा पराभव झाला पाहिजे, भाजपचा पराभव करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रिय केले पाहिजे, त्यांना अप्रिय करायचे असेल तर त्यांच्या विरोधात सतत बोलत राहिले पाहिजे, सतत आरोप करत राहिले पाहिजे, सतत हे शासन कसे अकार्यक्षम आहे, हे सांगत राहिले पाहिजे, महागाई कशी वाढत चालली आहे, हे सांगितले पाहिजे. आणखी दुसऱ्या काही गोष्टी सातत्याने सांगितल्या पाहिजेत. त्यातील पहिली गोष्ट मोदी सरकार पुन्हा आल्यास देशाचे संविधान गुंडाळून ठेवण्यात येईल. आता देशाचे संविधान म्हणजे गादी नव्हे, जी गुंडाळून ठेवता येईल. संविधान तर दिवसेंदिवस उत्तम बोलू लागले आहे, चालू लागले आहे, सचेतन झाले आहे, हे कसे काय? याचे उत्तरे हवे असल्यास संविधानावरील वर्षभरातील सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे वाचले पाहिजेत. दुसरी गोष्ट सांगितली जाते की, मोदी सरकार असहिष्णू सरकार आहे. विरोधी आवाज ते दाबून टाकतात. दुसऱ्या कुणाला बोलू देत नाहीत, पण जर आपण दूरचित्रवाणीवरील चर्चा ऐकल्या तर रत्नाकर महाजनपासून कुमार सप्तर्षी ते कुमार केतकर काय भन्नाट बोलत असतात, हे आपल्या लक्षात येईल. दूरचित्रवाणीवर त्यांच्या आवाजाला २५ हजार व्हॉल्टची ऊर्जा मिळते. मोदी सरकार असहिष्णू आहे, मग एवढी प्रचंड ऊर्जा येते कुठून? राहुल गांधींकडून तर नक्कीच नाही. दोन-एक वर्षांपूर्वी काही लेखक, साहित्यिक, कलाकार यांनी आपले पुरस्कार परत केले. ‘पुरस्कारवापसी’चा एक लघुगट तयार झाला. त्यांना पुरस्कार कधी मिळाले, हे सामान्य माणसाला कधी कळले नाही, पण त्यांच्या ‘वापसी’ची प्रसिद्धी खूप झाली. त्यातील अनेक नावे तर अशी आहेत की, या नावाचा कुणी कवी आहे, लेखक आहे, कलाकार आहे, याचीदेखील माहिती ‘पुरस्कारवापसी’नंतरच झाली. जनमानसावर या ‘वापसीकरां’चा एवढा प्रभाव असल्यामुळे समाजात त्याच्या प्रतिक्रिया काहीच उमटलेल्या नाहीत. याच काळात वादग्रस्त चित्रपट सेन्सॉरकडून प्रमाणित होत गेले. वादग्रस्त पुस्तके प्रकाशित होत गेली. शासनाकडून कुणावरही कसलीही बंदी आली नाही. हा डावही फुसका ठरल्यामुळे आता संख्याशास्त्राचा आधार घेऊन गणितांची मांडणी सुरू झाली. भाजपला २०१४च्या निवडणुकीत फक्त ३१ टक्के मते मिळाली. ६९ टक्के मते अन्य पक्षांना मिळाली. ही मते जर भाजपविरोधात एकत्र केली तर भाजपचा पराभव ठरलेला आहे. ऐकायला खूप गोड वाक्य आहे. हे संख्याशास्त्रीय गणित जर असे मांडले की, मध्यपूर्वेतील सगळे मुस्लीम देश एक झाले आणि त्यांनी एकराज्य निर्माण केले तर ते जगावर राज्य करतील. सगळे मंगोल वंशाचे लोक एकत्र झाले, त्यांनी एकराज्य केले, तर तेदेखील जगावर राज्य करतील. जगातील धनवान लोकांची संपत्ती त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिचे समान वाटप केले तर जगात औषधालादेखील गरीब माणूस सापडणार नाही, संख्याशास्त्र असे अजब असते. याचा आधार घेऊन कुणालाही मूर्ख करता येऊ शकते, फक्त राजकीय नेते त्याला अपवाद असतात. ते त्याच्याही पलीकडे पोहोचलेले असतात.

 

ममता बॅनर्जींनी सगळ्या मतांच्या एकत्रीकरणाचा उपद्व्याप सुरू केलेला आहे. त्याला नाव दिले फेडरल फ्रंट’ अर्थात ‘संघीय आघाडी.’ या आघाडीत तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेस, डावे कम्युनिस्ट, डीएमके आदी प्रादेशिक पक्षांना सामावून घेण्याचा विषय आहे. त्यांचा नेता कोण? त्यांची विचारधारा कोणती? त्यांचा कार्यक्रम कोणता? जागांचे वाटप कसे करणार? समजा, निवडणुकीत यश मिळाले तर पंतप्रधान कोण होणार? संख्याशास्त्रात याची उत्तरे नाहीत. ममतांचा हा सगळा प्रताप बघून एक कथा आठवली. यापूर्वी ही कथा कुठल्या तरी एका लेखात मी लिहिलेली आहे, तरीसुद्धा पुन्हा तिची आठवण म्हणून लिहितो. एका जंगलात प्राण्यांची सभा भरते. सगळेजण मनुष्याविषयी तक्रार करू लागतात. आपले संख्याबळ एवढे आहे. जर आपण एक झालो आणि बाजूच्या राज्यावर हल्ला केला तर आपण सर्वांना पराभूतही करू आणि मारूनही टाकू. सगळ्यांना ती कल्पना पटते. मग असे ठरते की, मनुष्याच्या राजाकडे अगोदर एक दूत पाठवावा आणि त्याला शरण यायला सांगावे. तो शरण आला नाही तर आपण सगळ्यांनी त्याच्यावर हल्ला करावा. ठरल्याप्रमाणे प्राण्यांचा दूत जातो. राजाला संदेश दिला जातो. असे यापूर्वी कधी न घडल्यामुळे राजा चिंतीत होतो. तो मंत्रिमंडळाची बैठक बोलावतो. प्राण्यांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवतो. पंतप्रधान सांगतो, ‘‘महाराज, तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी बघून घेतो, काय करायचे ते!” पंतप्रधान प्राण्यांकडे निरोप पाठवतो की, “तुमच्या धमकीला आम्ही घाबरत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा.” नंतर सगळे प्राणी गोळा होतात आणि ते राज्यावर हल्ला करण्यासाठी चालू लागतात. सर्वानुमते सिंहाला, हत्तीवर बसविण्यात येते. सगळे सैन्य राज्याच्या सीमेवर येते. राजाचे सैन्य त्यांच्या छावणीतच असते, ते सीमेवर येत नाही. एकटा पंतप्रधान येतो. तो कोल्ह्याला विचारतो,”तुमचा राजा कोण आहे?” तो म्हणतो, “हत्तीवर बसलेला सिंह आहे.” “मग तो तुम्हाला आज्ञा का देत नाही?” कोल्हा तसे सिंहाला सांगतो. सिंह जोराने आरोळी ठोकतो. सिंहाची आरोळी ती, ती ऐकली की पळायचे, एवढे प्राण्यांना माहीत असते. त्यामुळे वाट फुटेल तेथे सगळे सैन्य पळू लागले. लढाई न होताच, राजा (मनुष्याचा) लढाई जिंकला. ममतांच्या सैन्याचा सेनापती कोण आणि त्याने आरोळी ठोकली तर सैन्य रणांगणात उभे राहील की पळायला लागेल? हे आपल्याला २०१९च्या रणांगणात दिसेल. तोपर्यंत राज ठाकरे यांची राजकीय नुक्कडबाजी आणि राहुल गांधी यांची जोकरशाही याची मजा घ्यायला काय हरकत आहे!

@@AUTHORINFO_V1@@