श्रीलंकेतील हिंदू मंदिरांमध्ये पशुहत्येवर बंदी
महा एमटीबी   14-Sep-2018


 


कोलंबो: श्रीलंकेतील हिंदू मंदिरामध्ये पशुहत्येवर बंदी येण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील मंत्रिमंडळाने बुधवारी या संदर्भातील ठरावाला मंजुरी दिली. या ठरावात पुजेच्या प्राचीन पद्धतींवर बंदी घालण्यासाठी कायदा बनविण्याचा उल्लेख आहे. देशातील हिंदू समुदायाने या प्रथेला फौजदारी गुन्हा ठरवावा, असा प्रस्ताव मांडला होता. पुनर्वसन, उत्तर विकास तसेच हिंदू धार्मिक विषयांचे मंत्री डी. एम. स्वामीनाथन यांनी या संदर्भातील विषय मंत्रिमंडळात मांडला होता. त्याला अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 

या प्रस्तावित कायद्यानुसार हिंदू मंदिरांमध्ये शेळ्या, पक्षी आणि प्राण्यांच्या हत्येला मनाई करण्यात येईल, असे हिंदू सांस्कृतिक विषयांच्या संचालक उमा महेश्वरन यांनी एका सरकारी वृत्तपत्राला ही माहिती दिली. मंत्रिमंडळाने मंजूर केलेला कायद्याचा मसुदा अंतिम मंजुरीसाठी कायदा विभागाकडे पाठविला जाईल. त्यानंतर तो अॅटार्नी जनरल खात्याकडे पाठविण्यात येईल आणि संसदेची मान्यता मिळाल्यानंतर हा कायदा लागू होईल, असे त्यांनी सांगितले. ऑल सिलोन हिंदू महासभा या संस्थेने नरसिम्मर मंदिरातील उत्सवादरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये प्राणीहिंसा होऊ नये, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी जाफना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. इळंचेळियन यांनी पशुहत्येवर बंदी घातली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/