पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतेत!
महा एमटीबी   12-Sep-2018मुंबई : राज्यात दमदार सुरुवात करणाऱ्या मान्सूनने आपल्या अखेरच्या टप्प्यात राज्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या २५ दिवसांपासून राज्यात पाऊस नसल्याने बळीराजा चिंतेत आला असून राज्यातील १० जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शेतात उभी असलेली पिके माना टाकू लागल्याने बळीराज्याचे डोळे आता मान्सूनच्या परतीकडे लागले आहेत. मात्र सध्याचे वातावरण परतीच्या मान्सूनसाठी योग्य नसल्याचे सांगितले जात आहे.

 

सध्या मान्सूनच्या हालचाली मंदावलेल्या असल्या तरी, राज्यात येत्या १५ सप्टेंबरनंतर पावसास अनुकूल वातावरण तयार होऊन १७ तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यात मुक्कामी राहणार असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने राज्यात तापमान वाढले असून सप्टेंबरमध्येच 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे. एकीकडे पावसाची पडलेली तूट आणि वाढलेले तापमान यामुळे मात्र शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/