भारतीयांची मने जाणणारा उद्यमी
महा एमटीबी   12-Sep-2018


 

 

इंग्रजीचा अट्टाहास सोडून भारतीय भाषांमध्ये ग्राहकांना सेवा देणार्‍या ‘शेअर चॅट’ या संकेतस्थळाचे निर्माते अंकुश सचदेवा यांनी देशातील तरुणांना नेमके काय हवे आहे, हे जाणले आणि स्वतःच्या उद्योगाचा पायाही भक्कम केला.
 
समाजमाध्यमांवर इंग्रजीपेक्षा आपल्या भाषेतली एखादी भन्नाट पोस्ट दिसली की आपण आपसूकच तिला लाईक करतो. कारण, मातृभाषेतील मजकूर हा साहजिकच अधिक आपलासा वाटायला लागतो. मानवशास्त्रातील नेमके हेच तत्त्व व्यवसायात वापरून समाजमाध्यमांमध्ये आघाडीचे संकेतस्थळ तयार करणारे अंकुश सचदेवा हे इंग्रजीला तितकेसे महत्त्व देत नाही. त्यांच्या मते, “व्यवहारापुरता इंग्रजी भाषेचा वापर योग्य असला तरी आपल्या माणसांशी बोलताना मात्र मातृभाषेतच संवाद साधायला हवा. मग माध्यम कोणतेही असो.” सचदेवा आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी मिळून २०१५ मध्ये ‘शेअर चॅट’ या संकेतस्थळाची संकल्पना मांडली होती. सणासुदीला मोठ्या प्रमाणावर शेअर होणारे भारतीय भाषांमधील संदेश किंवा व्हॉट्सअपवर ठेवले जाणार्‍या स्टेटसवर बर्‍याचदा ‘शेअर चॅट’ या कंपनीचे बोधचिन्ह दिसते. भारतीय भाषांच्या संकल्पनेवर आधारीत हे अॅप अल्पावधीतच लोकप्रिय झाले ते सचदेवा यांच्या विचारपद्धतीमुळे. भानू प्रताप सिंह, फरीद अहसाना हे त्यांचे आयआयटी कानपूरमधले मित्र. अगदी शिक्षण घेतानाच नवनवीन उद्योजकीय संकल्पनांमध्ये हे मित्र रमू लागले आणि त्यातूनच ‘शेअर चॅट’ने आकार घेतला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मात्र, सचदेवा अपयशाच्या एक-दोन नव्हे, तर तब्बल चौदा पायर्‍या चढले. सुचदेव, भानू प्रताप आणि फरीद यांना सहा वर्षांपूर्वी भेटले होते. तेव्हापासून त्यांची काहीतरी उद्योग करण्याची धडपड सुरू होती. या दरम्यान एकूण नव्या संकल्पनांवर त्यांनी काम केले. त्यात ते ५ वेळा अपयशी ठरले. मात्र, तीन संकल्पना यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या ‘शेअर चॅट’ या कंपनीचा डोलारा उभा राहिला. त्या काळात भारतीय भाषांमध्ये व्यक्त होण्यासाठी तितकासा वाव नव्हता. एका सर्व्हेक्षणात सुमारे ३२ हजार नेटकरींनी त्यांना भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्याबाबतची उत्सुकता दर्शवली. भारतीय भाषेत संवाद साधता यावा, मित्रांशी गप्पा मारता याव्यात, सणासुदीच्या दिवसाला आपल्या भाषेत शुभेच्छा देता याव्यात, ही त्यावेळची गरज होती. नेमक्या याच संधीचा फायदा घेत सुचदेव यांनी ‘शेअर चॅटची निर्मिती केली आणि अल्पावधीतच त्यांना भरपूर प्रतिसादही मिळाला.
 
 
‘फोर्ब्स इंडिया’च्या ३० वर्षांखालील उल्लेखनीय उद्योजकांच्या यादीत या तिघांचाही समावेश झाला. सुचदेव यांच्या मते, “तुमचा मजकूर जर इंग्रजीत असेल, तर तो तितकासा तळागाळात पोहोचत नाही. आम्ही व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांच्या मानसिकतेचा यातून अभ्यास केला. त्याचा मोठा फायदा ‘शेअर चॅट’च्या व्यावसायिक संकल्पनेवर होत गेला. अजूनही माणसं बोलीभाषा स्वीकारतात. उद्योग करताना तुम्ही ‘इंडिया’ या संकल्पनेऐवजी ’भारत‘ या संकल्पनेचा विचार करावा,” असा मोलाचा सल्लाही ते भावी स्टार्टअप्सना देतात. त्यांच्या यशाचे श्रेय ते संपूर्ण टीमला देताना म्हणतात की, “यशस्वी पुरुषामागे ज्याप्रमाणे स्त्री असते. तसे एका यशस्वी उद्योग समूहामागे त्यांचे कर्मचारी असतात.” तसेच “लोकांना रोज नवे विषय हवे असतात. त्यासाठी ते भुकेलेले असतात. त्यामुळे या क्षेत्रात भरपूर वाव आहे,” असे ते सांगतात.
 
 

देशात सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीबाबत ते फार सकारात्मक आहे. देश एका नव्या पर्वाकडे चालला आहे. स्वस्त झालेली इंटरनेट सेवा हे नव्या उद्योगांसाठी संधी असल्याचे ते सांगतात. उद्योग आणि व्यवसायाबद्दल बोलताना ते फार सकारात्मक असतात. भारतीय भाषांमध्ये सुरू असलेल्या ‘शेअर चॅट’चे सध्या ४० लाखांहून अधिक जास्त वापरकर्ते आहेत. दिवसभरात या अपवर दोन लाखांहूंन अधिक पोस्ट शेअर केल्या जातात. बांगलादेश, कॅनडा, दुबई आदी देशांतही त्यांचे अॅप वापरले जाते. विशेष म्हणजे, या ठिकाणीही भारतीय भाषांमध्येच पोस्ट शेअर केल्या जातात. सध्या मराठी, तामिळ, तेलुगू, गुजराती, राजस्थानी, मल्याळम, पंजाबी आदी भाषांमध्ये या अॅपवरील ‘चॅट’ उपलब्ध आहे.

 
सचदेवा यांच्या संकल्पनेवर विश्वास ठेवत ‘शुन वेई कॅपिटल’ आणि ‘शाओमी सिंगापूर’ या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. भारतातील ग्राहकांबद्दल बोलताना सचदेवा सांगतात की, “देशातील ग्राहकांना त्यांच्या भाषेबाबत अजूनही आपलेपणा आहे. हिंदी आणि स्थानिक भाषांना नाकारणार्‍यांनी आमच्या उद्योगवेलीकडे पाहावे. २० मध्ये केवळ चार कोटींची उलाढाल करणार्या एका छोट्याशा स्टार्टअपने दोन वर्षांत २३ कोटींचा पल्ला गाठला आहे.” ते पुढे म्हणतात की, “स्वत:च्याच आयुष्यात मग्न राहण्यापेक्षा लोकांच्या समस्यांकडे पाहा. त्या सोडवता येणे तर दूरचा भाग, पण त्या समजून घेण्याचा प्रयत्न तर करा. कदाचित तुम्ही काहीतरी नवे शिकाल, त्यातूनच एखाद्या उद्योगाची संकल्पना उभी राहील,” अशी दृष्टी ते कित्येक नवउद्योजकांना देतात. ‘खेड्याकडे चला’ असे आवाहन महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतर केले होते. आजही खेड्याकडील अनेक भागांत व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. तेथील ग्राहकांना अद्याप अद्यावत सोयीसुविधांचा अभाव आहे. नेमके हेच तंत्र सचदेवा यांनी वापरले. त्यांचा ग्राहकवर्ग हा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील आहे. उद्योग करताना धाडसी निर्णय घेणे, आवश्यक होते. इंग्रजी भाषेला आव्हान देत त्यांनी त्यांच्या अॅपमधील इंग्रजी आशयच काढून टाकला आहे.    
                                                                                         - तेजस परब

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/