गणेश मूर्ती आणतानाची तयारी
महा एमटीबी   12-Sep-2018


 

गणेश पुजेसाठी तयारी करताना तांब्या पितळेची भांडी वापरावीत. पूजेची सर्व भांडी स्वच्छ धुवून पूसून घ्यावीत. आदल्या दिवशीच घराची साफसफाई करून घ्यावी. त्यामुळे पूजेच्यावेळी वातावरण प्रसन्न राहते. पूजेच्या वस्तूंची यादी करून सोबत ठेवाव्यात. मूर्ती आणताना एका कपड्याने झाकून आणावी. गणपती आणताना सवाष्णीने मूर्ती आणि मूर्ती आणणाऱ्याच्या कपाळी हळदी-कुंकू वाहावे. गणपती आणणाऱ्याच्या पायावर पाणी वाहावे. त्यानंतर औक्षण करून मूर्ती एका पाटावर तांदूळ पसरून ठेवावी. तांदूळ पसरल्यावर त्यावर स्वस्तिक काढावे. गणेश मूर्तीचे मुख हे शक्य असल्यास पश्चिमेला असू द्यावे.
 

मूर्ती ठेवताना काय काळजी घ्यावी : गणेश मूर्ती बसवताना पूर्व पश्चिम असू द्यावी. गणेश मूर्तीचे मुख पश्चिमेला असल्यास उर्जेचा प्रवाह सकारात्मक राहतो, अशी श्रद्धा आहे. गणेशोत्सवात सजावट करतांना कोणत्याही चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत. उदा. पट्टा, जोडे, चामडी पिशव्या इत्यादी. ज्या गणेशमूर्तीची सोंड डाव्या बाजूस असेल अशीच मूर्ती घ्यावी.

 

गणेश पूजेचा मुहूर्त श्रीगणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या मृण्मय मूर्तीची स्थापना करून पूजन केले जाते. भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नसतो. त्यामुळे प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत (अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते. तरीसुद्धा गुरुवारी ज्यावेळी नवग्रहांपैकी शुभ ग्रह गुरु, शुक्र, बुध व चंद्राचा जास्त शुभप्रभाव वातावरण असेल ती वेळ ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली निवडल्यास फायदेशीर ठरेल. तरीसुद्धा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना वरील वेळेव्यतिरिक्त सायंकाळी ६.३० पर्यंत केली तरी चालेल. गुरुवारी राहू काल दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत आहे. सकाळी स्थापना व पूजनाच्या वेळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. रोज रात्री तेलाचा दिवा देवस्थळाच्या आग्नेय दिशेस लावावा. नैवेद्याचे ताट वाढल्यावर तूप वाढून तुळशीची पाने पदार्थांवर ठेवावीत. देवासमोर पाण्याने एक चौकोनी मंडळ काढावे, त्यावर पाट आणि पाटावर नैवेद्य ठेवावा. डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन ते प्रसादाभोवती प्रदशिक्षणाकार तीनदा फिरवावे. नंतर एक पळी पाणी ताह्मणात सोडावे. नंतर हा प्रसाद पाच वायूंना अर्पण करावा. यासाठी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाथ स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणावे. यामुळे शरीरातील पाच वायू ब्रह्मात विलीन होतात. नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन करावे.

   - तेजस परब