समर्थांचे गणेशस्तवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2018
Total Views |


 

 

गणेशस्तवनात रामदासांनी गणेशाला सर्वसिद्धीफलदायक, अज्ञानभ्रांतिच्छेदक व बोधरुप म्हटले आहे. कुठल्याही साहित्यकृतीची सुरुवात करताना गणेश, शारदा यांना वंदन करण्याची पूर्वापार परंपरा आहे. ती रामदासांनी पाळली. दासबोध ग्रंथ लेखनास सुरुवात करताना त्यांनी प्रथम गणेशाला वंदन केले आहे.
 

समर्थ रामदासस्वामींचा काळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा असला तरी त्यांनी दिलेली चारित्र्यसंवर्धनाची, हिंदू संस्कृतीच्या रक्षणाची शिकवण आजही तितकीच मोलाची आहे. रामदासस्वामींनी रूढ परंपरा न डावलता त्या शिकवणीला कालमानानुसार नवा आशय दिला. प्रत्येकवेळी धार्मिक पातळीवर हिंदू समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. निरपेक्ष वृत्तीने चारित्र्याची शिकवण देऊन संस्कृतीरक्षणासाठी, देशप्रेमासाठी समाज एकत्र आणणे हे तितकेसे सोपे काम नाही. पण, शिवकाळात रामदासांनी ते केले. देवाच्या भक्तिप्रेमाबरोबर देशप्रेमाची अखंड पेटणारी ज्योत त्यांनी लावली. त्याच्याच उजेडात पुढे लोकमान्य टिळक, सावरकर वगैरे प्रभृतींनी आपले दिव्य कार्य समाजापुढे ठेवले. ती परंपरा अशीच पुढे चालत राहणार आहे. रामदासस्वामींनी सभोवताली प्रचंड विरोधी वातावरण असताना इ. स. १६४५ साली मसूरला पहिला रामजन्मोत्सव साजरा करून हिंदुत्वाच्या पातळीवर हिंदू समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘राम’ हा त्यांचा आदर्श होता. त्यांच्या मते, रामाची व हनुमानाची उपासना त्यांच्या काळाला अनुसरून होती. तोच वारसा लोकमान्य टिळकांनी चालवून घराघरात होणार्‍या गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले. त्या निमित्ताने धार्मिक पातळीवर समाज एकत्र बांधण्याचा प्रयत्न टिळकांनी केला. परकीय सत्तेला तोंड देण्याचे धारिष्ट्य त्यातून त्यांना निर्माण करायचे होते. आपला समाज एकत्र आणून राजकीय प्रेरणा वृद्धिंगत करण्यासाठी लो. टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौजन्याबद्दल, शौर्याबद्दल, राजकारणाबद्दल महाराष्ट्रात अतीव आदराची भावना आहे. शिवराय हे आदर्श हिंदवी राज्याचे निर्माता होते.

 

रामदासस्वामींनी कुठेही परंपरांना डावलले नाही. ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. तेथे त्यांना राम दिसू लागला. ‘येथे का रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥’ असे ते त्यावेळी म्हणाले. आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम आदी संतांनी धार्मिक पातळीवर वैष्णवांचा मेळावा उभा केला होता. महाराष्ट्रात गणेशपूजाही महत्त्वाची मानली गेली आहे.

 

समर्थांना दासबोध ग्रंथ रचनेस एकांत पाहिजे होता म्हणून समर्थ शिवथर घळीला आले. त्यांच्याबरोबर कल्याणस्वामी, अनंत कवी आणि आक्का ही शिष्यमंडळी होती. तेथील सृष्टिसौंदर्य अप्रतिम व स्फूर्तिदायक आहे. समर्थांनी शिवथर घळीला ‘सुंदरमठ’ असे नाव दिले. तिथे समर्थांनी दोन पुरुष उंच अशी भव्य गणेशमूर्ती स्थापन केली. गिरिधर स्वामींनी त्यांच्या ‘समर्थ प्रताप’ या ग्रंथात तसा उल्लेख केला आहे.

 

समर्थे सुंदरमठीं गणपति केला ।

दोनी पुरुष सिंधुरवर्ण अर्चिला ॥

 

दासबोधात पहिले दशक, समास दोनमध्ये गणेशस्तवन करताना समर्थांच्या समोर शिवथर घळीतील ही गणेशमूर्ती असावी, असे अभ्यासकांचे मत आहे.

 

भव्यरुप वितंड भीममूर्ति महाप्रचंड

विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला

(दास. ..)

 

समर्थस्थापित हा भव्य गणपती आता तिथे नाही. गणेशस्तवनात रामदासांनी गणेशाला सर्वसिद्धीफलदायक, अज्ञानभ्रांतिच्छेदक व बोधरुप म्हटले आहे. कुठल्याही साहित्यकृतीची सुरुवात करताना गणेश, शारदा यांना वंदन करण्याची पूर्वापार परंपरा आहे. ती रामदासांनी पाळली. दासबोध ग्रंथ लेखनास सुरुवात करताना त्यांनी प्रथम गणेशाला वंदन केले आहे. या गणेशस्तवनात स्वामी म्हणतात, “गणेशाने माझ्या अंतरी भरून वास्तव्य करावे व माझ्यासारख्या वाक्शून्यास बोलते करावे. हे गणेशा, तुझ्या कृपेने सर्व विघ्ने नाहीशी होतात. तू विघ्नहर आहेस. आम्हा अनाथांचे तू माहेर आहेस.” गणेशाच्या सगुण रुपाचे लावण्य त्यांनी सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.

 

रत्नखचित मुकुटीं झळाळ ।

नाना सुरंग फांकती कीळ ।

कुंडले तळपती नीळ ।

वरी जडले झमकती ॥

रुणझुणा वाजती नेपुरें ।

बांकी बोभाटती गजरें ।

घागरियासहित मनोहरें । पाऊलें दोनी ॥

 

यातील भाषेचा फुलोरा पाहिला, तर ज्ञानेश्वरांची आठवण यावी, इतके हे गणेशस्तवन स्वामींनी रसाळ भाषेत लिहिले आहे. स्वामी पुढे म्हणतात की, “गणपती नाचू लागला की देव तल्लीन होतात. ते नुसते पाहत राहतात. गजाननाचे रुप भव्य, धिप्पाड असे आहे. तो प्रचंड शक्तिमान आहे. त्याच्या ठिकाणी चौदा विद्या वास करतात. त्याचे डोळे बारीक असून कान लांबसर आहेत. कान हलवताना फड् फड् आवाज येतो.”

 

चौदा विद्यांचा गोसावी ।

हरस्व लोचन हिलावी ।

लवलवित फडकावी ।

फडै फडै कर्णथापा ॥

 

गजाननाचे पोट मोठे असून कमरेच्या साखळीची घुंगरे मंद आवाजात झणत्कार करतात. त्याला चार हात आहेत. एका हातात परशू, दुसर्‍या हातात कमळ, तिसर्‍या हातात तेजस्वी टोकदार अंकुश आणि चौथ्या हातात त्यांना अतीव प्रिय असलेला गोल मोदक आहे. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे शोभा येते. ब्रह्मादी देव त्याला नमस्कार करतात. त्याच्यापुढे माणसाला काय किंमत? ज्यांना बुद्धी कमी त्यांनीही गणेशाची उपासना करावी.

 
 

जयासि ब्रह्मादिक वंदिती ।

तेथे मानव बापुडे किती ।

असो प्राणी मंदमती ।

तेहि गणेश चिंतावा ॥

 

त्याकाळी धर्माविषयी जी अवहेलना चालली होती, त्या विषयाला समर्थांनी शेवटच्या भागात स्पर्श केला आहे. आपले लोक गजाननाच्या कृपेने हिंदू संस्कृती रक्षणार्थ पुढे यावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

जे मूर्ख अवलक्षण ।

जे का हीणाहूनि हीण ।

तेचि होती दक्ष प्रवीण । सर्व विषई ॥

 

ही हिंदू अवलक्षणी मूर्ख माणसे त्याकाळी मुसलमानांचे उरुस साजरे करीत होती. पीराला नैवेद्य करीत होती. ती माणसे गजाननाच्या उपासनेने दक्ष प्रवीण होतील असे समर्थांना वाटते. शेवटी समर्थांनी ‘कलौ चंडिविनायकौ’ असे सांगितले आहे. त्याचा अर्थ या कलियुगात देवी आणि गणपती यांची उपासना फलदायी ठरते, असा आहे. ते काळाशी सुसंगत वाटते.

- सुरेश जाखडी 
                                                                                                                                                  [email protected]
 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@