मंगलाचा छंद । तोडी भवबंध ।
महा एमटीबी   12-Sep-2018

  

 
 
 
बुद्धी प्रदान करणारा श्रीगणेश हा प्रज्ञा, मेधा, ऋतंभरामध्ये वास करतो. संकटांमधून सोडवणारा गणेश भक्तीमध्ये वास करतो. शुभ्र हिमालयाच्या पर्वतराशींत माता पार्वती आणि पिता शंकर यांच्या समवेत वास्तव्य करतो. गणपती भक्तांच्या देवघरातून अंगणात आला. आता तर तो थेट मैदानावर येऊन बसला.
 

प्रत्येक ऋतू, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस हा काहीतरी संदेश घेऊन येतो. कधी गुजगोष्टी करतो, तर कधी हितगुज करतो. प्रत्येकाचं वैशिष्ट्य अनुभवाला येतं. त्यांच्याशी संवाद साधताना खूप काही जीवन ओंजळीत येतं. भाद्रपद महिना आणि गणपतीचेदिवस यांचं खास नात आहे. भरपूर बरसलेलापाऊस, मेघांचं अंबर आणि उमलून येणारं गजाननाशी नातं... निसर्गामधून गणेशाचं अस्तित्व अधिक जाणवतं. ऋतुंमधून गीत गातं नात्यात गोडवा आणतं. दशदिशा गणरायाच्या स्वागतासाठी सिद्ध झालेल्या असतात. अंबर आणि अवनी गणेशाचं स्वागतगीतगाऊन तानावर ताना घेण्यात तल्लीन झालेल्या असतात. अवघ्या सृष्टीला आनंदाचे अमाप उधाण आलेलं असतं. मूळात निर्गुण असणारा गणपती हा भक्तांसाठी सगुण साकार होतो. भक्तांना पूजन करण्यास, स्तवन करण्यास सगुण गणेश सुलभता आणतो. मूळ चैतन्यधन असणारा मनोहारी रुप घेऊन येतो. निर्गुणाची भक्ती कठीण म्हणून तो आकार धारण करतो. भक्ती करताना मूर्ती समोर असली की, अधिक आनंद लाभतो. भरजरी वस्त्र, अलंकार घालताना, नानाविधं गंधांच्या, लाल रंगाच्या पुष्पमाला गुंफून गणपतीला घालण्यात भक्त रंगून जातात. गणेशभक्तीचा रंग गहिरा होत जातो. हिरव्यागार दूर्वांचा हार थंडावा, शीतलता देतो. रोजच्या जगण्यातील त्रासांचा झालेला दाह शमविण्याची शक्ती दूर्वांमध्ये असते. षडरिपू जोर करून जीवन असह्य करताना, त्यावरील उतारा म्हणजे गणरायाचं मनोभावे पूजन!

 

गणेशाचं वास्तव्य विविध ठिकाणी असतं. सृष्टीमध्ये भरून उरलेला श्रीगणेश! निसर्गाच्या भावछटांमध्ये प्रकट होणाराश्रीगणेश! प्रत्येकाच्या मनात वसणारा श्रीगणेश! समाजमनात ठसलेला श्रीगणेश! असा ठायीठायी वास्तव्य करून राहणारा गणपतीमोठा लोभसवाणा आहे. श्रृतींमधील प्रतिभाप्रधानतेत, तर स्मृतींमध्ये प्रज्ञाप्रधानतेत गणेश गवसतो. पुराणांमधील विविध कथांमधून त्याचा अस्तित्वाचं महत्त्व अधोरेखित केलेलं असतं. बुद्धी प्रदान करणारा श्रीगणेश हा प्रज्ञा, मेधा, ऋतंभरामध्ये वास करतो. संकटांमधून सोडवणारा गणेश भक्तीमध्ये वास करतो. शुभ्र हिमालयाच्या पर्वतराशींत माता पार्वती आणि पिता शंकर यांच्या समवेत वास्तव्य करतो. गणपती भक्तांच्या देवघरातून अंगणात आला. आता तर तो थेट मैदानावर येऊन बसलातो प्रचंड आवाजामध्ये, कर्कश स्वरांमध्ये राहून कंटाळला. त्याला बेगडी, ढोंगी भक्तांच्या सहवासाचा उबग आला. सूक्ष्मामधील शक्तीची विस्मृती झालेले भक्त त्याची अवाढव्य व उंच मूर्ती स्थापनकरण्यात धन्यता मानतात. आकार, उंची, सजावट, कृत्रिम दिव्यांची रोषणाई यांमधील स्पर्धा त्याला नकोशी झाली आहे. देखावेदिखाऊपणा करणाऱ्या लोकांवर फार नाराजझाला आहे. नेत्यांचे प्रचार करण्याचे साधन झाला आहे. माणसाच्या बुद्धीचं निघालेलं दिवाळं बघून तो बेचैन झाला आहे. त्याला वर्गण्या, देणग्या यामार्गांनी भक्तीच्या नावानेपैसा गोळा करण्याचा मार्ग त्याला अजिबात आवडत नाही. भक्तीचा वापर पद, पैसा मिळवण्यासाठी करणाऱ्या समाजावर तो नाखूश आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या माणसांवर वैतागला आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणाला अधिक जवळ करणाऱ्या उत्सवात श्रीगणेश अजिबात रमत नाही.

 

माणसामाणसांमधील द्वेष, वैर, मत्सर या भावनांना खतपाणीघालण्यासाठी कधी गणेशोत्सव किंवा गणेशपूजन असतं का? स्थूलमधून सूक्ष्मपर्यंतचा प्रवास करण्यास सामर्थ्यवान असणाऱ्या गणेशाला आपण ओळखणार कधी? बुद्धीचा स्तर वरती नेणाऱ्या गणपतीला समाजातील घसरण झालेल्या बुद्धीची कीव करावीशी वाटणं स्वाभाविक नाही का? गणपतीच्या भक्तीमधील वर्म लोकांना कसं आणि कधी कळेल? समाजामधील विषमतेचं दर्शन त्याला दु:खी करते. भेदाभेद अमंगळ वाटतात. खरं तर तो मंगलमूर्ती आहे ना! त्याला सकल समाजाचं मंगल करायचं आहे. त्यासाठी तो निर्गुणामधून सगुण साकार झाला. भक्तांच्या भक्तीला उंचीवर नेण्यासाठी तो मूर्तीमध्ये आला. तो देवदेवांचा ईश आहे. तो सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे. त्याचं मूळ प्रणवमध्ये, ओमकारमध्ये आहे. नादब्रह्म, शब्दब्रह्म असा श्रीगणेश आहे. त्याला प्रत्येक ग्रंथारंभी स्थान दिलेलं आहे. त्याला प्रारंभी वंदन करून, त्याची प्रार्थना करून, स्तुती करूनच कार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. त्याचं स्तवन करण्याने, पूजन करण्याने तो यश देतो. अवघी विघ्न नाहिशी करतो. त्याच्या ठायी अफाट शक्ती एकवटलेली आहे. गणेशाची मंदिरं संपूर्ण जगामध्ये आहेत. हजारो, लाखो वर्षांपासून गणपती पूजन चालत आलेलं आहे. त्याचं माहात्म्य ज्ञात असूनदेखील समाज असं वर्तन का करतो? विचित्र पद्धतीनं उत्सव साजरा का करतो? भागवत, गणेशपुराण यामध्ये गणेशाच्या अनेक कथा आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तत्पर असणारा श्रीगणेश यामध्ये वर्णीत केलेला आहे. भक्तांची परीक्षा घेऊन त्यांना यश देणारा आहे. भक्तांच्या मनामधील भावांनुसार तो त्यांना भेटतो. तो तर चिंतामणी आहे. हेरंब, मोरेश्वर, गणराय, मोरया, गजानन, गणपती, गणेश किती सुंदर नावांनी त्याला भक्त हाका मारतात. तुझ्या नुसत्या स्मरणानं भक्तांच्या मनोकामना पूर्णत्वाला जातात. प्रचंड सामर्थ्य तुझ्याठायी एकवटलेलं आहे. बुद्धी, बळ देणारा तू सामर्थ्यवान आहेस. तुझ्या सामर्थ्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही.

 

सध्या समाजाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे समाज खऱ्या भक्तीच्या मुळापर्यंत जात नाही. तुझ्या नामामध्ये असणारी ताकद अनुभवण्याची क्षमता त्याच्यात उरलेली नाही. तू कृपाळू, दयाळू आहेस ना! समस्त समाजाला अध:पतनापासून वाचव रे बाबा! प्रेमाचा, आनंदाचा आशय समजावून सांग. भक्तीमध्ये दर्शनाची आस असते. प्रदर्शनाची गरज नसते. गायन, वादन, नृत्य ही भक्तीसाठी उपयोगात आणली, तर त्याला एक आगळी उंची लाभते. हे सगळं लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवतो आहे. त्यांना कशा प्रकारे समज द्यायची ते तूच ठरव. आता जास्त वेळ लावू नकोस. लोकांचा विवेक जागृत कर. सृष्टीचा लय होण्याची वाट बघू नकोस. तू निराश करणार नाहीस याची आम्हाला खात्री आहे. तुझ्यावर दृढ श्रद्धा ठेवणारे तुझ्याकडे मोठ्या आशेनं बघत आहेत. त्यांच्या अंत:रंगात भक्तीचा नंदादीप अखंड तेवतो आहे. खऱ्या मोजक्या भक्तांचा मनगाभारा ‘भक्ती-दीपा‘च्या प्रकाशानं उजळून उठून दिसत आहे. तू संपूर्ण समाजाला जागृत करून योग्य भक्तिमार्ग दाखवं. म्हणजे समाजमनातील अज्ञानाचा अंध:कार दूर होईल, तेव्हाच गणेशोत्सवाचा निखळ आनंद लुटता येईल. अपराध पोटात घालून लोकांना जवळ घेऊन गणेशभक्ती मुक्तीपर्यंत घेऊन जाते, ते समजावून सांग. स्थूलामधून सूक्ष्मापर्यंतच्या मार्गावर घेऊन जा. अमंगलाचं मंगलामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. तू अनंत आहेस म्हणून आमचा अंत पाहणार नाहीस. निस्सीम भक्त आणि तू यांच्यामधील अनाम नात्याला स्मरून तू सकलाचं मंगल करशील यात शंका नाही.

ध्यान लागो डोळा ।

गणेशा कृपाळा ।

भक्तीचा जिव्हाळा ।

तूचि जाणे ॥

 
- कौमुदी गोडबोले

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/