‘हिंदू’ शब्द अस्पृश्य ठरविण्याचा प्रयत्न : नायडू
महा एमटीबी   11-Sep-2018

 

 
 
 शिकागो : “काही लोक हिंदू या शब्दाला अस्पृश्य आणि असहिष्णू ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असे स्पष्ट करताना स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर संतांच्या शिकवणीनुसार हिंदुत्वाचे खरे मूल्य जोपासण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. शिकागो येथे आयोजित विश्व हिंदू संमेलनाच्या समारोपीय समारंभात उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. “जागतिक सहिष्णूतेवर भारताचा विश्वास आहे आणि याच विश्वासातून भारताने सर्व धर्मांचा स्वीकार केला आहे. स्वामी विवेकानंद आणि इतर थोर संतांनी जी शिकवण आपल्याला दिली, तिचा प्रचार करताना, हिंदुत्वाचे मूल्य जोपासण्यासाठी एकजूट व्हा,” असे नायडू यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येथे आयोजित विश्व हिंदू संमेलनात 60 देशांमधील 2500 प्रतिनिधी आणि 60 वक्ते सहभागी झाले आहेत. 11 सप्टेंबर 1893 रोजी विवेकानंद यांनी येथे हे विश्वविख्यात भाषण केले होते.
 

एकमेकांना समजून घ्या आणि काळजी घ्या, हेच हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान असून हिंदुत्वाचा महत्त्वाचा पैलू यात प्रतिबिंबित होतो पण, अलीकडील काळात हिंदूंविरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार चालविला जात आहे. काही लोकांनी तर हिंदू हा शब्द कसा आणि किती अस्पृश्य आणि असहिष्णू आहे, हे सिद्ध करण्यासाठी कंबरच कसली आहे. हिंदू या शब्दाचा खरा अर्थ जगाला माहीत करून देण्यासाठी हिंदुत्वाच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे,” असेही उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले. “आपण इतरांच्याही अनुभवांची माहिती घ्यायला हवी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला हवा. कारण केवळ भारतीय संस्कृतीतच इतर धर्मांचा आदर केला जातो आणि त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते,” असे त्यांनी सांगितले.

 

स्वामी विवेकानंद हे हिंदू संस्कृतीचे अवतार आहेत. 11 सप्टेंबर 1893 रोजीच्या शिकागो येथील भाषणात ते म्हणाले होते की, “सहिष्णूता आणि जागतिक स्वीकारार्हता ही भारताने जगाला दिलेली देण आहे, याकडे लक्ष वेधताना बुद्धिमत्तेचे अमृत केवळ भारताकडूनच जगाला मिळू शकते,” असे उपराष्ट्रपती म्हणाले. ”एकेकाळी भारताची ‘विश्वगुरू’ अशी ओळख होती. आजच्या बदलत्या जगातही आपल्याला भारताची ही ओळख कायम ठेवायची आहे,” असे प्रतिपादनही नायडू यांनी केले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/