रंगभूमीवर पुन्हा अवतरणार नटसम्राट!
महा एमटीबी   11-Sep-2018

 


 
 
मुंबई : प्रत्येक कलाकाराला आयुष्यात एकदातरी नटसम्राट साकारावासा वाटतोच! वि.वा शिरवाडकर लिखित गणपतराव बेलवरकर या पात्राने केवळ रंगभूमीलाच नव्हे तर रुपेरी पडद्यालाही आपली भुरळ पाडली. महेश मांजरेकरांनाही या नाटकाचे सिनेमात रुपांतर करावेसे वाटले. या सिनेमात नाना पाटेकरांनी साकारलेल्या नटसम्राटाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. नटसम्राट हे नाटक झी मराठी आता रंगभूमीवर परत घेऊन येत आहे. यावरून नटसम्राट या नाटकातील गणपतराव बेलवलकर हे पात्र आजही रसिकांच्या मनात अजरामर असल्याचा प्रत्यय येतो.
 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपतराव बेलवलकर ही प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार असल्याचे कळते. तर कावेरीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी दिसतील. नटसम्राटच्या निमित्ताने मोहन जोशी व त रोहिणी हट्टंगडी हे दोघेही अभिनयातील तगडे कलाकार बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर परततील.

 
झी मराठी घेऊन येत असलेली ही नाट्यकृती यावर्षी ४ नोव्हेंबर रोजी रंगभूमीवर येईल, अशी शक्यता नाटकाच्या निर्मात्यांकडून वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी झी मराठी या वाहिनीने हॅम्लेट, अलबत्त्या गलबत्त्या ही नाटकं रंगभूमीला दिली. तर झी मराठीचे अरण्यक हे नाटकही लवकरच नव्याने रंगभूमीवर येणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/