मुद्रा बँक योजना
महा एमटीबी   11-Sep-2018

 (MUDR­A: Micro Units Development Refinance ­Agency)

 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
 
लघु उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ८ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली येथे मुद्रा बँक या एका महत्त्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या योजनेची घोषणा केली होती. देशातील युवकांना तसेच महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा जुन्या लघु उद्योगांसोबत जोड म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेची सध्या चांगलीच मदत होत आहे. कृषी व्यवसायाव्यतिरिक्त कुटीरोद्योग, दुग्ध व्यवसाय, दुकान, लहान रेस्टॉरंट, गॅरेज, फळ विक्री यासारखे अनेक लघु उद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार ते १० लाखांपर्यंत मदत होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
पार्श्वभूमी:
रोजगाराच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत असताना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. बँका व सहकारी संस्थांकडून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रभावी मदत होऊ शकत नव्हती. त्यामुळे व्यवसाय व उद्योगपूरक वातावरण निर्मितीस अडथळा निर्माण होत होता. त्यासाठी मदतगार ठरू शकेल अशी कोणतीही बँकिंग प्रणाली किंवा नियामक संस्था अस्तित्वात नव्हती. ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्यासाठी गरजू व्यक्तींना नातेवाईक, मित्रांच्या मदतीवर किंवा सावकारी कर्जावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे सावकारी जाचाला सामोरे जाण्याची नामुष्की ही अनेकांवर ओढवत होती. २०१३च्या एनएसएसओच्या अहवालात असे म्हटले होते की, देशात सध्या ५.७७ कोटी सूक्ष्म उपक्रम कार्यरत असून त्यापासून १२ कोटी लोकांना रोजगार प्राप्त होतो. त्यामध्ये एखाद्या व्यवसायपूरक सरकारी योजनेची नितांत गरज होती. जी मुद्रा योजनेमार्फत भागवली जात आहे.
 
 
वैशिष्ट्य:
२०१५मध्ये सरकारतर्फे मुद्रा बँकेसाठी २० हजार कोटीचे भांडवल उपलब्ध करून देण्यात आले, त्याशिवाय बँकअंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या पतहमी निधीचीही सोय करण्यात आली. या योजनेचे शिशू, किशोर व तरुण असे तीन प्रकारात विभाजन करण्यात आले. शिशू विभागात ५० हजारांपर्यंत, किशोर विभागात ५ लाखांपर्यंत आणि तरुण विभागात १० लाखांपर्यंत वित्तसहाय्य होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
या योजनेअंतर्गत सर्वाधिक लाभ महिलांना झाला
२०१६-१७ मध्ये योजनेअंतर्गत १,८०,०८७ हजार अर्जांना मंजुरी मिळून सरकारने ठरवलेले १,८०,००० एवढे लक्ष्य पार झाले आहे. व्याजदर ठरविण्याचे स्वातंत्र्य बँकांना बहाल करण्यात आले आहे.
 
सर्व सार्वजनिक व खासगी बँका कर्ज देऊ शकतील अशी व्यवस्था
या योजनेला दक्षिण भारतात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला तर पूर्व भारतात त्या तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. तेथे सर्वात जास्त खाते ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादा असलेल्या शिशू वर्गात उघडले गेले.
२०१५-१६ च्या तुलनेत २०१६-१७ मध्ये कर्जाला मंजुरी मिळालेल्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या संख्येत २५% इतकी वाढ झाली. म्हणजेच, इतक्या अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला.
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या कुठल्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी बँकेकडून ‘मुद्रा’ योजनेचा फॉर्म मिळवावा लागेल. या फॉर्मसोबत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपण सुरू करीत असलेल्या व्यवसायाची माहिती भरावी लागेल. बँकेतर्फे संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर आपले कर्ज मंजूर होते आणि आपल्याला उपलब्ध करून दिले जाते. अधिक माहितीसाठी Mudra.org.in या वेबसाईटला भेट दिल्यास तेथे योजनेची सविस्तर माहिती मिळू शकेल.
 
नवीन रोजगार विकसित करण्यासाठी आणि रोजगारास प्रोत्साहन देण्यासोबतच नवा उद्योजक सुरू करू इच्छिणार्‍या उद्योगस्नेही व्यक्तींना वित्तीय सहकार्य मिळावे, या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली. असंघटित क्षेत्रातील व्यवसाय व उद्योगांना चालना मिळावी आणि युवकांना रोजगार मिळावा हासुद्धा यामागे उद्देश आहे. तसेच असंघटित लघु उपक्रमांना पतपुरवठा करणार्‍या पतसंस्थांचा आणि बँकांचा विकास कर यासह त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी सरकारतर्फे ही योजना जनतेला २० हजार कोटी रुपयांच्या निधीसह समर्पित करण्यात आली.
 
- कल्पेश गजानन जोशी