कॉर्नियल प्रत्यारोपण : नेत्रदानाबाबत 15 सत्ये
महा एमटीबी   10-Sep-2018

 

 

 
डॉ. हर्षवर्धन घोरपडे, कॉर्निया, मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह शल्यविशारद, डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल सायन्सेस, हिरानंदानी हॉस्पिटल- फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटल यांच्या माहितीवर आधारित भारतात फक्त 10 टक्के नेत्र प्रत्यारोपणाच्या मागण्या पूर्ण केल्या जातात. त्याचे कारण म्हणजे कॉर्नियाच्या उपलब्धतेचा अभाव होय.

 

भारतातील सुमारे दीड दशलक्ष लोकांना कॉर्नियल अंधत्वाचा त्रास होतो आणि त्यातील अंधत्वाच्या 80 टक्के घटना प्रतिबंधात्मक आहेत. ‘कॉर्नियल ब्लाइंडनेस’ हे भारतातील अंधत्वाच्या सर्वोच्च कारणांपैकी एक आहे आणि यावर कॉर्नियाचे प्रत्यारोपण करून उपाय काढता येतात, परंतु कॉर्निया दान करण्याच्या अभावामुळे रुग्णांना प्रत्यारोपणासाठी प्रतिक्षा करावी लागते. येत्या 25 ऑगस्ट, 2018 रोजी सुरू झालेल्या आणि 8 सप्टेंबर 2018 पर्यंत चाललेल्या ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या’च्या निमित्ताने आम्ही देशातील नेत्रदानाची सध्याची परिस्थिती समोर आणून त्यावर चर्चा करू इच्छितो. लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे येऊन नेत्रदान करण्यासाठी जागरूकता आणि इच्छा दाखवण्याची गरज आहे. हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नेत्रदानासंबधी 15 सत्ये इथे नमूद करत आहोत आणि त्यांच्याबाबत पण प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे...

 

नेत्रदान फक्त मृत्यूनंतर करता येते. मयत व्यक्तीने त्याचे किंवा तिचे डोळे दान करण्याचे वचन दिले नसले तरी नेत्रदान करता येते. दाता आणि डोळे दिलेल्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाते. मोठी आपत्कालीन घटना असेल, तरीसुद्धा प्रतीक्षा यादीतील रुग्णांना प्राधान्य दिले जाते. नेत्रपेढ्यांकडे असलेल्या यादीनुसार दान केलेले डोळे रुग्णासोबत जुळवले जातात. फक्त एका नोंदणीकृत डॉक्टरलाच दात्याकडून डोळे घेण्याची परवानगी असते. हे प्रशिक्षित नेत्रपेढी तंत्रज्ञ आणि प्रशिक्षित नेत्रशल्यविशारदांकडूनही केले जाऊ शकते आणि त्यामुळे जास्तीत जास्त नेत्रपटले मिळू शकतात. मृत्यूनंतर केवळ सहा ते आठ तासांच्या कालावधीत नेत्रदान करून त्यांचे प्रत्यारोपण करावे लागते. डोळे काढण्यासाठी फक्त 10-15 मिनिटे लागतात आणि चेहर्‍यावर कोणताही व्रण किंवा चेहर्‍याचे नुकसान होत नाही. डोळ्यांच्या एका जोडीमुळे दोन कॉर्नियल ब्लाइंड लोकांना दृष्टी मिळते आणि टिशूचा वापर संशोधन किंवा शिक्षणासाठी केला गेल्यास जास्तीत जास्त लोकांना मदत मिळते. नेत्रदाते कोणत्याही वयाचे किंवा लिंगाचे असू शकतात. दाता किंवा त्यांच्या कुटुंबाला अवयव किंवा टिशू दानासाठी कोणताही खर्च येत नाही. मधुमेही, हायपरटेन्सिव्ह, दमा असलेल्या आणि कोणत्याही संसर्गजन्य रोग नसलेल्या लोकांनाही नेत्रदान करता येईल. जवळपास 90 टक्के कॉर्नियल प्रत्यारोपणात रुग्णाला नक्की दृष्टी मिळते. मिळालेली दृष्टी अनेक कारणांमुळे आधीच्या दृष्टीसारखीच नसेल, परंतु ती काँटॅक्ट लेन्सेस आणि काही उपचार करून विविध मार्गांनी पूर्ववत करता
येते.

 

कॉर्नियल प्रत्यारोपणाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती केराटोकोनस : हा एक डोळ्यांचा आजार आहे. जिथे सामान्यतः गोल, अंडाकृती आकाराचे नेत्रपटल विस्तारते आणि त्यामुळे नजर कमजोर होते. हे वाढत गेल्यावर नेत्रपटल पातळ होते आणि पुढे येते आणि कधीकधी त्यावर व्रण येतात. केराटोनोकोनस असलेल्या व्यक्तींमध्ये कॉर्नियल प्रत्यारोपण यशस्वी होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.

 

बुलस केराटोपथी : यामुळे कॉर्नियाला सूज येते आणि त्यावर पुरळ येतात. वृद्ध व्यक्तींमध्ये हे जास्त प्रमाणात आढळते. बुलस केराटोपॅथी मोतीबिंदू काढून टाकण्यासारख्या शस्त्रक्रियांनंतर आढळून येऊ शकते. सुजेमुळे नंतर कॉर्नियाच्या पृष्ठभागावर द्रवाने भरलेले पुरळ येतात. हे पुरळ फुटू शकतात आणि त्यानंतर प्रचंड वेदना आणि नजर कमजोर होते.

 

फुचस डायस्ट्रोफी : हा एक वाढत जाणारा आजार आहे. तो दोन्ही डोळ्यांचे नुकसान करतो आणि महिलांमध्ये जास्त आढळतो. 30-40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये या आजाराची चिन्हे दिसतात. परंतु हा आजार व्यक्ती 50-60 वर्षे वयोगटात आल्यावरच उद्भवतो. कॉर्नियाच्या पेशींचे हळूहळू नुकसान होत जाते आणि त्यासाठी काही विशिष्ट कारण नसते. पेशींचे अधिकाधिक नुकसान होत जाते. तसेच कॉर्निया सुजतो आणि नजर कमजोर होते. त्यावर कॉर्नियल प्रत्यारोपण करून उपचार करता येतात.

 

हर्पेटिक आय डिसीज : हर्पस सिम्प्लेक्स विषाणू हे अमेरिकेमध्ये कॉर्नियल अंधत्वाचे सर्वाधिक सामान्य कारण आहे. सुमारे साडेचार लाख अमेरिकन लोकांना हा आजार सातत्याने होतो आणि सुमारे 46 हजार लोकांना तो दरवर्षी होतो. या आजाराचे दोन प्रकार आहेत- व्हेरिसेला- झोस्टर सायरस आणि हर्पिस सिम्प्लेक्स टाइप 1. अनेक घटनांमध्ये कॉर्नियावर आलेल्या व्रणांमुळे कॉर्निया प्रत्यारोपण करणे गरजेचे पडते.

 

फुचस डायस्ट्रोफी : हा एक वाढत जाणारा आजार आहे. तो दोन्ही डोळ्यांचे नुकसान करतो आणि महिलांमध्ये जास्त आढळतो. 30-40 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये या आजाराची चिन्हे दिसतात, परंतु हा आजार व्यक्ती 50-60 वर्षे वयोगटात आल्यावरच हा आजार उद्भवतो. कॉर्नियाच्या पेशींचे हळूहळू नुकसान होत जाते आणि त्यासाठी काही विशिष्ट कारण नसते. पेशींचे अधिकाधिक नुकसान होत जाते तसे कॉर्निया सुजतो आणि नजर कमजोर होते. त्यावर कॉर्नियल प्रत्यारोपण करून उपचार करता येतात.

 

एका संशोधनानुसार, अंधत्वाची सुमारे 20 हजार नवीन प्रकरणे नोंदवली जातात आणि त्यातील अनेक रुग्ण तरुण आहेत. जास्तीत जास्त लोकांमध्ये नेत्रदानासंबंधी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. कॉर्नियाची मागणी आणि पुरवठा यांची गरज समजून घेऊन त्यातील दरी सांधण्याचीही गरज आहे.          
                                                                                                                                                         - डॉ. किरण शिंदे
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/