गोदावरीसाठी झटणारा ‘जलदूत’
महा एमटीबी   10-Sep-2018

 

 
 
 
गोदावरी प्रदूषणासाठी केवळ प्रशासन जबाबदार नाही, तर एक नाशिककर म्हणून गोदावरी स्वच्छ करणे, ही आपलीही जबाबदारी आहे,” अशी जनजागृती निशिकांत पगारे नाशिकमध्ये करत आहेत.
 

महाराष्ट्रातप्लास्टिक बंदी’ लागू झाली खरी; परंतु, जोपर्यंत लोकांना स्वत:हून पर्यावरणाविषयी आपुलकी वाटत नाही, तोपर्यंत पूर्णत: ‘प्लास्टिक बंदी’ होणार नाही,” हे विचार आहेत, ‘नाशिकभूषण’ निशिकांत पगारे यांचे! नाशिकमधील गोदावरी नदी ही प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून गेली अनेक वर्षे ते कार्य करत आहेत. ‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंच’ ही त्यांची संस्था आहे. “गोदावरी प्रदूषणासाठी केवळ प्रशासन जबाबदार नाही, तर एक नाशिककर म्हणून गोदावरी स्वच्छ करणे, ही आपलीही जबाबदारी आहे,” अशी जनजागृती निशिकांत पगारे नाशिकमध्ये करत आहेत. गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

निशिकांत पगारे व त्यांचे सहकारी नाशिकमधील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन ‘प्लास्टिक बंदी’विषयी जनजागृती करतात. त्यांच्या या जागृतीचा परिणाम होऊन शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आपल्या पालकांना घरातून बाहेर पडताना सोबत कापडी पिशवी नेण्याचा आग्रह धरतात. “लहान मुलांना ‘प्लास्टिक बंदी’चे महत्त्व लवकर समजते, पण मोठ्या माणसांची प्लास्टिक वापरण्याची सवय मोडणे सहज शक्य होत नाही. लहान मुलांचा मेंदू कोरा असतो. त्यामुळे आपण त्यांना जे सांगू ते लहान मुले खरे मानतात. चांगले काय हे बहुतेकदा त्यांना जास्त कळते,” असे ते आवर्जून सांगतात. शाळांमधील या लहान मुलांमार्फतच आम्ही त्यांच्या पालकांपर्यंत ‘प्लास्टिक बंदी’चा हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतोगोदावरीत सोडले जाणारे निर्माल्य हे गोदावरी प्रदूषित होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. काही लोक निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ते नदीत सोडतात. यामुळे घनकचरा तयार होतो. घनकचर्‍यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. घनकचरा हा पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच घातक आहे. निशिकांत व त्यांचे सहकारी लोकांना निर्माल्य हे निर्माल्यकलशातच टाकण्याचे आवाहन करतात.

 

गणेश विसर्जनाबाबत निशिकांत म्हणतात की, “प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्याऐवजी लोकांनी शाडूच्या गणपतीची स्थापना करावी.” याबाबत निशिकांत एक नवीन उपक्रम नाशिकमध्ये राबवतात. त्यांनी गोदावरीच्या तटावर ठिकठिकाणी स्टॉल उभारतात व विसर्जनासाठी येणार्‍या भाविकांना ते त्यांच्याकडील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तिथे देण्यास सांगतात. लोकं या स्टॉलवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देतात. यानंतर त्या मूर्तींचे गोदावरी सोडून इतर ठिकाणी, कृत्रिम जलाशयात विसर्जन केले जाते. गेल्या वर्षी त्यांच्याकडे २ लाख ४५ हजार एवढ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जमा झाल्या होत्यापर्यावरणाविषयी नितांत प्रेम असल्याने निशिकांत हे नाशिक परिसरातील झाडांचीदेखील काळजी घेतात. “हल्ली झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंट क्राँकिटचा पार बांधला जातो. परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे त्या झाडांना श्वास घेता येत नाही. तसेच त्यांची वाढही खुंटते. त्या झाडांच्या मुळांचा विस्तारही थांबतो. कालांतराने अशी झाडे कोलमडून पडतात,” असे निशिकांत आवर्जून सांगतात. झाडांभोवती निशिकांत व त्यांचे सहकारी दोन फुटांचे ओळ तयार करतात. त्यामुळे झाडांची श्वसनक्रिया नीट होते.

 

निशिकांत यांचा जन्म व बालपण नाशिकमध्येच गेल्याने व नाशिकमधील गोदावरीविषयी त्यांना अत्यंत आदर आहे. गोदावरीचे होत असलेले प्रदूषण, गोदावरीत सोडले जाणारे सांडपाणी, त्यामुळे नदीपात्रात निर्माण होणारा फेस, वाढत्या पानवेली हे सारे पाहून निशिकांत पगारे यांनी ‘गोदावरी स्वच्छते’चे व्रत हाती घेतले. “गोदामाता ही नव्याने जगली पाहिजे, ती प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, हे एक नाशिककर म्हणून माझे परमकर्तव्य आहे,” असे निशिकांत सांगतात. निशिकांत यांना त्यांच्या कार्यासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नाशिकभूषण, नाशिकरत्न, ज्ञानदीप अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जलनायक, जलयोद्धा अशा पदव्याही त्यांना लोकांनी बहाल केल्या आहेत.

 

“प्रशासनाने दंडात्मक भूमिका घेतली. परंतु, त्याचबरोबर जनजागृतीही करायला हवी. प्रत्येकाला पर्यावरणाविषयी प्रेम हे असायलाच हवे. कारण, जर आज जलप्रदूषणाची अशी भयंकर परिस्थिती आहे, तर पुढे भविष्यात ही समस्या अजून गंभीर होऊ शकते. आपल्याला आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करायला हवे. किमान आपल्या भावी पिढीला भविष्यात नैसर्गिक साधनसंपत्ती काय असते हे दाखवण्यासाठी तरी पर्यावरणाचे संरक्षण करायला घ्यायला हवे. भारताला जगातील इतर देशांच्या मानाने अधिक नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना लाभला आहे. तो आपण जपून वापरायला हवा. निसर्ग आपल्याला खूप काही सतत देतच असतो. त्याचे देणे थांबत नाही. परंतु, आपणही कुठेतरी आता निसर्गाला त्या मोबदल्यात काहीतरी द्यायला हवे. पर्यावरणाचे रक्षण करता येत नाही, तर निदान प्रदूषणाने त्याची विल्हेवाट तरी लावू नका,” असा ‘प्लास्टिक बंदी’चा संदेश देत निशिकांत पगारे तरुणांमध्ये जागृती करतात.

 - साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/